पॉलिस्टर तंतूला पुन्हा लोकप्रिय करण्यामध्ये टेन्नेस्सी ईस्टमन कंपनी आणि मॅनमेड फायबर प्रोडय़ुसर्स असोसिएशन या संस्थांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. टेन्नेस्सी ईस्टमन कंपनीने पॉलिस्टर तंतूसाठी ‘होय’ (एर) मोहीम राबवली आणि हा तंतू रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या माध्यमाद्वारे लोकप्रिय केला. या सर्व जाहिरातींमधील कल्पना ही पॉलिस्टर तंतूंच्या स्वस्तपणाऐवजी त्यांच्या धुण्यातील सहजपणा व टिकाऊपणाला प्रसिद्धी देणे हा होता. हेस्ट फायबर इंडस्ट्रीजनेसुद्धा या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी १९८१ ते १९८३ या काळात महत्त्वाचे संशोधन करून हे दाखवून दिले की ८९% लोक पॉलिस्टर व कापूस, लोकर किंवा रेशीम यांसारखे इतर नसíगक तंतू यांमधील फरक ओळखू शकत नाहीत. या संशोधनांद्वारे त्यांनी असेही दाखवून दिले की, बहुतेक सर्व लोकांना ज्या तंतूपासून किंवा ज्या प्रकारच्या कपडापासून वस्त्र तयार केले आहे त्यापेक्षा वस्त्र कसे दिसते, यामध्ये जास्त आस्था असते. यामुळे पॉलिस्टरचे कपडे पुन्हा लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. यानंतर पॉलिस्टरच्या अतितलम तंतूंचा शोध ही पॉलिस्टर तंतू पुन्हा एकदा सर्वात लोकप्रिय करण्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट ठरली.
पॉलिस्टर तंतूची उत्पादन प्रक्रिया :
डय़ू. पॉन्ट कंपनीने पॉलिस्टर तंतू बनविण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक कंपन्यांना पॉलिस्टर तंतू बनविण्यामध्ये रस आला आणि त्या वेगवेगळ्या नावाने आणि रासायनिक सूत्राचे पॉलिस्टर तंतूंचे विविध उपयोगासाठी उत्पादन करू लागल्या. आज प्रामुख्याने पॉलिस्टर तंतूचे दोन प्रकार प्रचलित आहेत. पहिला म्हणजे पीईटी (ढएळ-पॉली एथिलीन ट्रेप्थॅलेट) आणि दुसरा पीसीडीटी (ढउऊळ-पॉली १,४ – सायक्लोहेक्झेलीन डायमिथिलीन ट्रेप्थॅलेट). यापकी पहिला पीईटी हा प्रकार जास्त लोकप्रिय आहे आणि त्याच्या उपयोगाची कक्षा खूपच मोठी आहे. त्याची ताकद पीसीडीटी तंतूपेक्षा अधिक असते. तर पीसीडीटी तंतू अधिक लवचिक आणि स्थितिस्थापक असतात. पीसीडीटी तंतूचा वापर जड व वजनदार कापड बनविण्यासाठी केला जातो. उदा. पडदे, सोफा कव्हर, इ. पीईटी तंतू स्वतंत्रपणे किंवा इतर तंतूंबरोबर मिश्रण करून वापरले जातात. पॉलिस्टर तंतू हा कोळसा, हवा, पाणी आणि पेट्रोलियम पदार्थ यांपासून तयार केला जातो.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पतियाळाच्या महाराजांचा गोतावळा
पतियाळाचे महाराज स्वच्छंदी, स्वैराचारी जीवनशैलीचे होते. उन्हाळ्याच्या दिवसात सिमल्याला राहणे व मौजमजा करणे हा महाराज भुपिंदरसिंग यांचा क्रम. ब्रिटिश व्हाइसरॉय व उच्च सेनाधिकारीही त्याच काळात सिमल्याच्या व्हाइसरीगल लॉजमध्ये राहत. लॉर्ड कर्झन हा व्हाइसरॉय सपत्नीक सिमल्यात असताना महाराजा भुिपदरसिंगांचे त्याच्याकडे जाणे येणे असे. महाराजांनी लेडी कर्झनला एका प्रसंगी हिऱ्यांचा मौल्यवान हार दिला आणि तो परिधान करून तिचा फोटो काढला, हे वागणे कर्झनला रुचले नव्हते कमांडर-इन-चीफ लॉर्ड किचनरनेही महाराजांबद्दल स्त्रियांविषयी अशीच तक्रार व्हाइसराय्ॉकडे केली होती. मग कर्झनने महाराजांना सिमल्यात येण्यालाच बंदी घातली.
महाराजांनी सिमल्याच्या पंचक्रोशीतच चल येथे व्हाइसरॉय बंगल्याहून अधिक भव्य, देखणा पतियाळा समर पॅलेस बांधून तेथे ते राहू लागले. रंगेल भुपिंदरसिंगांनी दहा लग्ने केली, त्यांच्या जनानखान्यात सुमारे ३०० स्त्रिया होत्या. अधिकृत व अनधिकृत मिळून ८८ मुले असा त्यांचा मोठा गोतावळा होता. यापकी ५३ मुले जगली. भुिपदरसिंगांच्या लीलाभवन या महालात विलासी जीवनाच्या सर्व सुख सोयी सुसज्ज होत्या.  
भुिपदरसिंग लंडनच्या दौऱ्यावर जात तेव्हा त्यांचा मुक्काम सेव्हाय या अति महागडय़ा हॉटेलात असे. समोर कोणताही प्रसंग असो, आपण आपल्या कलाने, पद्धतीनेच राहण्याची महाराजांची वृत्ती होती. सम्राट जॉर्ज पाचवे यांच्या राज्यारोहणाचा रौप्यमहोत्सव सोहळा लंडनमध्ये होता. त्यास हजर राहिल्यावर दुसऱ्या दिवशी सम्राटांची भेट घ्यावी अशी महाराजांची इच्छा होती. सकाळी ११ ची वेळ जॉर्जनी दिली.  महाराजा साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे झोपेतून उठले व जामानिमा करता करता बारा वाजले. इकडे सम्राट संतप्त! तशाही स्थिती महाराजांची स्वारी एक वाजता, सेक्रेटरी आणि डॉक्टरदेखील सोबत घेऊन जॉर्जसमोर हजर झाली.  या डॉक्टरांनी जॉर्जना सांगितले की, महाराजांना आत्ताच हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलाय.. सम्राटांनी राग गिळून उलट, अशाही स्थितीत आलात, म्हणून आभारच मानले!
 सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com