पॉलिनोझिक तंतूंमधील सेल्युलोज बहुवारिकाच्या रेणूंची रचना अधिक समांतर होते आणि परिणामी पॉलिनोझिक तंतूंची कोरडय़ा तसेच ओल्या स्थितीतील ताकद व्हिस्कोज तंतूंपेक्षा अधिक असते. पॉलिनोझिक तंतू तयार करण्याची ही पद्धत जपानी शास्त्रज्ञ एस. ताचीकावा यांनी १९५१ मध्ये विकसित केली.
पॉलिनोझिक तंतूंची ताकद ही व्हिस्कोज तंतूंपेक्षा अधिक असून या बाबतीत हे तंतू कापसाशी बरोबरी करतात. हे तंतू ओल्या स्थितीतही ताकद चांगल्या प्रमाणावर टिकवून ठेवतात आणि अल्कलिना हे तंतू चांगल्या प्रकारे विरोध करू शकतात. उत्तम ताकद असल्यामुळे अतिशय कमी जाडीचे तंतू (मायक्रो फायबर) बनविणे सोपे जाते.
पॉलिनोझिक तंतूंचा उपयोग स्वतंत्रपणे किंवा कापूस वा इतर आखूड तंतूंबरोबर मिश्रण करून सूत व कापड बनविण्यासाठी केला जातो. कमी जाडीच्या तंतूंमुळे अतिशय तलम असे सूत व कापड बनविता येतात. या तंतूंचा एक दोष म्हणजे घर्षणामुळे हे तंतू दुभंगून त्यांचे पदर सुटतात. त्यामुळे या तंतूंची सूतकताई किंवा विणाई प्रक्रिया करताना घर्षण होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या तंतूंची लंबन क्षमता ही कापसाच्या तंतूइतकीच असते. या तंतूंची कताई प्रक्रिया कमी वेगाची असल्याने या तंतूंचा उत्पादन खर्च तुलनेने अधिक असतो.
उच्च आद्र्र स्थितीस्थापकता तंतू
(हाय वेट मोडय़ुल्स फायबर)
हा तंतू गुणधर्माच्या बाबतीत  व्हिस्कोज आणि पॉलिनोझिक यांच्यामधील आहे. या तंतूंची कोरडय़ा स्थितीतील ताकद ही व्हिस्कोज किंवा पॉलिनोझिक तंतूंपेक्षा जास्त असते आणि ओल्या स्थितीतील ताकद  मात्र जवळपास पॉलिनोझिक तंतूंच्या बरोबरीने असते. या तंतूंची लंबन क्षमता ही व्हिस्कोज तंतूंच्या एवढीच असते. या तंतूंची कताई प्रक्रिया पॉलिनोझिक तंतूंच्या कताई प्रक्रियेपेक्षा जलद असल्यामुळे उत्पादन खर्च व्हिस्कोजपेक्षा जास्त असला तरी पॉलिनोझिकपेक्षा कमी असतो. त्यामुळे हे तंतू पॉलिनोझिक तंतूंपेक्षा अधिक प्रचलित झाले.
सर्वसामान्यपणे ज्या उपयोगासाठी कापूस, व्हिस्कोज किंवा पॉलिनोझिक तंतू वापरले जातात त्या सर्व प्रकारामध्ये या तंतूचा वापर होतो.

संस्थानांची बखर: रायगढ राज्य स्थापना
सध्या छत्तीसगढ प्रांतात जिल्ह्य़ाचे ठिकाण असलेल्या रायगढ येथे रायगढ संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. १६२५ साली संबलपूरच्या राजाने राजगोंड या जमातीच्या ठाकूर दास्योसिंग यास त्याच्या कामगिरीबद्दल रायगढ येथे काही जमीन देऊन राज्य स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. पुढील काळात झालेल्या रायगढ शासकांपकी राजा देवनाथसिंग, राजा बहादूर भूपदेवसिंग, नटवरसिंग, चक्रधरसिंग, महाराजा सुरेंद्रकुमारसिंग यांची कारकीर्द संस्मरणीय झाली. राजा देवनाथसिंगने १८५७ च्या बंडात ब्रिटिशांना मदत केल्यामुळे रायगढ रियासतीचे ब्रिटिशांशी सलोख्याचे संबंध राहिले. १९११ साली राजा बहादूर भूपदेवसिंग याने ब्रिटिशांशी संरक्षणाचा करार करून त्यांची तनाती फौज राजगढात राखली.
राजा चक्रधरसिंग यांना त्यांच्या कथ्थक नृत्य आणि भारतीय संगीतातील योगदानामुळे ओळखले जाते. १ जानेवारी १९४८ रोजी स्वतंत्र भारतात सामील झालेल्या रायगढ संस्थानाचे क्षेत्रफळ ३८५० चौ.कि.मी. आणि लोकसंख्या १ लाख ७२ हजार होती. प्रथम मध्य प्रदेश या प्रांतात वर्ग केलेले रायगढ पुढे नव्याने बनलेल्या छत्तीसगढ प्रांतात सामील केले गेले. रायगढच्या राजघराण्याचे वारस असलेले सध्याचे महाराजा सुरेंद्रसिंग हे राजकारणात सक्रिय आहेत. अभियांत्रिकीचे पदवीधर असलेले सुरेंद्रसिंग मध्य प्रदेश विधानसभेवर दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. दोन वष्रे ते भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे आणि दोन वष्रे पेट्रोलियम अ‍ॅण्ड नॅचरल गॅस समितीचे सदस्य होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com