गुजरात प्रांतातील दक्षिण सौराष्ट्रात असलेले पोरबंदर शहर हे सन १७८५ ते १९४८ या काळात पोरबंदर संस्थानाच्या राजधानीचे ठिकाण होते. पोरबंदरची महत्त्वाची ओळख महात्मा गांधींचे आणि कृष्णमित्र सुदामा यांचे जन्मस्थान म्हणून आहे. जेठवा राजपुतांनी सोळाव्या शतकाच्या मध्यावर हे राज्य स्थापन केले.

स्थापनेपासून अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेठवा राज्यकत्रे मोगलांच्या गुजरातच्या सुभेदाराला खंडणी देत होते. अठराव्या शतकाच्या मध्यावर, मोगल सत्ता खिळखिळी झाल्यावर पोरबंदर राजे बडोद्याच्या गायकवाडांना खंडणी देऊ लागले. पोरबंदर राज्य स्थापनेच्या वेळी राजधानी राणपूर येथे होती, पुढे ही राजधानी छाया या गावात हलविली गेली. त्यानंतर १७८५ साली राजधानी पोरबंदर येथे हलविल्यावर ती स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत तेथेच राहिली. पोरबंदरच्या शासकांपकी अखेरचे दोन शासक भावसिंहजी आणि नटवरसिंहजी यांची कारकीर्द (इ.स.१९०० ते १९४७) राज्यासाठी प्रगतीची झाली. १८११ साली गादीच्या वारसांमधील संघर्ष आणि आर्थिक समस्यांमुळे कंपनी सरकारने हस्तक्षेप केल्यावर पोरबंदर हे ब्रिटिश संरक्षित संस्थान बनले. भावसिंहजी या राजाने पोलीस दल, दवाखाने, संरक्षण व्यवस्था, रस्ते, शैक्षणिक सुविधा यात आमूलाग्र सुधारणा करून राज्याचा विकास केला. एक उत्तम प्रशासक असलेले राणा नटवरसिंहजी उत्तम योद्धा, चित्रकार, लेखक, संगीत रचनाकार आणि क्रिकेट खेळाडू होते.
पोरबंदर शहरात महात्मा गांधींचा जन्म झाला, त्यांचे पूर्वज पोरबंदर राज्याचे दिवाण होते. १६६० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या पोरबंदर संस्थानाला ब्रिटिश राजवटीने तेरा तोफसलामींचा मान दिला होता.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com