राजस्थानातील जयपूरपासून ३३० कि.मी.वर असलेले सध्याचे बिकानेर हे जिल्ह्य़ाचे ठिकाण ब्रिटिशराजमध्ये एक महत्त्वाचे संस्थान होते. ६१०० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या बिकानेर संस्थानात बिकानेर, गंगानगर, चुरू, हनुमानगढ या परगण्यांचा अंतर्भाव होता. १५ व्या शतकापूर्वी या प्रदेशात जाट लोकांच्या सात मोठय़ा टोळ्या आणि अनेक लहान लहान टोळ्यांचे राज्य होते.

या टोळ्यांना ‘सात पत्ती सत्तावन्न माज’ म्हणत. १४६५ साली मारवाडच्या राव जोधाचा एक मुलगा राव बिकाने जोधपूर सोडून एका लहानशा सन्य तुकडीनिशी बाहेर पडला. स्वत:चे निराळे राज्य स्थापण्यासाठी निघालेल्या राव बिकाने जाट टोळ्यांच्या आपसातील वैमनस्याचा फायदा उठवीत जाटांचा बीमोड केला. १४८५ मध्ये सती घाटी येथे किल्ला बांधून बिकाने आपली राजधानी वसविली.
पुढे या गावाचे आणि राज्याचे नाव बिकानेर झाले. थरच्या वाळवंटात असले तरी बिकानेर हे एक ओअ‍ॅसिस होते. मध्य आशियातून गुजरात किनारपट्टीत येणाऱ्या व्यापाऱ्यांना सोयीचे होते. बिकानेरचा सहावा राजा रायसिंहने मोगलांचे सार्वभौमत्व स्वीकारून अकबर, जहांगिराच्या फौजेत सेनाधिकारी म्हणून काम केले. त्याच्या युद्धकौशल्याची पावती म्हणून मोगलांनी रायसिंहला बऱ्हाणपूरची जहागीर दिली. रायसिंह हा कला आणि स्थापत्याचा भोक्ता असल्यामुळे त्याने बिकानेरात राजवाडे, महाल आणि
जुनागढ या किल्ल्यांची निर्मिती केली. १८ व्या शतकात बिकानेर जोधपूर राज्यकर्त्यांमध्ये अनेकदा संघर्ष पेटले. याचा फायदा उठवीत ब्रिटिशांनी मध्यस्थी आणि हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटविले. पुढे तत्कालीन राज्यकर्ता सूरतसिंह याने १८१८ साली ब्रिटिशांशी संरक्षण करार केला. महाराजा गंगासिंह हा सर्वाधिक लोकप्रिय आणि व्हाइसरॉयच्या मर्जीतला राजा. पहिल्या महायुद्ध काळात ब्रिटिश साम्राज्याच्या युद्ध मंडळाचा सदस्य होता.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल

डेनिम-जीन्स (भाग-१)

डेनिम वा जीन हे वस्त्र प्रकार प्रचलित व सर्वपरिचित आहेत. खरं म्हणजे जीन हा तर लहानापासून ते मोठय़ापर्यंत सर्वाचा परवलीचा शब्द झालेला आहे. डेनिम/जीन हा विरलेलं/विटलेलं दृश्यरूप परिधान केलेलं वस्त्र असा वस्त्राचा प्रकार आहे. अनुभवांवर आधारित सत्य सांगायचं झालं तर, डेनिम/जीन हे वस्त्र नाही, तर ती एक जीवनशैली आहे. हे एकमेव वस्त्र असं आहे की, जे प्रत्येक धुण्यानंतर एक नवीन रूप घेऊन पुन्हा जन्मते, एक नवीन अनुभव देते. मजा ही आहे की, वस्त्रोद्योगात डेनिम/जीन हे एकमेव वस्त्र असे आहे ज्याचा तरुणाई हा आत्मा आहे आणि म्हणून की काय, त्या वस्त्राला नवं अंतरंग व्यक्त करण्याची क्षमता लागते. ही तुमच्या दृष्टोत्पत्तीस येण्यापूर्वी अत्यंत खडतर अशा आम्लयुक्त आद्र्र प्रक्रियांमधून या वस्त्राला जावे लागते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे जसं सत्य आहे तसेच डेनिम/जीनला अनंत रंगसंगतीसह तिच्या विविधांगाने तुमच्या पसंतीस उतरण्याकरिता एक क्षमता लागते. अनेक आद्र्रतायुक्त आम्ल प्रक्रियांच्या अग्निपर्वातून गेल्याशिवाय ती क्षमता तिच्या अंगवळणी पडत नाही. व्यक्तिकेंद्री फॅशन डिझायनर असू देत वा त्यातला नवखा कलाकार असू देत, स्त्री असो वा पुरुष, तरुण असो वा तरुणी, जीनने त्याच्या कपाटात महत्त्वाचा कप्पा व्यापलेला नाही हे विरळाच.
डेनिमच्या अष्टपलुत्वाने डेनिमला अनौपचारिक विजारींच्या प्रकारात व अद्ययावत पोशाख पद्धतीत मानाचे स्थान मिळाले आहे. डेनिम/जीन्सच्या लोकप्रियतेमुळे त्याची खरेदी करणे हा एक अनुभव होऊन बसला आहे. डेनिम/जीन्सचे बहुद्देशीय आकृतिबंध, विविध रंगसंगती; अगणित सूक्ष्म तपशील, असंख्य आद्र्र प्रक्रिया वा त्याबाबतीत सूचना देणारी लेबले. वाजवी वा अवाजवी खरेदी मूल्य, यामुळे जीन्स हे जीन्स-द्वय न राहता ते एक विजारींच्या ढिगाऱ्यातील नजर खेचून घेणारं चुंबकीय व्यक्तिमत्त्व ठरलं आहे.

– श्वेतकेतू (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org