प्रा. राघवेंद्र प हे वनस्पतिशास्त्राच्या शैक्षणिक दालनामध्ये प्रा. आर. एम. प या नावाने ओळखले जातात. त्यांचा जन्म २५ जुल १९३२ साली कर्नाटकमधील ‘कुमठा’ येथे झाला. शालेय शिक्षण तेथेच पूर्ण झाल्यावर ते मुंबईत आले. रुईया महाविद्यालयामधून १९५४ मध्ये बी.एस्सी. ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त करून त्यांनी तेथूनच एम.एस्सी. आणि नंतर विज्ञान संस्थेतून पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्या. सपुष्प वनस्पतींची आंतररचना हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. सुरुवातीचे अध्यापन महाराष्ट्र शासनाच्या मुंबई आणि विदर्भातील महाविद्यालयातून केल्यानंतर प्रा. प १९६४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वनस्पतिशास्त्राचे प्रपाठक म्हणून रुजू झाले. प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले. हब्रेरियम संकलनाचा स्वतंत्र कक्ष आणि विद्यापीठ परिसरामध्ये वनस्पतींचे अद्ययावत उद्याननिर्मितीचे श्रेय प्रा. प यांना जाते. या उद्यानातला चार्ल्स डार्विनचा पुतळा हा प्रा. प यांच्या उद्याननिर्मितीमागील परिश्रमाचा आजही साक्षीदार आहे. ब्रिटानिका शब्दकोशामध्ये १९७४ साली स्वतंत्र लिखाण करणारे प्रा. प यांना त्यांच्या उच्च दर्जाच्या संशोधनामुळे १९८८ साली प्रा. पुरी सुवर्णपदक प्राप्त झाले. त्याचप्रमाणे १९९२व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमानसुद्धा मिळाला. प्रा. प हे महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्यामुळे त्यांनी वनस्पतिशास्त्राला अनेक विद्यार्थी आणि संशोधकांची अनमोल भेट दिली आहे. त्यांनी विविध संशोधन पत्रिकांमध्ये लिखाणही केले आहे. विषयाचे सखोल ज्ञान, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, सोबत स्वभावातील गोडवा यामुळे त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी मनापासून प्रेम केले. ९६व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमधील बीजभाषण आणि १९९९ मधील भारतीय वनस्पतिशास्त्र सोसायटीमधील डॉ. पाणिग्रही स्मृती व्याख्यानमालेमधील त्यांची अभ्यासू भाषणे ही आजही वनस्पतिशास्त्रप्रेमींसाठी मौल्यवान ठेवा आहे. अतिशय तल्लख बुद्धी, साधी राहणी आणि ‘विद्या विनयेन शोभते’ या पंथाचे प्रा. प औरंगाबादमध्ये स्थायिक असून पानाफुलांवर प्रेम करणाऱ्या अभ्यासूंना त्यांचे विचारधन आजही सातत्याने वाटत असतात.

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

 

अ‍ॅन फ्रँकचे घर

अ‍ॅमस्टरडॅममधील प्रिन्सेनग्राक्ट या रस्त्यावरील ‘२६३ प्रिन्सेनग्राक्ट’ ही जगप्रसिद्ध वास्तू ‘अ‍ॅन फ्रँक हाऊस’ या नावाने अधिक ओळखली जाते. हिटलरच्या ज्यू-द्वेषाच्या आगीत होरपळलेली चौदा-पंधरा वर्षांची आनेलिस मारी फ्रँक ऊर्फ अ‍ॅन फ्रँक ही ज्यू मुलगी बळी पडली. ती ज्या इमारतीत लपून बसली होती त्या अ‍ॅन फ्रँक हाऊसला आता ज्यू हुतात्मा स्मारकाचं महत्त्व आलंय. हिटलरने जर्मन नागरिकत्व असलेल्या सर्व ज्यूंचे नागरिकत्व रद्द केल्यावर अ‍ॅनचे वडील ऑटो फ्रँक यांनी आपले कुटुंब अ‍ॅमस्टरडॅम येथे आणले. १९४० साली नाझी पक्षाने हॉलंड घेऊन १९४२ साली ज्यूंची छळवणूक मोठय़ा प्रमाणात सुरू केली. नाझींपासून बचाव करण्यासाठी फ्रँक कुटुंबीय आणि त्यांची दोन ज्यू मित्र कुटुंबे एका इमारतीच्या पोटमाळ्यावर २५ महिने लपून राहिली. अ‍ॅनच्या तेराव्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी तिला भेट दिलेल्या डायरीत नाझींचा छळवाद, युद्धाच्या तत्कालीन बातम्या, पोटमाळ्यावरच्या त्यांच्या वास्तव्यातील काही घटना यांची ती नियमित नोंदी ठेवीत असे. फ्रँक कुटुंबीयांनी पोटमाळ्यात राहण्यास जाताना घराच्या तळमजल्याचे प्रवेशद्वार उघडे टाकून, घरातले इतर सामान अस्ताव्यस्त टाकून, तसेच पोटमाळ्यात जाण्याचा जिना काढून तिथे शिडीची व्यवस्था केली. ते लोक पोटमाळ्यात असताना शिडी माळ्यात ठेवत. नाझीच्या लोकांना वाटावे की या ज्यू कुटुंबाने इथून पलायन केलंय. यासाठी ही सर्व व्यवस्था होती. याप्रमाणे ही कुटुंबे नाझींपासून २५ महिने लपून राहिली. परंतु कोणी तरी फितुराने चुगली केल्यामुळे ऑगस्ट १९४४ मध्ये गेस्टापोनी या सर्वाना पकडून छळछावणीत पाठविले. या छळछावणीत पुढे विषमज्वराने अ‍ॅनचा मृत्यू झाला, तर फ्रँक कुटुंबातील स्वत: ऑटो फ्रँकशिवाय सर्व जण निरनिराळ्या आजारांनी मृत्युमुखी पडले. युद्ध समाप्तीनंतर कसेबसे वाचलेले ऑटो घरी परतले तेव्हा पूर्वी त्यांच्याकडे कामाला असलेल्या नोकराने त्याला सापडलेली अ‍ॅनची डायरी त्यांना दिली. त्यांच्या प्रयत्नाने १९४७ साली ही डायरी पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाली. पुढे अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’च्या दीड कोटी प्रती विकल्या गेल्या.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com