रफाएल्लो साग्झिओ दा डर्बनि ऊर्फ रॅफेल हा रेनेसान्स काळातील प्रसिद्ध इटालियन चित्रकार आणि स्थापत्यकार होता. रॅफेल, मायकेल अ‍ॅन्जेलो आणि लिओनार्दो दा िव्हची हे फ्लोरेन्समधील त्रिकूट त्या काळातला सर्वोत्तम कलाकारांचा गट समजला जातो. इ.स. १४८३ ते १५२० अशा केवळ ३७ वर्षांच्या अल्प आयुष्यात रॅफेलने जागतिक दर्जाच्या अनेक कलाकृतींची निर्मिती केली. त्याच्या चित्रकारितेतील रंगसंगती, जिवंतपणा आणि कमालीची आकर्षकता या गुणांमुळे त्याच्या चित्रांची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतींमध्ये गणना केली जाते. त्याच्या चित्ररचनेतील विलक्षण परिणामकारकतेचा प्रभाव पुढील कित्येक पिढय़ांमधील चित्रकारांवर पडला. पेरूजा येथील पेरूजिनोच्या कलाशाळेत शिक्षण घेतल्यावर रॅफेलने निर्मिलेल्या ‘व्हिजन ऑफ द नाइट’, ‘द थ्री ग्रेसेस’, ‘द मॅरेज ऑफ व्हर्जनि’ या त्याच्या प्रथम कलाकृती. या चित्रांमुळे प्रसिद्धी मिळाल्यावर तो त्या काळात कला, सांस्कृतिकदृष्टय़ा भरभराटीस आलेल्या फ्लोरेन्समध्ये आला. फ्लोरेन्सने त्याचे कलाजीवन समृद्ध केले. मॅडोना हा रॅफेलचा अत्यंत आवडीचा विषय होता. ‘मॅडोना ऑफ द गोल्ड िफच’, ‘द सिस्टाईन मॅडोना’ अशी अनेक उल्लेखनीय चित्रे त्याने चितारली. मॅडोनाच्या चित्रांमधून स्त्रीसुलभ भावनांचे उत्कट दर्शन रॅफेलनी घडवले. पुढे पोप ज्युलियस दुसरा याच्या आमंत्रणावरून रॅफेल रोमला गेला. रोम येथील व्हॅटिकनमधील सिस्टाईन चॅपेलची जुनी दालने सुशोभित करून तिथे चित्रे रंगविण्याची जबाबदारी रॅफेलवर आली. व्हॅटिकनमध्ये त्याने चितारलेल्या कलाकृतींपकी ‘स्कूल ऑफ अथेन्स’, ‘डिस्प्युटा’, ‘पार्नास’ आणि ‘ज्युरीस्प्रूडन्स’ या सर्वाधिक प्रसिद्ध झाल्या. या चार कलाकृतींपकी ‘स्कूल ऑफ अथेन्स’ने रॅफेलला जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली. सिस्टाईन चॅपेलमधील सेंट पीटर व सेंट पॉलच्या कथा या रॅफेलच्या चित्र खजिन्यातील एक उत्तम कारागिरी म्हणता येईल. १५१४ ते १५२० या काळात रॅफेल वास्तुशिल्पाच्या क्षेत्रातही विख्यात झाला. ‘सान्ता एलिजीयो देग्ली ऑरेफिसी’, ‘द व्हिला मादामा’, ‘शिगी चॅपेल’ या रॅफेलच्या प्रमुख वास्तुनिर्मिती होत. फ्लोरेन्स व रोम मधील अनेक सुंदर इमारतींचे स्थापत्य रॅफेलचेच आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

 

प्रा. गोविंद विष्णू जोशी
प्रा. गोविंद जोशी हे भारतातील एक प्रमुख वनस्पती शरीरक्रियाशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून मानले गेले आहेत. त्यांनी मुंबईच्या विज्ञान संस्थेतील सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. भरुचा यांच्याकडे पीएच.डी. केली आणि मुंबईच्याच विल्सन महाविद्यालयात १७ वष्रे अध्यापन केले. सन १९५९ ते १९६१ या काळात अमेरिकेतील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात डॉ. पौल सल्तमन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्षारांचा वनस्पतींच्या शारीरिक क्रियांवर परिणाम’ या विषयात संशोधन केले. या संशोधनामुळे त्यांच्या कार्याची पुढची दिशा निश्चित झाली. भारतात परतल्यावर त्यांनी त्याच विषयावर संशोधन केले, वाढवले.
सन १९६७ साली ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. वरिष्ठांकडून मिळालेल्या आíथक पाठबळाच्या जोरावर त्यांनी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन केली. उत्साही सहकारी, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांच्या भेटी यामुळे देशात विभागाचे नाव झाले.
खारफुटी, क्षारयुक्त, जमिनीतील झाडे, लवणयुक्त शेतावरील धान्य, क्षारता आणि क्षारांचे प्रकाश संश्लेषणावर व वनस्पती श्वसनावर होणारे परिणाम, या विषयात त्यांचे पन्नासवर शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून जागतिक संशोधनकार्यात त्यांचा संदर्भ दिला जातो.
दक्षिण महाराष्ट्रातील कृषी पद्धतीत अनेक वेळा मोठय़ा प्रमाणावर खतांचा वापर झाल्यामुळे होणारा कृषी उत्पादनावरचा दुष्परिणाम अभ्यासून, शेतांना प्रत्यक्ष भेटी देऊन उपाय सुचवणारे, त्यावर अभ्यास-संशोधन करणारे प्रा. जोशी यांच्याकडे स्थानिक लोक आदरणीय शास्त्रज्ञ म्हणून पाहात, त्यांचा सल्ला घेत.
प्रा. जोशी इंडियन सोसायटी ऑफ प्लांट फिजिओलॉजिस्ट या संस्थेचे अध्यक्ष होते. आणि त्या संस्थेच्या नियतकालिकाचे प्रमुख संपादक होते. सर्वोत्कृष्ट प्लांट फिजिओलॉजिस्ट म्हणून प्रा. जे. जे. चिनॉय सुवर्णपदकाचे मानकरी होते. त्यांनी अनेक विद्यापीठे आणि शासनाच्या समित्यांवर कार्य केले होते. १९८० साली मराठी विज्ञान परिषदेने त्यांचा सन्मान केला होता.
नावाजलेले शिक्षक व संशोधक, शांत व सोशिक स्वभाव असलेले प्रा. जोशी सर्वाच्या मदतीस नेहमी तत्पर असत.
– प्रा. शरद करमरकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.or