मक्यातील प्रथिनांपासूनसुद्धा तंतू तयार करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवले. या तंतूचे नाव ‘विकारा’ असे ठेवले गेले. हे तंतू मक्यातील झीन या प्रथिनांपासून तयार केले जातात.
व्हर्जिनिया केमिकल कॉर्पोरेशन ही कंपनी हे तंतू १९४८ पासून १९५७ पर्यंत उत्पादित करत होती. मक्याच्या पिठाची अल्कोहोलबरोबर रासायनिक प्रक्रिया करून त्यातील झीन हे प्रथिन उत्कासित केले जाते. नंतर अल्कोहोलचे बाष्पीभवन केल्यानंतर झीन हे प्रथिन पिवळ्या पावडरच्या स्वरूपात उरते. ही पावडर पुढे कॉस्टिक सोडय़ाच्या द्रावणात विरघळवली जाते. हे द्रावण नंतर गाळून, त्याचे निर्वायुकरण करून साठविले जाते. या साठविण्याच्या काळात झीन प्रथिनाचे एकरेषीय बहुवारिकामध्ये रूपांतर होते. नंतर हे द्रावण तनित्रमधून बाहेर काढून आद्र्र कताई पद्धतीने तंतूंचे घनीकरण केले जाते. अशा रीतीने विकारा तंतू तयार होतात.
या तंतूचे गुणधर्म लोकरीशी बरेच मिळते-जुळते आहेत. त्याची ताकद लोकरीच्या ताकदीच्या एवढीच असते. मात्र ओले केले असता ताकद ४०%नी कमी होते. या तंतूंचे लंबन हे लोकरीइतकेच म्हणजे ३० ते ३५% पर्यंत असते. या तंतूंमध्ये १०% पर्यंत जल शोषून घेण्याची क्षमता असते. नायलॉन, लोकर इत्यादी धाग्यांबरोबर मिश्रण करून सर्व प्रकारच्या कपडय़ांमध्ये विकारा तंतूंचा वापर केला जात असे.
उपरोक्त तंतूनिर्मितीखेरीज मक्याच्या कणसाची साले घेऊन त्यापासून जाड धागा बनवण्याची कृती ग्रामीण भागात केली जाते. कणसाची साले भिजवून त्यापासून सलग जाड धागा तयार केला जातो. याचा बाणा (आडवा धागा) म्हणून उपयोग करून चटया, टेबल मॅट, आसने, मेजपट्टय़ा अशी उत्पादने तयार केली जातात. उभा धागा सूती घेऊन त्यामध्ये रंगाचा वापर करता येतो, त्यामुळे विविधता येते. शिवाय ही उत्पादने सहजी धुता येतात. फक्त आडवा धागा जाड आणि थोडा कडक असल्यामुळे या उत्पादनांची घडी घालता येत नाही, पण चटईसारखी ती गुंडाळून ठेवता येतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – देवास संस्थान स्थापना
सुप्रसिद्ध राजा विक्रमादित्य याने इ.स.पूर्व ५६ साली माळव्यातील उज्जन (तेव्हाची ‘उज्जयिनी’ नगरी) येथे आपले राज्य स्थापन केले. त्याचे वंशज निरनिराळ्या प्रदेशांत जाऊन स्थायिक झाले. हे सर्व परमार घराण्याचे राजपूत होते. त्यांच्यातील काही दख्खनमध्ये गेले, त्यांनी पवार असे आडनाव लावले. १७२८ साली बाजीराव पेशव्यांनी माळव्याची मोहीम काढली, त्यात तुकोजी व जिवाजी या दोन पवार बंधूंचा सहभाग होता. माळवा मोहिमेत या पवार बंधूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे बाजीरावाने त्यांना मध्य प्रदेशातील देवास हे शहर आणि आसपासची काही खेडी इनाम म्हणून दिली.
 पवार बंधूंनी देवास येथे आपली राजधानी ठेवून १७२८ सालाच्या अखेरीस देवासचे राज्य स्थापन केले.
पुढे देवास राज्याची सारखी विभागणी होऊन त्यातील सीनियर देवासचा अंमल तुकोजीराव पवारकडे, तर ज्युनियर देवासचा अंमल जिवाजीरावकडे आला. देवासमधून जाणाऱ्या रस्त्याने राज्याचे दोन भाग सारखे केले होते. १८१८ साली दोन्ही देवास राज्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसह संरक्षण करार करून ब्रिटिश तनाती फौजेचे संरक्षण घेतले.
इंदौरपासून ३६ किमी अंतरावर असलेले देवास हे सध्या मध्य प्रदेशातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. भारत सरकारचा चलनी नोटा छापण्याचा मोठा छापखाना तिथे आहे.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com