रोमन साम्राज्याच्या इ.स. १४ ते ६८ या ५४ वर्षांच्या कालखंडात झालेल्या चार सम्राटांनी सत्तेवर येण्यासाठी केलेली कारस्थाने, वैषयिक विक्षिप्तपणा यांनी भरलेला इतिहास लक्ष्यवेधी ठरलाय! टैबेरियस क्लॉडियस हा सम्राट इ.स. ४१ ते ५४ या काळात सत्तेवर होता. या पूर्वीचा सम्राट कॅलिग्युलाचा हा चुलता. त्याच्या पन्नासाव्या वर्षी, तो नको म्हणत असतानाही सिनेटने त्याला सम्राट केले. स्वभावाने अत्यंत दुबळा असलेला क्लॉडियस हरघडी सिनेटचा सल्लाा घेई. त्याची दुराचारी पत्नी मेसालिना आणि मुक्त गुलाम मार्कीसस यांचे क्लॉडियसवर वर्चस्व होते. क्लॉडियस बाहेरगावी गेला असता मेसालिनाने सायलस या तरुणाशी लग्न केले. क्लॉडियस परत आल्यावर सर्व सिनेटर्सनी मेसालिना आणि सायलस यांची डोकी उडवून ठार मारले. त्यानंतर सम्राट क्लॉडियसने त्याची सख्खी पुतणी ज्युलिया अग्रिपीना हिच्याशी लग्न केले. क्लॉडियसचा आधीचा मुलगा ब्रिटानिकस हा रोमन सम्राटपदाचा खरा वारस होता. परंतु ज्युलियाला आपला आधीचा मुलगा निरो यासच सम्राटपदावर बसवण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने क्लॉडियसच्या मागे लागून ब्रिटानिकसला दत्तक घेण्यास तिने भाग पाडले. ब्रिटानिकसला तिने दूरच्या एका खेडय़ात शिक्षण घेण्यासाठी पाठवून हद्दपार केले. एवढे करून न थांबता ज्युलियाने सम्राट क्लॉडियसला विषप्रयोग करून ठार मारले. क्लॉडियसला ज्युलियाने विषप्रयोग केला तेव्हा निरो तेरा वर्षांचा होता. ज्युलिया अत्यंत मुत्सद्दी आणि कारस्थानी होती. तिने क्लॉडियसचा काटा काढल्यावर प्रथम निरोला सनिकांच्या छावणीत पाठवून, त्याच्या करवी सनिकांना मोठाली बक्षिसे दिली. त्यांच्यातील प्रमुखांना मोठाल्या बढत्या जाहीर करून खूश केले. खूश झालेल्या सनिकांनी निरोचा जयजयकार करून त्याला सम्राटपदी बसविले. खरेतर सिनेटर्सचा निरोला सम्राटपदी येण्याबद्दल विरोधच होता. परंतु ज्युलियाने रोमची लष्करी शक्ती आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे सिनेटसुद्धा तिच्या हातचे बाहुले बनले!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

 

भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ
बिरबल साहानी
१४ नोव्हेंबर, १८९१ रोजी जन्मलेले बिरबल साहानी यांचा जन्म पंजाबमधील शहापूर जिल्ह्य़ातील मेरा या गावी झाला. लहानपणापासून भटकण्याचा, झाडे-झुडपे आणि वनस्पतींचा शोध घेण्याचा त्यांना छंद होता. पाने, फुले, रंगीबेरंगी दगड यांचा त्यांनी मोठा संग्रह केला होता. ते एकदा तिबेटच्या प्रवासाला गेले असताना स्वीडिश शास्त्रज्ञ स्वेन हेिडग यांच्याशी त्यांची भेट झाल्यावर त्यांना वनस्पतिशास्त्राची गोडी अधिक लागली. नंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात ए. सी. सेवर्ड यांच्या हाताखाली शिक्षण घेतले. लंडन विद्यापीठातही त्यांनी शिक्षण घेतले.
भारतात परत आल्यावर त्यांनी बनारस व लाहोर येथे वनस्पतिशास्त्राचे अध्यापन केले. लखनौ विद्यापीठात त्यांनी वनस्पतींची चित्रे असलेल्या दगडांचा संग्रह केला होता.
समुद्रात वाढणाऱ्या वनस्पतिशास्त्राला वाहिलेले एक पेलीओबोटनी नावाचे मासिक त्यांनी १९३९ साली सुरू केले. यासाठी त्यांनी भूस्तरशास्त्राचाही सूक्ष्मपणे अभ्यास केला. पेनटोक्सिलीयाज या नावाचा एक वनस्पतिसमूह त्यांनी शोधून काढला. सन १९२१ आणि १९३८ या दोन वर्षी ते इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे अध्यक्ष होते. तर १९२६ साली ते भूस्तरशास्त्र विभागाचे आणि १९४० साली ते जनरल प्रेसिडेंट होते. उत्खननशास्त्राचीही त्यांना आवड होती.
प्राचीन भारतातील नाणी पाडण्याच्या पद्धती हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. १९३६ मध्ये ते इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे सभासद झाले. १९५० मध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पतिशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष झाले.
भारतीय वनस्पतिशास्त्र परिषदेची स्थापना त्यांनीच केली. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे ते उपाध्यक्ष होते. कोलकात्याच्या रॉयल सोसायटीने त्यांना बर्कले पुरस्कार दिला होता. १९४७ मध्ये सर सी. आर. रेड्डी पारितोषिक त्यांना मिळाले होते. त्यांच्याच प्रयत्नामुळे समुद्रात वाढणाऱ्या वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासासाठी लखनौ येथे एक संस्था स्थापन झाली. त्यांनी इंग्रजीतून काही ग्रंथ लिहिले आहेत. १० एप्रिल, १९४९ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ लखनौच्या संस्थेला ‘बिरबल साहानी इन्स्टिटय़ूट ऑफ पेलीओबोटनी’ असे नाव दिले आहे.
– अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org