रोम वसले ते प्रथम टायबर नदीकाठी एका मोठय़ा उंचवटय़ावर. या उंचवटय़ाचे नाव पॅलेटाइन हिल झाले. सध्याच्या इटालीतील हा प्रदेश भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगत होता. काही शतकांतच रोमचे राज्य प्रबळ होऊन रोमन साम्राज्य हे जगातल्या मोठय़ा साम्राज्यांपकी एक झाले. रोमन राज्याचे प्रशासन प्रथम राजसत्ताक पद्धतीचे म्हणजे मोनार्ची पद्धतीचे, त्यानंतर अल्पसत्ताक म्हणजे ऑलिगार्चिक रिपब्लिक आणि नंतर एकाधिकारशाही म्हणजे अटोकट्रिक साम्राज्य अशी सत्तांतरे झाली. पश्चिम युरोप आणि भूमध्यसागरी प्रदेशांवर रोमन सत्तेचे वर्चस्व राहिले. पुढे हे साम्राज्य इतके मोठे झाले की, पूर्वेकडेही या साम्राज्याची एक शाखा काढावी लागली. ‘बायझंटाइन’ या पौर्वात्य रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल म्हणजे आजच्या इस्तंबूल येथे होती. रोमन राज्यात इ.स.पूर्व ७५३ ते ५०९ या अडीच शतकांच्या काळात सत्तेवर असलेल्या राजसत्ताक पद्धतीच्या राजवटीत सात राजे झाले. पुढच्या हजार वर्षांत रोमन राज्यामध्ये युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, न्याय आणि कायदेशास्त्र, भाषा आणि स्थापत्य या क्षेत्रांमध्ये जी भरघोस प्रगती झाली त्याचा पाया रोमन राजवट स्थापन झाली तेव्हापासूनच घातलेला दिसतो. रोमचा पहिला राजा रोम्युलसने रोम वसविताना दुसऱ्या प्रदेशांमधून हद्दपार झालेले, पळून गेलेले, गुन्हेगारी वृत्तीचे आणि गुलाम यांना रोममध्ये आणून रोमच्या सात टेकडय़ांपकी पाच टेकडय़ांवर वसाहती केल्या. राज्यातून चांगले सशक्त पुरुष निवडून सहा हजारांचे पायदळ आणि सहाशेंचे घोडदळ तयार केले. विद्वान, सुशिक्षित आणि कर्तृत्ववान असे शंभर लोक राजाला सल्लागार म्हणून निवडले. आणि तेच पुढे सिनेटर झाले. या शंभर लोकांना त्याने पॅट्रिशियन असे पद दिले. रोम्युलसने रोमच्या रहिवाशांचे तीन वर्ग केले. रोमन, सॅबियन्स आणि इतर. या तिन्ही वर्गामधून प्रत्येकी दहा प्रतिनिधी निवडून त्यांची जी सभा तयार झाली तिला त्याने ‘कोमिटा कुरिटा’ असे नाव दिले. विशेष म्हणजे या काळात बराचसा युरोपियन प्रदेश सांस्कृतिक, राजकीयदृष्टय़ा अत्यंत मागासलेला, हुणांसारख्या लुटारू टोळ्यांनी बेजार झालेला होता. अशा काळात रोमन राज्याचा झालेला विकास अद्भुतच म्हणावा लागेल.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com
गोरखचिंच

गोरखचिंचेचा वृक्ष आफ्रिकेतून भारतात केव्हा व कसा आला याबाबतीत मतभिन्नता आहे. एका मतप्रवाहाप्रमाणे मोगल सन्यातील अरबी व्यापाऱ्यांमार्फत गोरखचिंचेचा वृक्ष भारतात आला, तर दुसऱ्या बाजूला पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात हा वृक्ष भारतात आणला असावा असेही मत मांडले जाते. दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त गोरखचिंच बोत्सावाना, नामिबिया, मोझांबिका तसेच ऑस्ट्रेलियातही आढळतो.

या वृक्षाला त्याच्या फळाच्या आकारामुळे ‘कॅलाबाश ट्री’ असे म्हटले  जाते, तर गरामुळे  ‘क्रीम ऑफ टारटर’ असे संबोधले  जाते.  गोरखचिंचेची फळे माकडांना प्रिय असल्याने ‘मंकी ब्रेड ट्री’  म्हणूनही हा वृक्ष ओळखला जातो. नाथपंथी गुरू गोरक्षनाथांनी त्यांच्या शिष्यांना या वृक्षाखाली विद्यादान केले असे मानले जाते म्हणून ‘गोरखचिंच’ हे नाव पडले असावे.

८ ते १४ मीटर  उंचीचा हा एक मध्यम आकाराचा पानगळी वृक्ष आहे. खोडाच्या फुगीर भागाचा परिघ ३० मीटपर्यंत असू शकतो. गोरखचिंचेचा वृक्ष वर्षांतील जवळजवळ ९ ते १० महिने निष्पर्ण असतो. जाडजूड खोड पण त्यामानाने बारीक फांद्या, निष्पर्ण अवस्थेत मुळांप्रमाणे दिसतात. संपूर्ण वृक्ष उपडा टाकला आहे असा भास होतो. म्हणून या वृक्षाला ‘अपसाइड डाऊन ट्री’ असेही म्हणतात.

जाडजूड खोड राखाडी रंगाचे असते. पांढऱ्या, पाच पाकळ्यांची मांसल फुले झाडावर लांब देठाच्या साहाय्याने लटकलेली असतात. रात्री उमलणाऱ्या या फुलांना मंद सुगंध असतो. त्याकडे वटवाघळे आकर्षति होतात व पर्यायाने परागणास मदत होते. सकाळी ही फुले जमिनीवर पडतात. रंग भुरकट होतो आणि परिसरात दरुगधी पसरवतात.

फळे मोठी काकडीच्या आकाराची असतात. त्यावर लव असते.  पिकल्यावर टणक आणि भुरकट रंगाची होतात. फळे चवीला आंबट असतात. गरापासून शीतपेये तयार करतात. त्याच्यामुळे शरीरातील दाह कमी होतो.  फळातील किडणीसारख्या आकाराच्या बिया पिवळसर अशा गराने पूर्ण वेढलेल्या असतात. या बियांची उकडून भाजी करतात. पिकलेली फळे जमिनीवर पडल्यानंतर माकडे व माणसांद्वारे बियांचा प्रसार होतो.

सपुष्प वनस्पतींमधील सर्वात जास्त आयुष्य असल्याचा मान गोरखचिंचेला आहे. ऑस्ट्रेलियात सहा हजार वर्षे जुना असलेला गोरखचिंचेचा वृक्ष असल्याचे सांगण्यात येते.

–  डॉ. सी. एस. लट्टू (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org