रेशमी कापड जर पडद्यासाठी वापरले तर त्याच्यामागे साधे कापड लावावे म्हणजे पडदा नीट राहतो. हा पडदा मळल्यास तो धुण्यासाठी अनुभवी कारागिराची मदत घ्यावी लागते. असा पडदा घरगुती मशीनमध्ये धुता येतो. पडदा धुण्यासाठी ७.५ सामूचा (पी.एच.) निर्मलक (डिर्टजट) वापरावा. पडदा अगदी हळुवारपणे धुवावा.
भरजरी वस्त्रे धुताना आणखी वेगळी काळजी घ्यावी लागते, कारण त्यासाठी तलम रेशमी वस्त्राचा वापर केलेला असतो. त्यावर जरी, खडे, धातूची कलाकुसर केलेली असते. उदा. शेरवानी, अनारकली इत्यादी. ही वस्त्रे स्वच्छ करणे खूप अवघड असते. योग्य काळजी न घेतल्यास खडे/ धातू पडू शकतात, खराब होऊ शकतात किंवा कापड फाटू शकते. यासाठी ही वस्त्रे धुताना कुशल कारागिराची मदत घ्यावी आणि त्याच्या सूचनेप्रमाणेच ही वस्त्रे धुवावीत.
रेशमी सूट असेल तर तो पाणीविरहित पद्धतीनेच (ड्राय क्लीनिंग) स्वच्छ करावा. रेशीम हा प्रथिनापासून बनलेला तंतू आहे. त्यासाठी ७.५ पेक्षा जास्त सामू असलेला निर्मलक वापरू नये तसेच क्लोरिनचा वापरही अजिबात करू नये. रेशमी वस्त्रे थेट उन्हात वाळवू नयेत, त्याचा वाईट परिणाम होतो. रेशमी वस्त्राने घाम शोषल्यास तो कपडा लालसर होतो, त्यावर डाग पडतात आणि हे डाग तसेच राहतात. तसेच कपडा जीर्ण व कमकुवत होऊ शकतो. असा कपडा शक्य तितक्या लवकर स्वच्छ करावा. त्या पाण्यात सॉफ्टनर घातल्यास चांगले. काही बॉडी स्प्रेमध्ये रसायने असू शकतात, त्यामुळेही कपडा खराब होऊ शकतो.
रेशमी कपडय़ातील पाणी काढून टाकण्यासाठी धुलाई मशीनमध्ये ‘स्पिन’ करावे किंवा सुक्या सुती टॉवेलचा वापर करावा. ड्रायर मात्र कधीही वापरू नये. रेशमी कपडे कपाटात ठेवायचे असल्यास ते संपूर्ण स्वच्छ करून हँगरवर टांगून ठेवावे. काही काळ वापरला न गेलेला कपडा कपाटातून बाहेर काढून थोडा वेळ बाहेर ठेवून मग पुन्हा कपाटात ठेवावा. घडी घालून रेशमाचा कपडा ठेवल्यास दर १० ते १५ दिवसांनी घडी बदलली नाही तर घडीवर कपडा पिवळा पडतो. तो डाग निघत नाही इतकेच नव्हे तर तिथे कपडा विरून फाटूही शकतो.
विजय रोद्द (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – संस्थान धेनकनल
ओरिसातील कटक शहरापासून साठ कि.मी.वर असलेले जिल्ह्याचे ठिकाण धेनकनल येथे ब्रिटिशराज काळात संस्थानाचे मुख्यालय होते. या प्रदेशातील उत्कल राज्याच्या गजपती महाराजांचा दक्षिण विभागाचा सेनापती प्रताप रुद्र देव याने जगन्नाथ पुरीपासून जवळच्या धेनकनल या परगण्यावर आक्रमण करून त्याच्यावर अंमल केला. गजपती महाराजाने प्रताप रुद्रला धेनकनलचे राजेपद देऊन त्याच्या घराण्यातच मंत्रिपद (बेबार्ता) दिले. प्रताप रुद्र देव याने १५२९ साली धेनकनलचे राज्य स्थापन केले आणि चोख प्रशासनामुळे लोकप्रियता मिळविली. प्रजेने त्याला ‘महिंद्र बहादूर’ हा खिताब दिला.
पुढे रुद्र देव याच्या १७ पिढय़ांनी धेनकनलचे राजेपद भूषविले.
१९२६ साली राजा सूर्य प्रताप देव याच्या अकस्मात मृत्यूनंतर त्याचा मुलगा शंकर प्रताप याच्याकडे राजेपद आले. थोडय़ाच दिवसात शंकर प्रताप इंग्लंडमध्ये कायदेशिक्षण घेण्यासाठी रवाना झाला. जाताना त्याने नृसिंह प्रताप सिंह या आपल्या भावाकडे राज्यकारभार सोपविला. दुर्वर्तनी नृसिंहने या काळात प्रजेवर जुलूम, अत्याचार करून, पसे गोळा करून वेठबिगारी मजुरांकडून सक्तीने स्वत:साठी शंभर खोल्यांचा राजवाडा बांधून घेतला. आपल्या हालअपेष्टा राजा शंकर प्रताप लंडनहून परत आल्यावर संपतील या आशेवर जनता होती. परंतु शंकर प्रताप परतल्यावर त्यानेही जुलमी कारभार चालू ठेवल्याने लोकांनी बंड, दंगली सुरू केल्या. हरमोहन पटनाईक याने राजाला विरोध करण्यासाठी प्रजा मंडळ स्थापून त्याचे नेतृत्व केले. राज्यभर चाललेल्या दंगली आवाक्याबाहेर गेल्याचे पाहून राजाने ब्रिटिश लष्कराची मदत घेऊन हे बंड दडपले. बंडाचा नेता हरमोहन यास ब्रिटिशांनी सल्लागार पदावर नेमल्यावर राज्यात शांतता प्रस्थापित झाली.
१९४७ साली राजाने आपले संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. पुढे याच घराण्यातील शंकर प्रताप आणि राणी रत्नप्रभा या दोघांना ओरिसा विधानसभेचे निर्वाचित सदस्यत्व मिळाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com