रंग फिका झाल्यामुळे कापड खराब दिसते ते टाळायचे असेल तर रंगीत रेशमी वस्त्राची योग्य तऱ्हेने काळजी घेतली पाहिजे. रेशीम रंगवताना आम्लधर्मी रंगाचा वापर केला जातो. त्यामुळे गडद रंगाचा कपडा पाण्यात भिजवताना त्यामध्ये आधी अ‍ॅसिटिक आम्ल टाकावे आणि ते मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे, असे केल्यास रंग जाण्याचे प्रमाण खूप कमी होते. रेशमी साडी धुताना आम्ल व निर्मलक (डिर्टजट) या दोन्हीचे द्रावण केल्यास रंग पाण्यात कमी उतरतो. निर्मलकाच्या द्रावणाचा सामू (पी.एच.) ५.५० ते ७.५ इतकाच असावा. तुम्ही नेहमी वापरत असलेल्या निर्मलकाचे द्रावण सामूच्या या कक्षेत नसेल तर रेशमी वस्त्र खराब होऊ शकते. त्यामुळे वस्त्र द्रावणात बुडवण्यापूर्वी त्याचा सामू तपासणे गरजेचे आहे. घरगुती धुलाई यंत्रामध्ये रेशमी वस्त्र जास्तीत जास्त वेगाने एक मिनिट फिरवावे, मग हळुवारपणे झटकून वाळत घालावे. रंगीत वस्त्रे शक्यतो सावलीत वाळत घालावीत. बाजारात मिळणारे शर्टाच्या बाह्य़ा व कॉलर स्वच्छ करणारे रसायन वापरायला हरकत नाही, पण त्याचा सामू तपासून मगच त्याचा वापर करावा.
खादी रेशीम थोडे जाड असते पण ते जास्त नाजूक असते, त्यामुळे ते धुताना अधिक काळजी घ्यावी लागते.
पाणीविरहित स्वच्छता (ड्राय क्लिनिंग) आणि पाणी वापरून स्वच्छता यामध्ये काय फरक आहे ते जाणून घेतल्यास आपल्याला फायदा होईल. पाणीविरहित स्वच्छता प्रक्रियेत परक्लोरो इथिलिन हे द्रवरूप रसायन वापरले जाते. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नसतो. ही प्रक्रिया यंत्रातच होऊ शकते आणि हे यंत्र घरगुती वापरासाठी नाही. या रसायनामुळे काही रंग फिके पडू शकतात. तसेच काही प्रकारचे प्लास्टिक विरघळू शकते. त्याकरिता बटणे वगरेची काळजी घ्यावी लागते, तरीसुद्धा हाती स्वच्छ केलेल्या रेशमी कपडय़ापेक्षा या प्रक्रियेने स्वच्छ केलेले रेशमी कपडे चांगले स्वच्छ होतात. तसेच हे काम माहीतगार कारागिराकडून करून घेणे श्रेयस्कर ठरते. काही वेळा या प्रक्रियेसाठी पेट्रोलचा वापरही केला जातो, पण नंतर उग्र वास येतो.
परक्लोरो इथिलिन / पेट्रोल यांचा वापर केल्यास कपडा आटत नाही.
विजय रोद्द (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर – कुच बेहारचा राज्यकारभार
कुच बेहार संस्थानाचा शासक प्राण नारायण याने १६६५ साली औरंगजेबाचा सेनापति शाहिस्तेखान याच्याशी केलेल्या तहानंतर राज्याला स्थर्य आले. मधल्या काळात लष्करीदृष्टय़ा प्रबळ झालेल्या भूतानच्या राजाने १७७२ साली कुच बेहारवर आक्रमण केले. बक्सरच्या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने याच काळात बंगालमध्ये आपली राज्यसत्ता स्थापन केली होती. भूतानच्या राजाने केलेल्या चढाईत कुच बेहारचा राजा धीर राजेंद्र याच्या लक्षात आपली दुर्बलता आल्यावर त्याने शेजारच्या कंपनी सरकारच्या गव्हर्नरकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रिटिशांनी कुचबेहारच्या फौजेबरोबर आपली सन्य तुकडी पाठवून भूतानचा बीमोड केला.
या युद्धानंतर कुच बेहारचा राजा धीर राजेंद्रने पाच एप्रिल १७७३ रोजी कंपनी सरकारशी संरक्षण करार केला आणि कुच बेहार हे ब्रिटिश संरक्षित संस्थान बनले. ३४०० चौरस कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या कुच बेहार संस्थानाला ब्रिटिश राजसत्तेने १३ तोफांच्या सलामीचा मान दिला.
यानंतरचे ‘कर्नल’ महाराजा नृपेंद्र नारायण याची कारकीर्द सन १८६३ ते १९११ अशी झाली. त्यांच्या अल्पवयात त्यांच्याकडे राजपद आल्यामुळे राज्यकारभार आणि पालकत्व यांची जबाबदारी ब्रिटिश कमिशनरने पार पाडली. नृपेंद्रने आपल्या कारकीर्दीत राज्यात वेठबिगारी कायद्याने बंद केली. १८८८ साली व्हिक्टोरिया कॉलेज आणि पत्नीच्या नावाने सुनीती अकादमी हे महिला विद्यालय सुरू केले. कुच बेहार राज्य हे बिटिशराजची तत्कालीन राजधानी कलकत्त्याच्या समीप असल्याने ब्रिटिश उच्चपदस्थ आणि कुच बेहार राजघराण्यातील व्यक्तींचे परस्परांकडे जाणे-येणे होते. ब्रिटिशांच्या चालीरीती, शिष्टाचार यांचा प्रभाव कुच बेहार राजांवर पडला. राजा नृपेंद्र नारायण याने १८८७ साली आपला ‘व्हिक्टर ज्युबिली पॅलेस’ हा राजवाडा लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसच्या आराखडय़ाप्रमाणेच बांधला. अखेरचा कुचबेहार राजा जगदिपेंद्र नारायण याने आपले संस्थान १२ सप्टेंबर १९४९ रोजी स्वतंत्र भारतात विलीन केले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com