१९९३चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात डॉ. सीताकांत महापात्र आपले विचार मांडताना म्हणतात, उडिया कवी सरलादास यांच्या ‘महाभारता’च्या आदिपर्वात प्रथम अध्यायात ‘वाग्देवी’ला आवाहन केले गेलेले आहे. ज्यात तिच्या ‘अमृत-दृष्टी’चे, तिच्या मंगलमय दृष्टीचे वर्णन केले गेले आहे, ‘‘.. तू सर्वव्यापक आहेस. आदि, मध्य आणि अन्त, यामध्ये तूच आहेस. भूत, वर्तमान आणि भविष्यातील सर्व ग्रंथांचा उगमही तुझ्यात आहे.’’

माझ्यासाठी कविता ही चाळीस वर्षांचा शोध, अधुरेपणा, अपरिपूर्णता जे काही आनंददायी नव्हते, त्याला आणि अनुभवांच्या सतत नव्याने उमलणाऱ्या रूपांना काव्यबद्ध करण्यासाठी केलेल्या शब्दशोधाची गाथा आहे. कविता ही शब्दांची रचना आहे, तर शब्द सामाजिक स्मृतिचिन्ह. एका उत्तम कवितेत प्रत्येक शब्द काहीतरी बोलतो. प्रत्येक शब्द अपरिहार्य होतो. अद्वितीय होतो. एखाद्या कवितेत शब्द मौनातूनही बोलतात. कविता विद्यमान नसलेल्या गोष्टींनाही जन्म देते. अनुभवाच्या व्यग्रतेचं सिंहावलोकन कवितेला जन्म देतं. खरं म्हणजे कविता ही वेगवान क्षणात येणारे अनुभव पकडण्याचा एक प्रयत्न आहे. ती एखाद्या आठवणीचा आणि कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. जी एखाद्या घटनेचं किंवा वेगाचं वर्णन करते. ती साधारण अनुभवाला रहस्यमयता देते. त्याला एका चमत्कारात रूपांतरित करते. आमच्या युगाने आम्हाला कोणत्याही रूपातील रहस्याविषयी, आपल्या स्वत:च्या अस्तित्वाविषयी शोध घेण्यास शिकवले आहे. प्रत्येक निष्ठावान कवी हे जाणून असतो की ही विषमावस्था त्याचीही आहे आणि हा शोध भाषेच्या शुचितेसाठी केल्या जाणाऱ्या शोधाकडे त्याला अपरिहार्यपणे घेऊन जातो. भाषा ही दोन उद्देशांनी प्रेरित असते. एक ती व्यक्तीच्या अस्तित्वाच्या वयापर्यंत पोहोचते आणि त्याबरोबरच इतरांबरोबर संपर्क प्रस्थापित करण्यासाठीही ती उपयोगी पडते. शेवटी मी याच आशयाची माझी एक कविता उद्धृत करतो-

‘एक शब्द रचला जाईल

म्हणून रंग बदलेल आकाश हजार वेळा

वारा गाईल अनेक प्रकारची गीतं

समुद्र हसेल आणि रडेल सुद्धा

चातकाप्रमाणे वाट पाहात राहील..

एक शब्द रचला जाईल

त्यासाठी हवेत

शंभर जन्म आणि शंभर मृत्यू

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

हिमोसायटोमीटरचा निर्माता

लुईस चार्ल्स मलास्सेझ या फ्रेंच शास्त्रज्ञाचं नाव हिमोसायटोमीटर या उपकरणाच्या निर्मितीशी जोडलेलं आहे. खास रक्तपेशींची गणना करण्याच्या उद्देशानं लुईस चार्ल्स मलास्सेझ यांनी हे उपकरण तयार केलं होतं. पण आता शास्त्रज्ञ आणि डॉक्टर या उपकरणाचा वापर केवळ रक्तातल्याच नव्हे तर इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींची गणना करण्यासाठी करतात. विशेषत यीस्ट, शुक्राणू यांसारख्या पेशींची संख्या हिमोसायटोमीटरने मोजली जाते.

१८४२ साली फ्रान्समधील नेवेर्स येथे मलास्सेझ यांचा जन्म झाला. पॅरिस येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं. शरीराची अंतर्रचना आणि ऊतींचा अभ्यास या विषयातले ते तज्ज्ञ होते. सुरुवातीचा काही काळ पॅरिसमध्ये रुग्णालयात डॉक्टरांचा मदतनीस म्हणून काम केल्यानंतर त्यांनी फ्रँको- प्रुशिअन युद्धात वैद्यक तज्ज्ञ म्हणून काम केलं. पॅरिसला परतल्यानंतर त्यांनी क्लाऊडे बर्नार्ड, जीन मार्टनि चार्कोट आणि पिएरी पोतेन यांसारख्या ख्यातनाम वैद्यक तज्ज्ञांबरोबर काम केलं. १८७५ साली त्यांना ‘कॉलेज दि फ्रान्स’ या महाविद्यालयात शरीरशास्त्र अध्यासन हे महत्त्वाचं पद सन्मानपूर्वक देण्यात आलं. १८८४ साली ते ‘अ‍ॅकेडमी दि मेडिसिन’ या फ्रान्समधील संस्थेचे सदस्य झाले.

त्यांनी रक्ताच्या नमुन्यांवर बरंच संशोधन केलं आणि याच संशोधनादरम्यान त्यांनी रक्तातल्या पेशींचं मोजमापन करण्यासाठी हिमोसायटोमीटरची निर्मिती केली.  १८१७ साली ऑगस्टिन सेरेस यांनी मानवी दाताच्या मुळावर असणाऱ्या आवरणातील पेशींवर संशोधन केलं. या संदर्भात १८८४ साली मलास्सेझ यांनी अधिक सखोल संशोधन करून या पेशींचं परिपूर्ण वर्णन केलं. त्यामुळे या पेशींना ‘मलास्सेझ पेशी’ असं संबोधण्यात येतं.

इतकंच नव्हे तर मलास्सेझ यांनी कवकांवरदेखील संशोधन केलं आहे. त्यांनी संशोधन केलेल्या एका प्रकारच्या कवकाचं   शास्त्रीय नाव  त्यांच्या नावावरून ‘मलास्सेझिया’ असं नामकरण करण्यात आलं आहे. या मलास्सेझिया जातीच्या कवकाच्या पाच वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. त्यांपकी मलास्सेझिया फार्फार ही प्रजाती मानवी त्वचेच्या तेलकट पृष्ठभागावर वाढते आणि त्वचेतील तेल शोषून घेते. त्यामुळे त्वचेचा दाह निर्माण होतो.

प्रिया लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org