‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा हो काढिला, हात नगा लावू माझ्या साडीला.’ शांताबाई शेळक्यांनी अशी ताकीद का बरं दिली असावी? त्या मऊसूत रेशमी वस्त्राला आपला खरबरीत हात लागल्यानं त्याच्या सुळसुळीत मुलायमपणाला धब्बा लागेल म्हणून?

पण अशा स्पर्शानं त्याचा मुलायम पोत खरोखरच बिघडला आहे की काय, हे अजमावयाचं असेल, तर त्या मुलायमपणाचं मोजमाप तर करता यायला हवं ना? तेच तर ऑस्ट्रेलियातल्या डीकिन विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी केलंय. त्यातही गंमत म्हणजे हे सर्व वैज्ञानक चिनी वंशाचे आहेत. तेही रास्तच आहे म्हणा, कारण रेशमाचा वापर प्रथम सुरू केला तो चिनी मंडळींनीच. तेव्हा त्यांनाच त्याच्या पोताची जास्ती काळजी असावी, हे उघडच आहे. तर वस्त्राचा मृदूपणा जोखण्यासाठी त्यांनी एका साध्या भौतिकी तत्त्वाचा वापर केला. एखादा पदार्थ मऊसूत असतो, सुळसुळीत असतो म्हणजे काय होतं? तर त्याला पकडून ठेवणं जड जातं, कारण त्याचं मुळी फारसं घर्षणच होत नाही. तेव्हा घर्षणाची पातळी ही त्या वस्त्राच्या किंवा पदार्थाच्या मुलायमतेची निशाणी समजायला हरकत नसावी.

त्या घर्षणाच्या पातळीचं मोजमाप करण्यासाठी त्यांनी एक अतिशय साधं उपकरण बनवलं. त्यात त्यांनी टाचण्यांची एक रांग बनवली. तिच्यात समोरासमोर एकमेकींना समांतर अशा टाचण्या टोचलेल्या होत्या. ती रांग म्हणजे एक अरुंदशी बोळकांडी तयार झाली. आता ते वस्त्र त्या बोळकांडीतून ओढलं गेलं. जर ते मऊसूत असेल तर मग त्या टाचण्यांच्या घर्षणाचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडणार नाही आणि सहजगत्या ते त्याच्यातून पसार होईल. ते ओढण्यासाठी फारसा जोर लावावा लागणार नाही; पण जितकं घर्षण जास्त असेल तितकं त्याला पलतीरावर पोहोचवण्यासाठी अधिक जोरानं ते ओढावं लागेल. त्याच्या त्या प्रवासासाठी किती जोर काढावा लागतो, हे अर्थातच त्या घर्षणाचं म्हणजेच त्या वस्त्राच्या मुलायमतेचं मोजमाप झालं. आता अर्थात हा जोर लावण्याचं आणि मोजण्याचं काम संगणकाधिष्ठित यंत्रांवर सोपवलेलं आहे. जितका जोर कमी तितकं ते वस्त्र अधिक मुलायम. जितका जोर जास्त तितकं ते जाडंभरडं, मांजरपाटाच्या पंक्तीला जाऊन बसणारं. साधी पण चपखल आहे ना ही पद्धत.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गुरुदयालसिंह- विचार

१९९९चा ज्ञानपीठ  पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात गुरुदयालसिंह म्हणतात, ‘‘लिहिल्याशिवाय जगणं शक्य नाही का? हा प्रश्न मी स्वत:लाच विचारत आलेलो आहे. उत्तर नेहमी हेच मिळालं, की जर शक्य असतं तर या असाध्य रोगाला आमंत्रण दिलंच कशाला असतं? जसं जीवन जगलो त्याने लिहिण्याला भाग पाडलं, सोपं असं काहीच नव्हतं. संत कबीराने पहिल्यांदाच सांगून ठेवलं होतं. ‘‘सुखिया सब संसार है, खाने और सौवे! दुखिया दास कबीर है जागे और रोवे!’’ जो जागृत होईल तो रडेल देखील. अनुभव त्याला जागृत करेल आणि जीवनाबद्दलचं ज्ञान त्याला रडवेल. लिहिता-वाचताना जसजसं जीवनातलं वास्तव समजलं तेव्हा हे लक्षात आलं, की समाजातील बहुतेक दु:ख समाजामुळे आणि राज्यव्यवस्थेमुळेच निर्माण झालेले आहे, पण लोक त्यांना आपल्या नशिबाचा भोग मानताहेत. आमचे पूर्वज दीडशे-दोनशे वर्षांत इंग्रजांच्या शासनकाळात खूप उशिराने जागृत झाले.त्या वेळी शासनाने केलेले अत्याचार आणि लूट यामुळे जगणेही अशक्य झालेले होते. ऐतिहासिक आणि वर्तमानाची जसजशी माहिती मिळत गेली तसतशी बेचैनी वाढत गेली.

जेव्हा झोपू शकलो नाही तेव्हा जे करणं शक्य होतं ते केलं. आपल्या आसपास बघितलं तेव्हा या लोकांमधूनच काही पात्रं मिळाली. बहुतेक लेखकाच्या नजरेनंच शोधावी लागली, जी मिळाली त्यात ‘अण होए’ कादंबरीतील ‘तिशना’ आणि ‘परसा’ हेदेखील होते. परिस्थितीपुढे त्यांनी कधी गुडघे टेकले नाहीत. ते स्वत: जागे राहिले. मग आसपास झोपी गेलेल्यांनाही त्यांनी झोपू दिलं नाही. आपल्या दु:खाला आपलं नशीब मानून ते कधी गप्प बसले नाहीत. लेखणी उचलताना अजून एक संकल्प केला होता, की ज्यांना आपल्या जीवनातल्या वास्तवाची जाण आहे आणि आपल्या शक्तीचा अंदाज आहे अशाच लोकांच्या सुखदु:खाच्या कथा मी लिहीन.

व्यवस्थेचा खोटा चेहरा ओळखण्याचे सामर्थ्य आणि साहस ज्यांच्यामध्ये असेल, त्यांच्याबद्दलच लिहीन. त्यामुळेच जे काही लिहिलं ते या संकल्पाशी एकनिष्ठ राहिल्याचा परिणाम असावा.

मी आपलं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करीत राहिलो. जे करू शकत होतो ते केले. जितका वेळ उरलाय- किती वेळ उरलाय हे कुणी सांगू शकत नाही. त्यातदेखील सावधपणे चालण्याचा संकल्प आहे. जर तुम्हाला आणि माझ्या वाचकांना माझ्या साहित्याद्वारे हे रहस्य समजावून देण्यात मी अपयशी ठरलो असलो तर तुम्ही मला मूढ समजून क्षमा करा. छ’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com