पिकांना लागणारी अन्नद्रव्ये मातीमध्ये उपलब्ध आहेत किंवा नाहीत, त्यांचे प्रमाण किती आहे, जमीन पीक लागवडीस योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याचे परीक्षण करतात. याद्वारे मातीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश तसेच विद्राव्य सार, सामू (पीएच्) यांचे तपासतात. सामू आणि विद्राव्य क्षार या घटकांवरून जमीन आम्ल अथवा विम्ल आहे, ती किती क्षारीय (क्षारपड) आहे ते कळते. यावरून जमिनीत पिकासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय योजता येतात. माती परीक्षणाचा हाच प्रमुख उद्देश आहे.
 पिके त्यांना लागणारी पोषणद्रव्ये जमिनीतून शोषण करीत असतात. जमिनीत या अन्नद्रव्यांचा उपलब्ध साठा फारच कमी असतो. सतत पिके घेत गेल्याने कालांतराने जमिनीतून पिकांना होणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे नंतरच्या पिकांची वाढ नीट होत नाही. उत्पादनात घट होते. म्हणून, रासायनिक खतातून ही द्रव्ये पिकांना पुरविणे भाग पडते. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीपकी रासायनिक खत हे महागडे साधन आहे. म्हणून, पिकांना हे खत देताना गरजेपुरतेच वापरले, तर शेतीखर्चावरील ताण कमी होऊ शकतो.
माती परीक्षणाच्या अहवालावरून पिकासाठी नत्र, स्फुरद व पालाश खतांच्या मात्रेसंबंधी शिफारस करता येते. त्यामुळे पिकांना खते योग्य प्रमाणात व योग्य वेळी देता येतात. याचा फायदा म्हणजे, खतावर होणाऱ्या खर्चात बचत होते आणि उत्पादन अधिक फायदेशीर होते.

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २७ फेब्रुवारी
१८६० > वैदिक वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, प्राध्यापक वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म ‘निरुक्तांचे मराठी भाषांतर’ (पाने १४०५) हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. त्याशिवाय त्यांनी समीक्षाही केली.
१९०५ > ‘मराठी भाषेची लेखन पद्धती’, ‘हिंदुस्थानात एक भाषा होईल की नाही’, आदी ग्रंथांचे कर्ते शंकर रामचंद्र हातवळणे यांचे निधन.
१९१२ > ‘ज्ञानपीठ’भूषित कवी आणि नाटककार कुसुमाग्रज (विष्णु वामन शिरवाडकर) यांचा जन्म. त्यांचे विशाखा, प्रवासी प्रक्षी, पांथेय आदी कवितासंग्रह – ‘गर्जा जयजयकार’ सारख्या प्रेरक कविता आणि कौंतेय, जिथे गवताला भाले फुटतात, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, महंत आदी नाटके सुपरिचित आहेत; तर कथासंग्रह किंवा ‘कल्पनेच्या तीरावर’सारखी वाचनीय कादंबरी अपरिचित! साहित्यिक म्हणून जगलेल्या तात्यासाहेबांनी पत्रकारिताही केली होती. कुसुमाग्रजांचा जन्मदिन ‘मराठी भाषागौरव दिवस’ म्हणून साजरा होतो.
१९२६ > लोकप्रिय कथा-कादंबरीकार ज्योत्स्ना देवधर यांचा जन्म. १८ कथासंग्रह व १७ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, त्यापैकी ‘उत्तरयोगी’ (योगी अरविंद घोष) आणि रमाबाई (पंडिता रमाबाई) या चरित्रकादंबऱ्या आहेत.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                                                       जळवात  : भाग  १
काही रोग हे रोग नसतात. त्यांना आपण रोग बनवितो. जळवात त्यातलाच एक प्रकार आहे. तळहात व तळपायांची वेळीच काळजी घेतली, तर जळवात होणारच नाही. पाण्याच्या कामातून बाहेर आल्यावर पाय पुसणे, तळपायाला अधूनमधून तेलातुपाचा हात लावणे, पायात बंद पायताण असणे. डोक्यावर टोपी असणे, ऊन टाळणे, अशा कैक गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत.  नाही तर हातापायाची, सर्वागाची जळजळ व त्यामुळे तळपायास भेगा पडून वातविकार उत्पन्न होतो. पित्ताची जळजळ व वाताची रुक्षता अशा दोन्ही गोष्टींचा संगम असतो म्हणून त्यास जळवात म्हणतात.
आयुर्वेद परिचय या नावाने आम्ही वर्ग चालवीत असतो. त्या वर्गात येणाऱ्या एका बाईंनी आपल्या मुलीची जळवाताची पायाची भेग बरी करून दाखवाल का? असे थोडे आव्हानात्मक विचारले. काही विकारांत स्वयंसेवेचा भाग जास्त असतो. औषधे फार थोडी लागतात. या माझ्या सल्ल्याप्रमाणे त्या बाईंची मुलगी दुसरे दिवशी सकाळी उपस्थित झाली. तिच्या हातात काशाची वाटी व शतधौतघृताची डबी दिली. नेटाने १०-१५ मिनिटे शतधौतघृत काशाच्या वाटीने घासून तिने पादपूरण हा उपचार केला. याप्रकारे नियमितपणे चार-आठ दिवस स्वत:ची सेवा स्वत:च केल्याने जळवाताची ती भेग केव्हाच बरी झाली. फार वर्षांपूर्वी काशाची भलीमोठी थाळी जळवात विकाराकरिता आम्ही मुद्दाम विकत घेतली. थाळीत शतधौतघृत टाकायचे. स्टुलावर बसून खाली ठेवलेल्या थाळीमध्ये तळपाय फिरवून फिरवून घासत राहायचा. ज्यांच्या जवळ भरपूर मोकळा वेळ आहे व विकार गंभीर स्वरूपाचा आहे; अशा मोजक्या रुग्णांना या उपचारांचा लाभ चारदोन दिवसांत झाला.  जळवाताची कारणे: उष्ण, तीक्ष्ण, तिखट, गरम पदार्थ वरचेवर खाणे; उन्हात, अग्नीजवळ सतत काम, अनवाणी चालणे, शेतात राडारोडय़ांत, गारठय़ात कचऱ्यात सातत्याने काम; पाण्यात काम केल्यावर पाय न पुसणे; जागरण, चिंता, अति श्रम, आहारांत स्निग्ध पदार्थाचा अभाव. तेल तूप खा, बरे व्हा!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      मेंढा आणि मेंढी
अमेरिकेतली गोष्ट आहे. एक जोडपं होतं. एकमेकांवर अतिशय प्रेम. शहरापासून दूरवर पंधरा खोल्यांचे घर. मागे अरण्य वाटावे असे दृश्य. शिवाय तरणतलाव म्हणजे २६्र्रेल्लॠ स्र्’ ही होता. गाडय़ा चार होत्या. एखाद दुसरी मोडली तर गैरसोय नको. हा आठवडय़ातून दोनदा उशिरा घरी येत असे तेव्हा ही न जेवता थांबत असे. एकंदरच दृष्ट लागावी असे जीवन आणि एक दिवस अघटित घडले. घरी येताना याच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात तो गेला. हिला आभाळ कोसळले. कामावरच्या बायकांना तिची स्थिती बघून काळजी वाटू लागली आणि त्यांनी तिला दु:खावर काबू मिळवण्यासाठी एका मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. त्याने तिची समजूत घातली. तिला औषधे दिली. ही थोडी सावरली पण दर काही दिवसांनी दु:खाचा उमाळा येत असे म्हणून दर पंधरवडय़ाला त्या तज्ज्ञाकडे जाण्याचं जणू रतीबच तिने चालू केला.
तिथे एक तरुण मुलगीही येत असे. अशीच रडत असे. दोघांचा दिवस एकच होता आणि ही आपली बाई थोडी मोठी म्हणून ती त्या तरुणीची समजूत घालत असे. या तरुणीचा अनेक वर्षांचा मित्र असाच अचानक गेला होता तेव्हा तिचीही स्थिती तशीच होती. पुढे या दोघींची गट्टी जमली. आपापल्या पुरुषांच्या गोष्टी एकमेकांना सांगत असत आणि एक दिवस माहितीच्या आदानप्रदानात एकदमच भांडे फुटले.
असे उघडकीस आले की त्यांच्या आयुष्यातला पुरुष एकच होता. हा आठवडय़ातून दोन-तीनदा उशिरा घरी येणारा नवरा त्या मुलीचा त्या काळातला प्रियकर होता. आता हे दोन दु:खी जीव समदु:खीही झाले. चवताळले आणि ज्याला स्तुतिसुमनांनी मढवले होते त्याला या दोघी आता हलकट, डुक्कर, नीच अशा स्त्रीसुलभ शिव्या देऊ लागल्या. या चवताळल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली. वस्तुस्थितीची जाणीव झाल्यामुळे या दोघीही तडकाफडकी बऱ्या झाल्या. वाईट गोष्ट अशी झाली की तो डॉक्टर पैसे देणाऱ्या दोन पेशंटना मुकला.
दहाएक वर्षांपूर्वी ही गोष्ट मी इंग्लंडमध्ये माझ्या मित्राच्या घरी ऐकली. त्याची बायको स्वयंपाक करत होती, पण कान टवकारून ऐकत होती. जेवण झाल्यावर आम्हा दोघांना टुकटुक माकड करत म्हणाली, आता आम्हा बायकांना तुम्हा पुरुषांची गरज नाही. आम्हाला तुमच्याशिवाय, एवढेच काय तर टेस्टटय़ूब बेबी ही प्रक्रिया केल्याशिवाय मुले होण्याची सोय झाली आहे. ती उल्लेख करत होती ‘क्लोनिंग’ द्वारे झालेल्या डॉली नावाच्या मेंढीचा. जिच्या त्वचेच्या साध्या पेशीमध्ये आवश्यक ते बदल करून त्या तिच्या गर्भाशयात ढकलण्यात आल्या आणि त्यातून तिला एक छोटीशी मेंढी झाली होती. मुलगीच झाली हो! आता उरला बिनकामाचा मेंढा!
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com