‘पिआझ्झा डी मिराकोली’ ऊर्फ ‘स्क्वेअर ऑफ मिरॅकल्स’ हा पिसा शहरातल्या काही इमारतींचा समूह आहे. पिसाच्या या चमत्कार क्षेत्रातील नऊशे वर्षांपूर्वी बांधलेल्या पिसाचे कॅथ्रेडल, बाप्टिस्ट्री, चर्चचे घंटाघर म्हणजे प्रसिद्ध कलता मनोरा आणि सेमिट्री म्हणजे स्मशान यांचा समावेश होतो. या इमारती अंतर्भूत असलेल्या लांबट चौकोनी परिसराचा उल्लेख इटालियन साहित्यिक गॅब्रिएल डी अन्झिओ याने १९१० साली लिहिलेल्या आपल्या कादंबरीत पिआझ्झा डी मिराकोली म्हणजे चमत्कारांचा चौक असा उल्लेख केलाय. प्राचीन काळापासून युरोपमधून जेरुसलेमकडे जाणारे यात्रेकरू, ग्रीस आणि इस्तंबुलकडे जाणारे व्यापारी यांचा मार्ग पिसावरून जाई. जाता-येता दोन-चार दिवसांचा मुक्काम पिसामध्ये करण्याचा त्यांचा प्रघात होता. अशा लोकांसाठी एक चांगलेसे चर्च पिसामध्ये हवे, असे प्रशासनाच्या नियोजनात होते. पिसाच्या आरमाराने १०६३ साली दक्षिण इटालीतील सिसिली बेटावरील पाल्रेमो राज्यावर केलेल्या हल्ल्यातून भरपूर लूट मिळाली. या लुटीतून मिळालेल्या प्रचंड खजिन्यातून चमत्कार क्षेत्रातल्या इमारती बांधल्या गेल्या. या इमारतींपकी प्रमुख इमारत सांता मारिया असुंता या कॅथ्रेडलच्या बांधकामाला सुरुवात झाली १०६४ साली. या चर्चचा वास्तुविशारद होता बुशेटो. संपूर्ण संगमरवरात बांधलेले हे चर्च रोमन वास्तुशैलीत बांधलेला एक उत्तम नमुना आहे. पिसाचे ग्रामदैवत सेंट रेनिएरी याचे काही अवशेष यात ठेवले असल्याने या चर्चला महत्त्व असून या चर्चमध्ये आर्चबिशपचे कार्यालयही आहे. १०९२ साली चर्चचे बांधकाम पूर्ण झाले. या कॅथ्रेडलमधील सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे प्रसिद्ध वैज्ञानिक गॅलिलिओला इथे लागलेल्या शोधाची. या चर्चच्या छताला दोरीने टांगलेला मेणबत्तीचा दिवा जोराच्या वाऱ्याने हेलकावे खाऊ लागला. तिथे असलेल्या गॅलिलिओचे कुतूहल चाळवले गेले आणि त्याने प्रत्येक हेलकाव्याला लागणारा वेळ मोजून त्यावरून एक वैज्ञानिक सिद्धांत मांडला. हाच सिद्धांत पुढे ‘आयसोक्रोनिझम ऑफ दी पेंडिल्यूर मूव्हमेंट’ या नावाने प्रसिद्ध झाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

शतावरी

शतावरीस संस्कृतमध्ये ‘नारायणी’ म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अस्पॅरेगस रेसिमोसस असून ही पर्णहीन, काटेरी, बहुवार्षकि वेल आहे. खोडावर  वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ म्हणतात. त्या पानांप्रमाणे दिसतात. लांब फांद्यांवर पेरावर टोकदार, वाकडे काटे असतात. शतावरी आधारास गुंडाळून घेते व वर चढते आणि अनेक फांद्या तयार होऊन लहान काटेरी झुडूप तयार होते. शतावरीची मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झुपक्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या फुटतात. मुळांच्या वर पातळ करडय़ा रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो. मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो, शतावरी ही औषधी वनस्पती उष्ण व समशीतोष्ण हवामानात समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर सर्वत्र आढळते. सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगा, कोकणात शतावरीच्या वेली खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर तसेच जंगलातही आढळतात. या वनस्पतीस जून ते ऑगस्ट महिन्यात फुले-फळे येतात. हिची लागवड बियांपासून व जमिनीतील खोडाच्या फुटव्यापासून करता येते.

शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने मिळवतात. शतावरीपासून शतावरी घृत, विष्णू तेल, प्रमेह मिशतेल तयार केले जातात. शतावरीचे नारायण तेल हे अर्धाग व संधिवातासाठी उपयुक्त आहे. शतावरीचे कोवळे कोंब भाजी म्हणून वापरतात. त्यांना चांगली चव असून त्यात व्हिटॅमिन ए व सी असते. यात पिष्टमय पदार्थ नसतात. तसेच त्यात कॅलरीज कमी असतात. मूत्राशयाच्या रोगांवर व दुग्धवर्धक म्हणून शतावरी अत्यंत उपयुक्त आहे.

शतावरीची लागवड केल्यानंतर ती सतत १४-१५ वष्रे जमिनीत टिकून राहते व बागायती असल्याने उत्पन्न येणे चालू राहते. लागवडीनंतर एका वर्षांने कोंब तयार होतात. भारतातील सर्व फार्मसीमधून शतावरीच्या मुळ्या विकत घेतल्या जातात, तसेच भारताबाहेरही त्यांना मागणी आहे. अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी या तिन्ही औषधशास्त्रात शतावरीच्या मुळ्या वापरल्या जातात.

शुभदा वक्टे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org