Bakharसंस्थानांची बखर : किशनगढची मोनालिसा – बणीठणी

राजस्थानातील किशनगढ संस्थानामध्ये अठराव्या शतकाच्या मध्यावर महाराजा सामंतसिंग यांच्या राजाश्रयामुळे ‘किशनगढ शैली’तील ‘बणीठणी’ या एका आगळ्या चित्राचा उगम झाला. या चित्रशैलीचे विशेष म्हणजे त्यातले उंच, उभट मानवी चेहरे, उंच मान, लांब मत्स्याकृती डोळे, हनुवटी आणि नाक टोकदार, पातळ ओठ आणि हिरव्या रंगाचा सढळ वापर होत. पाश्र्वभूमीला एक सुरेखसे निसर्गदृश्य हमखास असणारच. किशनगढ आणि आसपासच्या राज्यांत १९ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ‘बणीठणी’ची चित्रे कागद, कापड, लाकूड आणि संगमरवरावर साकार होत होती. किशनगढ शैलीत १८२० मध्ये तयार केले गेलेले चित्रमय गीतगोिवद याच पद्धतीने रेखाटले गेले आहे.
किशनगढ शैलीच पुढे ‘बणीठणी चित्रशैली’म्हणून ज्या चित्रामुळे ओळखली जाऊ लागली, त्या चित्राच्या निर्मिती मागचे निमित्तही थोडे रोमांचक आहे. महाराज सामंतसिंगांच्या दरबारात बणीठणी ही गायिका व कवयित्री होती. महाराज तिच्या गायकीवर, विशेषत भावुक डोळ्यांवर फिदा होते. महाराज स्वत ‘नागरीदास’ या नावाने काव्यरचना करीत. त्यांचा दरबारी चित्रकार निहालचंद याला महाराजांनी राधा-कृष्णांची चित्रे काढून त्यांच्या महालात लावण्यास सांगितली.
निहालचंदने बणीठणी गायिकेच्या चेहरेपट्टीला प्रमाण धरून काढलेली राधेची चित्रे पाहून महाराजा अत्यंत खूश झाले. त्यांनी मग बणीठणी प्रमाणे दिसणाऱ्या राधेची अनेक चित्रे काढून घेतली आणि ही एक नवीनच चित्रशैली उदयाला आली. भारत सरकारने त्या राधेचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटही काढले आहे. राधेच्या त्या बणीठणी शैलीच्या चित्राला काही युरोपीय कला-इतिहासकार व समीक्षकांनी ‘किशनगढची मोनालिसा’ म्हटले आहे.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल
तिरकी वीण किंवा ट्विल वीण vin
साध्या विणीपेक्षा ही वीण कमी घट्ट असते. ताणा आणि बाणा यांचे छेदनिबदू या विणीत साध्या विणीपेक्षा कमी असतात. या विणीमुळे कापडात तिरप्या रेषा दिसतात, तयार होतात. पूर्वी प्रचलित असलेल्या ड्रिल, गॅबर्डीन इत्यादी सूटिंगच्या प्रकारात याचा वापर होतो. त्या कापडात या रेषा ठळकपणे दिसतात. या रेषा एक तर डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे यांपकी एक प्रकारच्या असतात. समतोल ट्विलसाठी कमीतकमी चार ताणे आणि चार बाणे यांच्यानंतर पुनरावृत्ती करावी लागते, तर असमतोल ट्विलसाठी कमीतकमी तीन ताणे आणि तीन बाणे यानंतर पुनरावृत्ती व्हावी लागते. समतोल ट्विलमध्ये ताणा व बाणा एकाच सुतांकाचा घेऊन ताण्याची व बाण्याची घनताही समान ठेवतात. तर असमतोल ट्विलमध्ये ताण्याचे प्राबल्य असेल तर ताण्याची घनता बाण्याच्या घनतेपेक्षा जास्त ठेवतात. त्याउलट बाण्याचे प्राधान्य असेल तर बाण्याची घनता ताण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. यामध्ये डिझाइन वेगवेगळे घेऊन विविधता आणता येते. सध्या लोकप्रिय असलेल्या डेनिम, जीन, इत्यादी कापडात तसेच शाल, ब्लँकेट, सूटिंग या प्रकारच्या कापडामध्येही या विणीचा वापर होतो. तिरप्या रेषा ही या कापडातील विणीचा दृश्य परिणाम आहे. त्याद्वारे कापड अधिक आकर्षक बनवता येते. कापडातील ताण्याची किंवा बाण्याची घनता वाढवून कापडाचे वजन वाढवता येते. साध्या विणीपेक्षा या कापडाचा झोळ (ड्रेप) चांगला असतो. मध्ययुगीन काळात पौर्वात्य आणि पाश्चात्त्य देशात टेबलावरचे आच्छादन, गाद्यांवरील चादरी, शाल वगरेमध्ये या विणीचा सर्रास उपयोग केला जात होता.
या विणीमधे नियमित वीण आणि अनियमित वीण असे दोन प्रकार आहेत. नियमित विणीमध्ये तिरपी रेषा सलग दिसते तर अनियमित विणीत ही तिरपी रेषा तुटक दिसते. या विणीत विविधता आणताना तिरप्या रेषांचा किनारीशी होणारा कोन बदलला जातो. साधारण ट्विल वीण असेल तर तिरप्या रेषांचा कोन किनारीशी ४५ अंशांचा असतो. पण हाच कोन ४५ अंशांपेक्षा कमी असेल तर त्याला आडवी ट्विल (फ्लॅट ट्विल) आणि हा कोन ४५ अंशांपेक्षा जास्त असेल तर त्याला उभी ट्विल (स्टीप ट्विल) असे म्हणतात. हा परिणाम साधण्यासाठी ताण्याची व बाण्याची घनता कमी जास्त करणे आणि ट्विल विणीमधील गुंतणूक िबदूची चाल बदलणे अशा पद्धतींचा वापर केला जातो.
सतीश भुटडा (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org