सुधारित व्हिस्कोज प्रकारात मोडणाऱ्या आणि ‘मोडाल’या ब्रँडनावानेच सर्रास ओळखल्या जाणाऱ्या तंतूंचे कापूस, लोकर व इतर तंतूंबरोबर सहज व चांगले मिश्रण करता येते आणि वापरता येते. मोडाल तंतू जलाकर्षक असून कापसापेक्षा ५०% अधिक बाष्प धारण करू शकतो. या तंतूंपासून बनविलेल्या कापडाला घर्षण रोधन क्षमता अतिशय चांगली असते आणि म्हणून या तंतूपासून तयार केलेले कपडे चांगले हवेशीर असतात. या सर्व गुणधर्मामुळे मोडाल तंतूंपासून बनवलेले कपडे क्रीडापटू खेळताना तसेच सर्वच व्यक्ती व्यायाम करताना वापरू शकतात. याचप्रमाणे या तंतूचा वापर आरोग्यदायी कपडे तयार करण्यासाठीसुद्धा होतो. या तंतूपासून बनवलेल्या कापडाचा उपयोग टॉवेल, अंतर्वस्त्र, चादरी (बेडशीट)वगरेसाठी केला जातो.
मोडाल तंतूंच्या कपडय़ांवर कापसाच्या कपडय़ांच्या तुलनेत जिवाणूंची वाढ कमी प्रमाणात होते. याचा फायदा ग्राहकाला होतो. यामुळे हे कपडे सुती कपडय़ांपेक्षा अधिक टिकाऊ ठरतात आणि याचा आकर्षकपणा कमी होत नाही. घर्षणाने हे कपडे फिके पडत नाहीत, तसेच या कपडय़ावर गुठळी धरण्याचा दोषही आढळत नाही. मोडाल तंतूंपासून बनवलेल्या कपडय़ांना आकर्षक रंगाने रंगवता येते आणि अनेक वेळा धुतल्यानंतरसुद्धा या कपडय़ांचा आकर्षकपणा टिकून राहतो.
या तंतूंपासून तयार केलेले कपडे जड पाण्यात धुतले तरी चालतात. जड पाण्यातील क्षार या कपडय़ांना चिकटत नाहीत. या तंतूपासून तयार केलेले कपडे कोमट पाण्यात धुवावे तसेच धुतल्यानंतर सुती कपडय़ाप्रमाणे इस्त्री करावी. या कपडय़ाचा स्पर्श मर्सराइझ केलेल्या सुती कापडापेक्षाही मऊ असतो. हा स्पर्श रेशमी कापडासारखा असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच या कापडाला चांगला चमकदारपणा असतो. हे कपडे सुती कापडाप्रमाणे आटत नाहीत. या तंतूंच्या विविधांगी गुणधर्मामुळे अंगावर घालायच्या कपडय़ाप्रमाणेच या तंतूचा वापर औद्योगिक क्षेत्रातही केला जातो. तसेच तांत्रिक क्षेत्रातही याचा वापर करतात. उदाहरण म्हणून कन्व्हेअर बेल्ट्स, एक्सॉस्ट्स आणि वॉिशग टय़ूब पाइप यांचा उल्लेख करता येईल.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ‘संरक्षित संस्थान’ कुरवाई
सध्या मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात असलेले कुरवाई शहर स्वातंत्र्यपूर्व काळातील कुरवाई संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. मोहम्मद दिलेरखान हा अरकझाई टोळीचा अफगाण सनिक मोगल सन्यात एक सेनाधिकारी होता. भोपाळचा नवाब दोस्तमुहम्मद खान याचा दिलेर हा चुलतभाऊ. १७१३ साली दिलेरखानने कुरवाई आणि आसपासची चोवीस गावे घेऊन तिथे आपला अंमल चालू केला. मोगल बादशहाला ठरावीक खंडणी देऊन त्या प्रदेशात दिलेरने आपले छोटे राज्य वसविले. प्रथम बादशाहशी असलेले दिलेरचे संबंध पुढे बिघडले आणि त्यातच त्याचा खून झाला.
 दिलेरखानाचा मुलगा इज्जतखान हा मराठय़ांकडे एक सेनाधिकारी म्हणून नोकरी करीत असे. १७६१ साली पानिपतच्या लढाईत इज्जतखान मराठय़ांच्या बाजूने प्रथम लढला. सुरुवातीस झालेल्या जबर जखमांमुळे अत्यवस्थ झालेल्या इज्जतखानच्या मामाने मलमपट्टी करून त्याला अहमदशाहच्या बाजूने लढण्यास सांगितले. त्याप्रमाणे लढल्यावर तो कुरवाईस परतला.
इज्जतखानच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुरमतखान याचा मराठय़ांशी संघर्ष होऊन मराठय़ांनी त्याला कैद केले. तुरुंगातील छळामुळे त्याने मराठय़ांना १८ गावे आणि तीन लाख रुपये खंडणी देऊन स्वत:ची सुटका करून घेतली. सुटका झाल्यावर कुरवाईच्या नवाब हुरमतखानने मराठय़ांच्या आक्रमणाच्या भीतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीशी ‘संरक्षण करार’ करून त्यांची तनाती फौज राखणे सुरू केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com