मराठे आणि पिंढारींच्या सततच्या जाचाला त्रासून रीवा संस्थानच्या शासकांनी कंपनी सरकारबरोबर संरक्षण करार केल्यावर शासकांनी संस्थानाला उत्तम प्रशासन दिले. राजा रामचंद्रसिंह वाघेला हा अभिजात संगीताचा जाणकार आणि चाहता होता. त्याने अनेक संगीतकारांना आश्रय दिला. रामचंद्रने तन्नू मिश्रा ऊर्फ तानसेन याला वृंदावन येथून पाचारण करून आपल्या दरबारी गायक म्हणून नेमणूक केली.
बादशाह अकबर आणि राजा रामचंद्रसिंह हे दोघे घनिष्ठ मित्र होते. वरचेवर ते एकमेकांकडे जात. एकदा अकबराच्या इच्छेखातर रीवा येथे झालेल्या संगीताच्या मफिलीत तानसेनच्या गायकीने अकबर एवढा मंत्रमुग्ध झाला की, त्याने तानसेनाला आपल्याबरोबर येऊन आग्य््राातील मोगल दरबारात राजगायक होण्याची गळ घातली. परंतु तानसेनसारख्या अद्वितीय गायकाला सोडण्याची राजा रामचंद्रची तयारी नव्हती. त्यामुळे रामचंद्र आणि अकबर यांच्यामध्ये खटके उडून हे प्रकरण युद्धापर्यंत जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेरीस तानसेननेच आपण मोगल दरबारात जाण्यास तयार आहोत असे सांगितल्यावर हे प्रकरण मिटून मियाँ तानसेन मोगल दरबारी रुजू झाला.
अकबराच्या दरबारातील नवरत्नांपकी बिरबल हा चाणाक्ष आणि मुत्सद्दी रीवा जिल्ह्य़ातीलच सिधी येथील राहणारा होता. अकबराने रीवा शासकांकडून तानसेन आणि प्रसिद्ध माणिक ‘अलवाल’ आपल्या दरबारात नेले. महाराज रामचंद्र पुढे प्रयाग येथे गेले असता अकबराने त्यांना खास पाचारण करून फत्तेपूर सिक्री येथे स्वागत केले. तानसेनसारखा महान गायक आपल्याला मिळाला म्हणून अकबराने रामचंद्राचे आभार मानून त्यांना ‘राजेंद्र शिरोमणी’ हा किताब, १०१ घोडे तसेच इटावा हा परगाणा व तोफ भेट म्हणून दिली.
 सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – कृत्रिम लोकर – अ‍ॅक्रिलिक
nav01नसíगक तंतूत जसे विविध गुणधर्माचे तंतू असतात तशीच विविधता मानवनिर्मित तंतूतही असावी असे प्रयत्न शास्त्रज्ञांनी केले. यातूनच लोकरीशी साधम्र्य असणाऱ्या अ‍ॅक्रिलिक या तंतूची निर्मिती झाली. सुरुवातीला या तंतूच्या निर्मितीसाठी शंभर टक्के अ‍ॅक्रिलोनायट्राईल या रसायनाचा वापर केला गेला. विविध प्रक्रियांमध्ये हा तंतू त्रासदायक ठरला. मग अ‍ॅक्रिलोनायट्राईलचे प्रमाण ८५ ते ९० टक्के ठेवून आणि काही अन्य रसायने मिसळून तंतूनिर्मिती केली गेली. आश्चर्य म्हणजे मूळ प्रश्न सुटून या तंतूला व्यापारी मान्यता मिळाली. अ‍ॅक्रिलिक तंतू वजनाला हलका, पण फुगीर असतो. शिवाय मुलायम स्पर्श, शुभ्रता, चकाकी यामध्येही हा तंतू विशेष असतो. रंगाईसुलभता, उत्तम दर्जाची आद्र्रतावाहकता, सूर्यप्रकाश तसेच बुरशी व किटाणू यांच्या विपरीत परिणामांपासून अलिप्तता इत्यादी गुणधर्मामुळे अ‍ॅक्रिलिकचा वापर विशिष्ट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर केला जातो.
थंडीच्या ऋतूतील स्वेटर, मफलर, जर्सी, शाल, ब्लँकेट इत्यादी प्रावरणांसाठी या तंतूचा वापर होतो. खेळाडूंना खेळताना अधिक घाम येतो, तो सुलभतेने वाहून नेण्याकरिता खेळाडूंचे टी शर्ट, ट्रॅकसूट, जॅकेट यातही अ‍ॅक्रिलिकचा वापर होतो. या तंतूपासून बनवलेल्या साध्या आणि तुऱ्याच्या गालिच्यांना जोरदार मागणी असते. एके काळी पॉलिएस्टर/ लोकर या मिश्र सुतांपासून बनवलेल्या सुटिंगला अधिक मागणी असे. या क्षेत्रातही पॉलिएस्टर/ अ‍ॅक्रिलिक या मिश्र सुतांनी प्रवेश केला आहे. रंगाईसुलभतेमुळे आणि झळाळीमुळे या तंतूपासून बनवलेले गृहसजावटीचे कपडेही अनेक घरांत पोहोचले आहेत.
वाढत्या लोकसंख्येमुळे उबदार कपडय़ांची मागणीही वाढलेली आहे. केवळ नसíगक लोकरीवर अवलंबून राहून ही मागणी पुरवणे अशक्यच आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अ‍ॅक्रिलिकचा वापर वाढत जाईल. एके काळी या तंतूची निर्मिती अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया, इटली, जपान, चीन, भारत इत्यादी देशांमध्ये होत असे. यातील काही देशांनी आता या तंतूनिर्मितीतून माघार घेतली आहे. या तंतूला लागणारा कच्चा माल, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे. म्हणूनच भविष्यात भारताला आपली टक्केवारी वाढवण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे.
– प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २s  office@mavipamumbai.org