भारतीय ज्ञानपीठाचा एक लाख रुपयांचा १९६६चा पुरस्कार बंगाली कादंबरीकार, कथाकार ताराशंकर बन्द्योपाध्याय यांना प्रदान करण्यात आला. १९२५ ते १९५९ या कालावधीत भारतीय भाषेतील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीची (‘गणदेवता’- कादंबरी, १९४२) निर्मिती केल्याबद्दल त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी ‘गणदेवता’ ही कादंबरी म्हणजे गद्यात्मक महाकाव्यच आहे. परंपरागत सांस्कृतिक मूल्ये व  सामाजिक अर्थकारणाने, नव्या युगातील विचारधारेने प्रभावित झालेल्या व्यक्तिरेखा नव्या संदर्भात चित्रित केल्या आहेत.

ताराशंकर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्य़ातील लाभपूर या गावी, एका साधारण जमीनदाराच्या कुटुंबात २३ जुलै १८९८ रोजी झाला.

वयाच्या आठव्या वर्षीच वडील वारल्यामुळे त्यांचे संगोपन आई प्रभावतीदेवी आणि आत्या शैलदेवी यांनी केले.  प्रभावतीदेवी या उदारमतवादी, आदर्शवादी होत्या. देशप्रेम आणि समाजसेवेचे संस्कार आईमुळेच झाले. आत्याविषयी त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता. ‘धात्री-देवता’- या कादंबरीची नायिका धात्रीदेवता, ही प्रत्यक्षातील त्यांची आत्या शैलदेवी यांच्यावरूनच लिहिलेली आहे.

हायस्कूलपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केल्यावर, १९१६ मध्ये मॅट्रिक झाल्यावर ताराबाबू कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आले. पहिल्या महायुद्धाच्या या काळात राजकीय वातावरण हळूहळू तापत होते. याच काळात असहकार चळवळीतील सहभागामुळे आणि प्रकृती-अस्वास्थ्यामुळे ते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. पुढे १९३० मध्ये स्वातंत्र्यचळवळीतील सहभागामुळे त्यांना अटक झाली. नंतर काही दिवसांनी सुटका झाल्यावर त्यांनी साहित्यसेवेलाच वाहून घ्यायचे ठरवले. मग स्वत:च्या जमीनदारीत आणि गावातील सेवाकार्यात लक्ष घालायचे ठरवले. याच सुमारास ते कविताही लिहू लागले. मग काही काळाने नाटक, कथा, कादंबरीलेखनाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या कथा, १९३१ पासून कादंबऱ्याही  साप्ताहिक, मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या.  ‘गणदेवता’ ही त्यांची पाचवी कादंबरी होती.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

इरॅटोस्थेनिसचे स्टेडियाएकक!

इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात (इ.स.पूर्व २७६- १९५)   होऊन गेलेला हा ग्रीक गणितज्ञ, पृथ्वीचा परीघ सर्वप्रथम शोधण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. फक्त गणितज्ञच नाही, तर खगोलशास्त्र, काव्य, संगीतशास्त्र, भूगोल या सर्वच विषयांत त्यांनी मोलाची भर घातली.

इरॅटोस्थेनिसचा जन्म आणि शिक्षण सिरेने आणि अथेन्स येथे झाले. अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालयाचा ग्रंथपाल म्हणून ते काम करत होते.

इजिप्तमधल्या सिएनी गावातल्या विहिरीत उन्हाळ्यातल्या एका ठरावीक दिवशी माध्यान्हीला सूर्याचे प्रतििबब अचूक दिसते, म्हणजेच त्या वेळी तिथे सूर्यकिरण लंबरूप पडतात, हे इरॅटोस्थेनिसनी ताडले. त्याच वेळी अलेक्झांड्रिया येथे जमिनीत रोवलेल्या उंच खांबांची उंची आणि आणि सावलीच्या लांबीचे गुणोत्तर वापरून त्यांनी होणारा सूर्यकिरणांचा पतनकोन मोजला. हा कोन पूर्ण वर्तुळाच्या ५० व्या भागाइतका भरला. सूर्यकिरण समांतर असतात. त्यामुळे हा कोन त्या दोन ठिकाणांना पृथ्वीमध्याशी जोडणाऱ्या त्रिज्यांमधल्या कोनाइतकाच असणार. सिएनी आणि अलेक्झांड्रिया या शहरांमधले अंतर ५००० स्टेडिया इतके होते. वर्तुळाच्या ५० व्या भागात ५००० स्टॅडिया इतके परिघावरचे अंतर सामावले जात असेल तर पूर्ण परीघ हा ५०x५००० म्हणजे २,५०,००० स्टॅडिया (४४,१०० किमी) इतका असला पाहिजे, असे गणित इरॅटोस्थेनिसने मांडले. आजच्या आधुनिक साधनांनी मोजलेला पृथ्वीचा परीघ हा ४०,०७५ किमी आहे.

आधुनिक साधनांशिवाय केवळ सावली-प्रतिबब या निरीक्षणांचा कल्पक उपयोग करून प्रत्यक्ष किमतीच्या इतक्या जवळ जाणारी पृथ्वीच्या परिघाची लांबी त्यांनी मोजली. त्यांनी पृथ्वी ते सूर्य हे अंतरही अचूक वर्तवले.

जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. ‘जॉग्रोफिका’ या ग्रंथाचे तीन खंड त्यांनी लिहिले आणि भूगोल विषयाचा पाया रचला. म्हणूनच त्यांना आदराने ‘भूगोलाचे पितामह’ म्हटले जाते. गणितातही अविभाज्य संख्या शोधणारी ‘इरॅटोस्थेनिसची चाळणी’ प्रसिद्ध आहे. त्यांनी बनवलेल्या दिनदíशकेत वर्षांचे ३६५ दिवस आणि दर चार वर्षांनी ३६६ दिवसांचे लीप वर्ष अशी मांडणी होती.

इरॅटोस्थेनिसनी लावलेल्या विविध मौलिक शोधांचा सन्मान म्हणून चंद्रावरच्या एका विवराला आणि भूमध्य सागरातील एका पर्वतशिखराला इरॅटोस्थेनिसचे नाव देण्यात आले आहे.

प्रा. माणिक टेंबे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org