व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो, त्याला अनुसरूनच व्यक्तीनुरूप रंगाची आवड ही बदलती असते. अगदी मोजकेच लोक पांढरा रंग पसंत करतात, इतरांना मात्र वेगवेगळ्या रंगांची आवड असते. निसर्गात जशी रंगांची विविधता आहे, तोच प्रकार माणसाच्या रंगांच्या आवडीनिवडीत दिसतो असे म्हणायला हवे. त्यामुळेच कपडे रंगीत हवे असतील तर तंतू, सूत किंवा कापड कोणत्या तरी टप्प्यावर रंगाई करावी लागेल. यालाच रंगाई असे संबोधले जाते. रंगाईसाठी अनेक प्रकारचे रंग बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापर गरजेनुरूप, किमती बघून आणि रंगवायच्या तंतूची रासायनिक जडणघडण लक्षात घेऊन केला जातो. सध्या थेट रंगवता येणारे रंग, तंतूबरोबर रासायनिक अभिक्रिया होणारे रंग (रिअ‍ॅक्टिव्ह डाइज), व्हॅट रंग, अपस्कृत रंग (डिस्पर्सड डाइज), आम्ल रंग, अ‍ॅझॉइक रंग, सल्फर रंग, खनिज रंग, बेसिक रंग आणि नसíगक रंग इतके प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यामधून योग्य रंगाची निवड करावी लागते. सध्या व्हॅट रंग आणि रिअ‍ॅक्टिव्ह रंग याचा वापर जास्त प्रमाणात होतो. हे दोन्ही रंग वापरताना रंगाई प्रक्रिया सोपी आहे. शिवाय त्यांच्या रंगाई पद्धतीमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही.
रंग म्हणजे द्रावणात विरघळणारे रंगद्रव्य, जे तंतूशी जोडले जाते आणि ती प्रक्रिया कायमस्वरूपी जोडली जाणारी असते. रंगद्रव्याचे अणू तंतूना घट्ट चिकटून बसतात. अर्थात तंतूबरोबर होणारी अभिक्रिया महत्त्वाची आहे. रंगांचे वर्गीकरण करताना रंगाईची पद्धत आणि रंगांचे रासायनिक स्वरूप याचा विचार केला जातो. यामध्ये आम्ल रंग, अ‍ॅझॉइक रंग, अपस्कृत रंग, बेसिक रंग, थेट रंग, रासायनिक अभिक्रिया होणारे रंग, सल्फर रंग, व्हॅट रंग यांचा समावेश होतो. वापरले जाणारे रंग हे बहुतांश सेंद्रिय रसायनेच आहेत. काही मात्र सेंद्रिय नसतात. या सर्व रसायनांची शुद्धता रंगाईसाठी अत्यंत महत्त्वाची असते. या रसायनात कोणतीही भेसळ असता कामा नये. अन्यथा रंगाचा जो पक्केपणा अपेक्षित असतो, तो मिळत नाही. इथे ग्राहकांची नाराजी लक्षात घ्यायला हवी. अर्थात रंगाच्या पक्केपणाकरिता अजूनही अनेक घटक जबाबदार आहेत.
सतीश दिंडे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – कोल्हापूर राज्यस्थापना
मराठा राज्यसंघातील संस्थानांपकी चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे संस्थान कोल्हापूर किंवा करवीर रियासतला ब्रिटिशांनी १९ तोफांच्या सलामीचा मान दिला. बडोदा, ग्वाल्हेर आणि इंदूर ही बाकीची तीन महत्त्वाची मराठा संस्थाने. कोल्हापूर संस्थानाविषयी लोकांच्या मनात कमालीचा आदरभाव आहे तो दोन महापुरुषांमुळे. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती राजर्षी शाहू महाराज! या महानायकांचा संबंध या गादीशी आहे. सातारा आणि कोल्हापूर ही दोन राज्ये १७०७ साली मराठा सत्तेच्या छत्रपतिपदाच्या वारसा हक्काच्या संघर्षांतून निर्माण झाली. संभाजी राजांच्या वधाच्या वेळी १६८९ साली, त्यांचे नऊ वर्षांचे पुत्र शाहू हे मोगलांच्या कैदेत होते. त्याच काळात रायगडावर नजरकैदेत असलेले शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांची सुटका होऊन त्यांना राजेपद देण्यात आले. १७०० साली सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. त्या आणीबाणीच्या परिस्थितीत रामचंद्रपंत अमात्य आणि राजाराम महाराजांच्या पत्नी राणी ताराबाई यांनी सर्व कारभाराची जबाबदारी घेऊन राजारामाचा अल्पवयीन पुत्र शिवाजी द्वितीय यास १७०० साली गादीवर बसविले. पुढे १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर मोगलांच्या कैदेत असलेले संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची सुटका होऊन ते महाराष्ट्रात आले आणि छत्रपतींच्या गादीवर आपला अधिकार सांगू लागले. या संघर्षांत खेड येथे दोन्ही बाजूंच्या वारसांच्या सन्यांची लढाई होऊन त्यात ताराबाईचा पराभव झाला. १७०८ साली शाहू यांनी साताऱ्याच्या छत्रपतिपदाचा आपला राज्याभिषेक केला तर १७१० मध्ये पन्हाळ्यावर ताराबाईने आपले कोल्हापूरचे निराळे राज्य स्थापन करून पुत्र शिवाजी (कोल्हापूर) याच्या छत्रपतिपदाची द्वाही फिरविली. इ.स. १८१२ मध्ये मराठा साम्राज्य नष्ट झाल्यावर कोल्हापूर राज्याचा कंपनी सरकारशी संरक्षणात्मक करार होऊन ब्रिटिशांची तनाती फौज राखली गेली. १८१२ साली ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेलेले कोल्हापूर संस्थान १९४७ साली स्वतंत्र भारतात विलीन झाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com