रंगाचा पक्केपणा ही रंगाईमध्ये लक्षात घेतली जाणारी सर्वात महत्त्वाची बाब आहे. धुलाईमध्ये रंग पक्का राहिला पाहिजे, तसेच प्रकाशातही तो रंग पक्का राहायला हवा; पण कोणतेच रंग दोन्ही निकषांवर १०० टक्के पक्के असू शकत नाहीत. कापड जेवढे टिकते तेवढा वेळ तरी रंग टिकावा, अशी आपली अपेक्षा असते. यानुसारच रंगांची निवड केली जाते आणि म्हणूनच पक्केपणात मागे पडणारे रंग न वापरण्याकडेच आताचा कल आहे. सुती तंतू किंवा कापड रंगवण्यासाठी आम्ल रंग आणि अपस्कृत रंग वगळता सर्व गटांचे रंग वापरता येतात. पर्यावरणस्नेही नसल्यामुळे बेसिक रंग आणि अ‍ॅझॉईक रंग यांच्या वापरावर आता बंदी आलेली आहे. खनिज रंगाचा वापर खास करून खाकी रंगासाठीच केला जातो, तर गडद रंगांसाठी सल्फर रंग वापरले जातात. पर्यावरण रक्षणाची गरज लक्षात घेता नसíगक रंगांना जास्त मागणी आहे. हे रंग झाडे किंवा झाडांचे भाग यांचा अर्क काढून तयार केले जातात. त्यामुळे काही प्रमाणात मर्यादा आहेतच, शिवाय रंगछटांची विविधता नैसर्गिक रंगांत खूप कमी आहे.
रंगांच्या वेगवेगळ्या गटांमधील मर्यादांमुळे आता रासायनिक अभिक्रिया होणारे रंग, व्हॅट रंग आणि अपस्कृत रंग यांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. यापकी रासायनिक अभिक्रिया होणारे रंग आणि व्हॅट रंग यांचा वापर सुती कापडासाठी, तर अपस्कृत रंगांचा वापर पॉलिस्टरसाठी केला जातो.
रासायनिक अभिक्रिया होणारे रंग हे पाण्यामध्ये विरघळणारे रंग असतात. या रंगांची कापसातील सेल्यूलोजबरोबर रासायनिक अभिक्रिया होते. तंतू आणि रंग यामध्ये एक मजबूत बंध निर्माण होतो. ही प्रक्रिया अल्कलीच्या उपस्थितीत होते.
रासायनिकरीत्या अभिक्रिया होणाऱ्या रंगातपण वेगवेगळे प्रकार आहेत. त्या त्या प्रकाराप्रमाणे रंगाईची पद्धत बदलत जाते. एकूण चार पद्धती या गटाच्या रंगांसाठी वापरल्या जातात. या पद्धती म्हणजे एक्झॉस्ट पद्धत, पॅडमध्ये बुडवून रंगवणे, पॅडमध्ये वाफेचा उपयोग करून रंगवणे, पॅड आणि सुक्या वाफेचा वापर करून रंगवणे; ज्याला इलेक्ट्रॉनिक नियंत्रक रंगाई म्हणून ओळखले जाते.
सतीश दिंडे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ताराबाईचे खंबीर नेतृत्व
महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्या दुसऱ्या पत्नी आणि महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. राजाराम महाराजांचा सिंहगडावर १७०० साली मृत्यू झाल्यावर ताराबाईने तिचा अल्पवयीन पुत्र शिवाजी (कोल्हापूर) याला गादीवर बसवून रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.
राजाराम महाराजांचे निधन झाले आणि मराठा राज्यावर आणीबाणीचा प्रसंग येऊन ठेपला. औरंगजेबाने मराठय़ांना नेस्तनाबूत करण्याची नव्या दमाने प्रतिज्ञा केल्यामुळे संकट अधिकच गंभीर बनले. त्यातच मराठा सरदार आणि सेनापती, घोरपडे घराणे आणि धनाजी जाधव यांच्या आपसातले वाद विकोपाला गेले होते, राजघराण्यातही धुसफुस चालू होती. घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे सात वष्रे औरंगजेबाला मराठय़ांशी झुंज देत दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराष्ट्रात आले आणि तेच खरे मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसाहक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेल्याने १७०७ साली खेड येथे झालेल्या युद्धात ताराबाईंचा पराभव झाला. त्यानंतर ताराबाईंनी सातारा सोडून पन्हाळ्याचा आश्रय घेतला. पन्हाळ्यास जाऊन त्यांनी आपल्या सन्य आणि साधनांची जुळवाजुळव सुरू केली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com