कोऱ्या कापडाचे वापरण्यासाठी योग्य आणि सोयीस्कर स्वरूपात रूपांतर करण्यासाठी ज्या एकूण प्रक्रिया केल्या जातात, त्यामध्ये सिजिंग ही प्रक्रिया पहिली आणि कोरडय़ा स्वरूपात केली जाणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत मुख्यत: कापडाबाहेर आलेले तंतू जाळून टाकले जातात आणि कापड स्वच्छ केले जाते.
या मशीनमध्ये सोडण्यापूर्वी कापड सुरकुतीविरहित केले जाते; म्हणजे या प्रक्रियेनंतर कोणत्याही पृष्ठभागावर तंतू राहणार नाहीत याची काळजी घेतली जाते. प्रथम ब्रशचे एक किंवा दोन संच वापरून कापड स्वच्छ केले जाते म्हणजे कापडाला बाहेरच्या बाजूने चिकटलेले अनावश्यक पदार्थ काढून टाकले जातात. कापडाच्या तलमतेनुसार वापरल्या जाणाऱ्या ब्रशची संख्या आणि त्याचा कापडाबरोबरचा स्पर्श या बाबी ठरवल्या जातात. जर तलम/ अतितलम कापड असेल, तर अगदी मामुली स्पर्श होईल इतक्या अंतरावर ब्रश असतात आणि जर वजनाने भारी कापड असेल, तर जाड ब्रशचे दोन संच कापडाच्या जवळ ठेवून कापडाची स्वच्छता केली जाते. यामुळे कापडाला चिकटलेले धागे, तंतू आणि धूळ कापडापासून बाजूला काढली जाते. ब्रश वापरून जे लोंबकळणारे तंतू निघू शकत नाहीत ते कापडाच्या पृष्ठभागावर येतात, पण कापडात गुंतलेले असतात.
कापडाच्या पृष्ठभागावरील हे तंतू सिजिंग मशीनमध्ये जाळले जातात. त्यासाठी गॅस बर्नरची विशिष्ट प्रकारे रचना या मशीनमध्ये केलेली असते. त्यामुळे कापडाच्या दोन्ही पृष्ठभागांवरील तंतू जाळले जातात. या मशीनमध्ये कापड पाठवण्यापूर्वी ते तीन सिलेंडरवरून पुढे पाठवले जाते. हे तीन सिलेंडर तांब्याचे असून ते वाफेने गरम केलेले असतात. यामुळे कापडावर कुठेही सुरकुती राहात नाही. तसेच कापडातील आद्र्रता पूर्ण निघून जाते. मार्गदर्शक रुळाच्या साहाय्याने गॅस बर्नरच्या ज्वाळेसमोरून हे कापड १५० मीटर ते ३०० मीटर प्रति मिनिट या वेगाने मशीनमधून पाठवले जाते. या वेगामुळे कापडाबाहेर आलेले तंतूच फक्त जळतात, कापड जळत नाही. हे तंतू जळल्यामुळे कार्बन डायऑक्साइड वायू आणि धूर तयार होतो. तो बाहेर जाण्यासाठी मशीनच्या वर व्यवस्था केलेली असते. या ज्वलन क्रियेमुळे कधी तरी आग लागण्याची शक्यता असते. त्यासाठी तिथे अग्निशामक सामग्रीची कटाक्षाने व्यवस्था केलेली असते.
सतीश दिंडे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – सांगलीचे ‘रामराज्य’
सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव प्रथम यांना पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या घराण्यातल्या मुलाला दत्तक घेतले; परंतु थोडय़ाच दिवसांत राजांना पुत्रप्राप्ती होऊन आधीचे दत्तकविधान रद्द करण्यात आले. भरपाई म्हणून दत्तक पुत्राला २५००० रुपये देण्यात आले आणि असा ठराव केला गेला की, पुढे पटवर्धन राजघराण्यात दत्तक घेण्याची वेळ आली तर आधीच्या दत्तक पुत्राच्या पुढच्या वंशजालाच निवडले जाईल. चिंतामणराव प्रथम यांच्या मृत्यूनंतर १८५१ साली त्यांचे पुत्र धुंडिराज ऊर्फ तात्यासाहेब गादीवर आले.
तात्यासाहेब १९०१ साली निपुत्रिक निधन पावल्यामुळे पूर्वी ठराव झाल्यामुळे रद्दबातल झालेल्या दत्तक पुत्राचा अल्पवयीन नातू विनायक यास सांगलीचे राजेपद मिळाले. विनायक ऊर्फ चिंतामणराव पटवर्धन द्वितीय यांनी १९१० साली अधिकृतपणे राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. चिंतामणराव द्वितीय यांनी अल्पावधीतच आपल्या ३००० चौ.कि.मी. राज्यक्षेत्राच्या सांगली संस्थानाच्या कारभारावर आपली घट्ट पकड बसविली. त्यांनी राज्यात उद्योगधंदे वाढावेत म्हणून चौफेर प्रयत्न केले, स्वत:चे भागभांडवल घालून सांगली बँक, रेल्वेसेवा सुरू केली. त्यांच्या अथक प्रयत्न आणि प्रेरणेतूनच गजानन वीव्हिंग मिल, लढ्ढा सूतगिरणी, साखर कारखाना, अद्ययावत दूध डेअरी, हळद पॉलिश करण्याचे काम इत्यादी उद्योग सांगलीत उभे राहून राज्याची भरभराट झाली. चिंतामणराव ऊर्फ भाऊसाहेब राजेपदावर येताच त्यांनी १९१० मध्ये राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले, १९१९ साली विलिंग्डन कॉलेज आणि १९४७ साली वालचंद इंजिनीअरिंग कॉलेज स्थापन करण्यात सक्रिय सहभाग दिला. आठ मार्च १९४८ रोजी सांगली संस्थान भाऊसाहेबांनी स्वतंत्र भारतात विलीन केले. सांगली संस्थानाचे अस्तित्व संपल्याचे दु:ख राजापेक्षा प्रजेलाच अधिक झाले. अशा पद्धतीने एका विश्वस्ताच्या भूमिकेतून कारभार करणाऱ्या, लोकप्रिय राजाचे निधन १९६५ साली झाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com