झाड खड्डय़ात  यारीच्या (क्रेनच्या) साहाय्याने तोलले गेलेले असतानाच मुळाभोवतीच्या मातीच्या गड्डय़ाभोवती गोणपाटाचे आवरण परत बांधतात. आता झाड मूळ जागेवरून उचलून घेण्यास तयार झालेले असते. त्यासाठी झाडाला बांधलेले दोरखंड सोडवून घेतात. मग हळूहळू यारीच्या साहाय्याने झाड उचलून, चराबाहेर आणून जिथे लावायचे तिथे नेतात. लावणीचा खड्डा जवळच असेल तर यारी त्याप्रमाणे फिरवायची. अन्यथा झाड लांब नेण्यासाठी उघडा ट्रक किंवा ट्रेलरचा उपयोग करतात. यारी खड्डय़ाजवळ नेऊन झाड परत हळुवारपणे उचलून खड्डय़ात सोडतात.

त्यापूर्वी खड्डय़ात खतमिश्रित मातीचा एक जाडसर थर देतात. झाड खड्डय़ात ठेवल्यावर ते यारीच्याच सहाय्याने सरळ उभे करून उरलेली माती खड्डय़ात लोटली की झाड सरळ उभे राहते. यारीची दोरी ( स्लिंग ) जराशी सल केल्यावर झाड हलले नाही म्हणजे रोपण व्यवस्थित झाले आहे, असे समजायला हरकत नाही. माती लोटताना मातीवर पाणी ओतत राहिलं की टाकलेली माती झाडाभोवती घट्ट बसते आणि झाड स्थिर होते. जरुरीप्रमाणे पाण्यात जंतुनाशकेही मिसळतात. झाडाला जंतुसंसर्गापासून दूर ठेवण्यास याचा उपयोग होतो.

त्यानंतर यारीचा दांडा सोडवून झाड नवीन खुंटय़ा गाडून दोरखंडाने परत बांधून ठेवतात. म्हणजे झाड कलंडण्याची भीती राहत नाही. त्यानंतर झाडाला ‘शुभम् भवतु’ अशी शुभेच्छा देण्यास हरकत नाही.

झाड पुनस्र्थापित केल्यावर आठवडय़ातून एकदा पाणी देणे जरूर आहे. एक-दोन आठवडय़ातच झाडाला नवीन पालवी फुटते. पण ही पालवी झाडाच्या खोडात असलेल्या अंगभूत अन्नामुळे होते. दोन-तीन महिन्यानंतर जेव्हा पालवीला जोर चढतो तेव्हा मात्र झाड नवीन जागेत रुजून नवीन मुळे फुटू लागली आहेत, असे समजायला हरकत नाही. म्हणजेच काम फत्ते झाले. झाडाने तग धरली.

स्थलांतरणाच्या दृष्टीने नारळ/सुपारीसारखे पाम वृक्ष; तसेच जांभूळ, डािळब, चिकूसारखे फळवृक्ष; वड, गुलमोहोर, सोनमोहोरासारखे शोभिवंत वृक्ष सोपे असतात. पण आंब्यासारखे खोल सोटमूळ असलेल्या वृक्षांचं स्थलांतरण बरेचदा अयशस्वी होतं. त्याचप्रमाणे वृक्ष म्हातारा झालेला असेल किंवा रोगाने पिडलेला असेल तर त्याचे स्थलांतरण न करणेच योग्य.

– डॉ. विद्याधर ओगले

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

 

 

जीनिव्हाच्या घडय़ाळ उद्योगाचा इतिहास

गेल्या दोन दशकांपासून स्वित्र्झलडमधील घडय़ाळनिर्मितीचा उद्योग विख्यात आहे. जीनिव्हात घडय़ाळनिर्मितीला प्रारंभ झाला सतराव्या शतकाच्या सुरुवातीला. सोळाव्या शतकाच्या अखेरीला युरोपियन देशांमध्ये प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चनांविरोधी लाट उसळली. समाजसुधारक आणि प्रोटेस्टंट नेता जॉन कॅल्विन याने फ्रान्समधून पळून येणाऱ्या प्रोटेस्टंट निर्वासितांना जीनिव्हात आश्रय दिला. साधी राहणी असलेल्या आणि आपल्या विचारसरणीवर ठाम असलेल्या कॅल्विनने जीनिव्हाच्या नागरिकांना आणि प्रोटेस्टंट निर्वासितांना आपल्याप्रमाणेच साध्या राहणीचा आग्रह धरला. उंची, महागडी वस्त्रे आणि सोन्या-मोत्याचे जडजवाहिर वापरण्यावर कॅल्विनने १५४१ साली बंदी आणली. या बंदीमुळे जवाहिरे आणि दागिन्यांच्या कारागिरांवर बेकारीची परिस्थिती आली. या बेकारीतून बाहेर पडण्यासाठी जॉन कॅल्विनने सोनारांना घडय़ाळनिर्मितीच्या उद्योगाची प्रेरणा दिली. जीनिव्हात नुकत्याच आलेल्या फ्रेंच प्रोटेस्टंट निर्वासितांमध्ये काही लोक घडय़ाळनिर्मितीच्या तांत्रिक ज्ञानातले जाणकार होते. त्यांनी इतर चार कुटुंबांना या व्यवसायाची माहिती दिली आणि पाहता पाहता पुढच्या ५० वर्षांत जीनिव्हा आणि इतर स्विस शहरांमध्ये हा व्यवसाय चांगलाच फोफावला. सतराव्या शतकाच्या अखेरीस कॅल्विन आणि त्याच्या शिष्यांची सामाजिक बंधने पूर्वीसारखी राहिली नाहीत, लोक दागदागिने आणि चनीच्या वस्तू वापरावयास लागले. यामुळे घडय़ाळांमध्येही कलाकुसर वाढून जीनिव्हा हे सुबक घडय़ाळनिर्मितीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. घडय़ाळ निर्मात्यांचा जीनिव्हा गिल्ड म्हणजे संघ स्थापन झाला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस डॅनियल जीनरिचर्ड या सोनाराने जीनिव्हात प्रथम व्यावसायिकता आणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घडय़ाळनिर्मिती मोठय़ा प्रमाणावर सुरू केली. १७९० साली जीनिव्हाने ६० हजार घडय़ाळे निर्यात केली. १८०० सालानंतर जीनिव्हाने घडय़ाळ निर्मितीतल्या ब्रिटन आणि फ्रान्समधील स्पर्धकांची बाजारपेठ पूर्णपणे हिरावून घेतली आणि एक जागतिक आघाडीवरील घडय़ाळ निर्माते म्हणून जीनिव्हाची ओळख करून दिली आहे. सध्या टिसॉट, रोलेक्स, लाँजिन्स, ओरिस, वाचेरॉन कॉन्स्टन्टिन, रेमंड व्हील इत्यादी जीनिव्हाच्या घडय़ाळ उत्पादक कंपन्या जगद्विख्यात आहेत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com