सेंट पीटर्सबर्गमध्ये राज्यक्रांती झाल्यावर मेन्शेविक पक्षाच्या हंगामी सरकारने झार निकोलस द्वितीय आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रथम नजरकैदेत ठेवले. पुढे लेनिनने, बोल्शेव्हिकांनी सत्ता काबीज केल्यावर झार कुटुंबीयांना प्रत्येकी सहाशे रुबल्स आणि सनिकांचे रेशन देण्यास सुरुवात केली. लेनिनला सतत भीती वाटे की, काही राजनिष्ठ लोक आणि सनिक झारला नजरकैदेतून सोडवून नेतील. रशियातीलच दूरवर असलेल्या उरल या ठिकाणी झारला स्थानबद्ध करण्याचा निर्णय बोल्शेव्हिक सरकारने घेतला. त्या भागात बोल्शेव्हिकांचे कट्टर समर्थकही बरेच होते. झार आणि त्याच्या कुटुंबीयांना उरलच्या डोंगराळ भागातील येकाटेरिनबर्ग शहरात, निकोलाय इपटाव्ह या एका लेनिन-समर्थकाच्या मोठय़ा घरात स्थानबद्ध केले गेले.

या सर्व स्थानबद्धांचे काय करायचे याचा विचार चालू असता ट्रॉटस्कीचे म्हणणे होते की, झारची जाहीर चौकशी करून त्याच्यावर खटला भरावा. पण जाहीर खटला भरल्यास आपले विरोधक काही गडबड करण्याची शक्यता वाटल्यामुळे लेनिन आणि त्याच्या बोल्शेव्हिक सरकारने संपूर्ण झार कुटुंबीयांना गोळ्या घालून ठार मारण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीच्या अंमलबजावणीची कामगिरी युरोवस्की या सेनाधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. १६ जुल १९१८च्या मध्यरात्री युरोवस्की आपल्या २४ सनिकांच्या तुकडीसह झारच्या निवासस्थानी पोहोचला. झार, झारिना, त्यांचा मुलगा, चार मुली, झारचा डॉक्टर आणि तीन नोकरांना झोपेतून उठवून तळघरात येण्यास सांगितले गेले. तळघरातल्या तीन खुच्र्यावर झार, झारिना आणि मुलाला बसविण्यात आले. युरोवस्कीने आता आम्ही तुम्हाला गोळ्या घालणार आहोत असे सांगताच, झार ‘काय!’ असे म्हणून उभा होताच पहिली गोळी त्याला घातली गेली. पाठोपाठ राणी आणि मुलाला गोळ्या घालण्यात आल्या. मुलाला गोळी नीट न बसल्याने परत दुसरी गोळी कानात घालून मारण्यात आले. सर्व बंदींचे शिरकाण झाल्यावर त्यांचे मृतदेह ट्रकमध्ये भरून गावाबाहेरील एका दगडाच्या खाणीत टाकून जाळण्यात आले. दुसऱ्या दिवशी बोल्शेव्हिक सरकारने फक्त झार निकोलसलाच मारल्याचे जाहीर केले. वस्तुस्थिती दहा वर्षांनी बाहेर आली!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com 

 

उंच माझा झोका!

सर्व मुलांचा आवडता जंगल बुकमधला मोगली आणि जाडजूड वेलींना धरून पटापट या झाडावरून त्या झाडावर माकडासारखा पळणारा टारझन आठवला की लक्षात येईल की  या वेलींवर  एक विशिष्ट परिसंस्थाच अवलंबून आहे.

गारंबी, उक्षी, मालू क्रीपर आणि निटम यांसारख्या जाडजूड वेली कोणत्याही घनदाट जंगलांमध्ये उंचच उंच झाडांना विळखे घालत प्रकाशाच्या शोधात २५ ते ३० फूट वर चढत जातात.

मालू वेलीची   (Bauhinia vahili)  भलीमोठी पाने आपटय़ाच्या पानासारखी असतात. हा भारतातील सर्वात लांब १० ते ३० मीटर वाढणारा वेल आहे.

गारंबीच्या  (Entadarheedii)  बीने तर समुद्रमाग्रे जगभर प्रवास केलाय. कारण गारंबीच्या प्रचंड शेंगेतील पोकळ पण वजनदार आणि गोलाकार बीचे साल जलरोधक असते. या बीचा गर खाल्ल्यामुळे सुंदर स्वप्ने पडतात म्हणे!

जंगलात फिरताना तहानेने जीव व्याकूळ झालेत किंवा पोट बिघडलेय असं वाटले की उक्षीचा वेल (calycopteris floribunda)  शोधून त्यातले भरपूर पाणी प्यायचे की लगेच आराम वाटतो.

सपुष्प आणि अपुष्प वनस्पतींच्या मधला महत्त्वाचा दुवा असलेली नीटमची सुंदर  वेल ही हळूहळू जंगलातून हद्दपार झाली आहे.

आश्चर्य म्हणजे या वेलींचे जंगलातील महत्त्व माहीत असूनही त्यांच्याविषयी अनेक गरसमज आहेत. जंगलामध्ये या वेलींच्या लांबच लांब झुलत्या पुलावरून मुंग्या, पक्षी, माकडे, खारी यांसारखे प्राणी घरटी बांधण्यासाठी किंवा आपली आवडती फळे खाण्यासाठी मजेत फिरतात.

मेघालयातील आदिवासींना नदी-नाल्यावर असे नसíगक पूल बनवण्याची कला पूर्वापार अवगत आहे. जमिनीवरही पसरलेल्या वेलींच्या जाळ्याचा उपयोग वन्यप्राण्यांना लपण्यासाठी होतो. बऱ्याचदा या वेलींमुळे जंगलांचे वादळी वाऱ्यांपासून संरक्षण होते. पण काही वेळा मात्र या वेलींचे विळखे जीवघेणे ठरतात. एक झाड पडले की त्याच्याबरोबर या वेलींनी विळखा घातलेली इतरही झाडे उन्मळून पडतात. किंवा वेलींच्या ओझ्यामुळे काही झाडांची वाढच खुंटते. पण त्यामुळेच नवीन झाडांना वाढण्यासाठी जागाही मिळते. जंगलातील कोणत्याही वृक्षांना शिरजोर होता येत नाही. आणि जंगलातील जैवविविधताही जपली जाते.

म्हणूनच वनसंवर्धनाची धोरणे आखताना या वेलींचाही जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे.

सुगंधा शेटय़े (मुंबई)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org