तुर्कानी अनेक वष्रे आशिया, आफ्रिका आणि युरोपात जाऊन इस्लामचा प्रसार केला होता. त्यांनी त्यासाठी तलवारीच्या जोरावर सक्ती करून अनेकांचे प्राणही घेतले होते आणि हे सर्व करणाऱ्या ओटोमन आणि सेल्जुक घराण्याच्या सुलतानांच्या कथा मोठय़ा चवीने सांगितल्या जात. या वृथा अभिमानाचा इतिहास केमालला पुसून काढायचा होता. त्याने एच.जी. वेल्स यांचा जगाचा इतिहास वाचला होता. तुर्काची अस्मिता टिकवण्यासाठी केमाल पाशाने १९३१ मध्ये स्वत:च्या अध्यक्षतेखाली विद्वानांचे इतिहास लेखन मंडळ स्थापन केले. तुर्की लोकांचे महत्त्व वाढवण्यासाठी नव्याने, हवा तसा बदल करून केमालने त्यांचा इतिहास नव्याने लिहून घेतला. त्याच्या इतिहासाप्रमाणे या सृष्टीत पहिली मानवजात जी निर्माण झाली ती म्हणजे तुर्की! जगातील सर्वात श्रेष्ठ मानव म्हणजे तुर्कीच! इंग्लंड, अमेरिकेतील बऱ्याच ठिकाणांची नावे, मूळची तुर्कीच आहेत असे हा इतिहास सांगतो! केमालने लावलेला आणखी एक शोध असा की, जगातल्या सर्व भाषांचा उगम तुर्की भाषेतूनच झाला! तुर्की भाषा बोलायला सोपी, पण त्यांची स्वत:ची अशी वेगळी लिपी नव्हती. ते अरेबिक लिपीतच लिहीत असत; परंतु अरेबिक लिपीप्रमाणे तुर्की भाषेमध्ये एका अक्षराचे दोन-तीन उच्चार होत आणि त्यामुळे शब्दाचा अर्थही बदलत असे. सामान्य लोकांना पुस्तके, वर्तमानपत्रे वाचताना या गोष्टीमुळे मजकुराचा अर्थबोध नीट होत नसे. केमाल पाशाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्वानांचे तुर्की लिपी संशोधन मंडळ स्थापन केले. या मंडळालाही या समस्येवर काही तोडगा न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या युरोपियन देशांमध्ये वापरात असलेल्या रोमन लिपीचा वापर तुर्की लिहिण्यासाठी करायचे ठरवले. अनेक सुशिक्षित लोकांना केमालने रोमन लिपीचे शिक्षण देऊन शाळांमध्ये त्या लिपीचेच शिक्षण सुरू केले. गमतीची गोष्ट म्हणजे रोमन लिपीलाच केमालने ‘तुर्की लिपी’ असे नाव देऊन तुर्काच्या नव्या इतिहासात असे नमूद केले की, युरोपियन लोक वापरतात ती लिपी मूळची तुर्काचीच!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

वनस्पती उद्यान

उद्याने शहराच्या सौंदर्यात भर टाकतात ही संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. वनस्पती उद्याने करण्याची कल्पना सर्व प्रथम युरोपात रुजली. सुरुवातीला वनस्पती उद्यानांमध्ये औषधी वनस्पतींवर भर दिला गेला, कालांतराने उद्देशांमध्ये विविधता आली व उपयोगिता बदलत गेल्या.

जगातील अनेक देशांच्या वनस्पतींचा संग्रह, त्याचबरोबर वनस्पतींसंबंधी वाचनालय, वनस्पती संग्रहालय, हरितगृह आणि संशोधन प्रयोगशाळा. या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या सुसज्ज उद्यानाला वनस्पती उद्यान म्हणतात.

वनस्पती उद्यानाची मांडणी एखाद्या मान्यताप्राप्त वनस्पती वर्गीकरणावर आधारित असते. ज्ञानवृद्धी आणि ज्ञानप्रसारासोबत वनस्पती अभ्यासक आणि जनसामान्यांमध्ये वनस्पतीसंबंधी जिव्हाळा निर्माण करणे, ही या उद्यानाची उद्दिष्टे असतात. आज वनस्पती उद्यानांचा उद्देश जिवंत वनस्पतींचा संग्रह करणे, त्याची माहिती संग्रहित करणे, सर्वाची टिपणे करून ठेवणे, त्याचा उपयोग शिक्षण आणि शोधकार्यासाठी करणे आणि प्रस्तुत वनस्पतींचे जतन करणे हा होय.

इटलीमध्ये पिसा विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक ‘लुका धिनी’ यांनी पिसा येथे १५४३ साली पहिल्या वनस्पती उद्यानाची स्थापना केली. ते उद्यान आज अस्तित्वात नाही.

सामान्यत: वनस्पती उद्याने विद्यापीठ किंवा वैज्ञानिक संस्था यांच्याशी संलग्न असतात. अनेक देशांत ठरावीक प्रकारच्या वनस्पतींची लागवड हा उद्देश समोर ठेवून उद्यान उभारले जाते. उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष, नेचे, कॅक्टस किंवा उष्ण कटीबंधीय वनस्पतींची उद्याने अशा उद्यानास ‘थीम’ गार्डन म्हणतात.

एक परिपूर्ण वनस्पती उद्यान होण्यासाठी काही अटी असतात. या अटींची पूर्तता करणाऱ्या उद्यानास वनस्पती उद्यानाचा दर्जा प्राप्त होतो. या अटी अशा आहेत – उचित स्थायी स्वरूप असणे, वनस्पती संकलनास वैज्ञानिक आधार, संकलित वनस्पतींचे योग्य

दस्तऐवज ठेवणे, त्यांच्या मूळ वनस्पतींसह सतत निगा राखणे; जनसामान्यांसाठी उपलब्धता, इतर उद्याने, लोक आणि संस्थांशी संपर्क ठेवणे, देवाण- घेवाण राखणे, वनस्पतींची नावे अचूक असणे आणि शोधकार्य करणे.

जगात ४० लक्ष वनस्पती १४८ देशांतील उद्यानात विखुरलेल्या आहेत. जगात सर्वात मोठे भव्य वनस्पती उद्यान ‘क्यू’ हे लंडन येथे आहे. हावडा – कलकत्ता येथे भारतातील सर्वात मोठे उद्यान १६० हेक्टरावर पसरले आहे. राष्ट्रीय वनस्पती उद्यान लखनऊ, शासकीय वनस्पती उद्यान उटी आणि लॉइड्स उद्यान, दार्जिलग ही भारतातील काही इतर वनस्पती उद्याने आहेत.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org