मध्ययुगीन काळात व्हेनिसमधील प्रजासत्ताक सरकारच्या प्रशासकीय पद्धतीत बदल होत गेले. १२६८ साली डोजच्या निवडीसाठी तयार झालेली संहिता मात्र प्रजासत्ताकाच्या अखेरीपर्यंत म्हणजे इ.स. १७९७ पर्यंत टिकली. यामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या नऊ लोकांची महासमिती दुसऱ्या चाळीस लोकांचे मंडळ नियुक्त करीत असे. या चाळीस लोकांना डोज निवडण्याचे अधिकार दिले जात. रोमन प्रजासत्ताकात सिनेटने नियुक्त केलेला ‘काऊंसल’ हा सर्वोच्च अधिकारी असे, त्याच धर्तीवर व्हेनिशियन प्रजासत्ताकात डोजचे पद असे. एका वर्षांसाठी डोजची नियुक्ती होई. नव्या डोजची नियुक्ती झाल्यावर संपूर्ण व्हेनिसच्या राज्यक्षेत्रात प्रथम मिरवणूक निघत असे. नऊ लोकांची महासमिती आणि चाळीस लोकांचे सिनेट या मिरवणुकीत सामील होऊन ‘आता हा तुमच्या सर्वाच्या पसंतीचा नवा डोज आलाय, त्याचे स्वागत असो’ अशा अर्थाच्या घोषणा देण्याची पद्धत होती. सुरुवातीच्या काही डोजनी हातात सत्ता आल्यावर व्हेनिसवर आपल्या घराण्याची राजवट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या काळातील सिनेटर्सनी तसे होऊ दिले नाही. इ.स. ७५६ ते ७६४ या काळात सत्तेवर असलेला डोज डोमेनिको याच्या काळात व्हेनिस हे केवळ एक मच्छीमारांचे राज्य न राहता व्यापारी आणि बाजारपेठ यांनी गजबजून गेले. व्हेनिशियन व्यापारी दूरवर भूमध्य सामुद्रिक राज्यांमध्ये सागरी मार्गाने जाऊन व्यापार करू लागले. जहाजबांधणीच्या तंत्रात सुधारणा होऊन वेगवान, दणकट जहाजे तयार होऊ लागली. व्यापारातून संपन्न झालेल्या व्हेनिसचा तोंडवळा बदलून व्हेनिसमध्ये कला, सांस्कृतिक मूल्यांचा विकास झाला. एक महत्त्वाचे मध्ययुगीन धनसंपन्न व्यापारी शहर म्हणून ख्याती झालेल्या व्हेनिस शहराचा हा तोंडवळा पुढचे सहस्रकभर टिकला. वाढत्या नौदलाच्या बळावर इ.स. १०९६ पासून पुढे झालेल्या चार क्रुसेड्स अर्थात धर्मयुद्धांमध्ये व्हेनिसचा महत्त्वाचा सहभाग होता.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

उद्यानकलाशास्त्राची आवश्यकता

उद्यानकलाशास्त्र हे एक व्यापक शास्त्र असून त्याचा आवाका मोठा आहे. निसर्गाचे वरदान लाभलेली ही वनश्री किती विविध स्वरूपांत आपण पाहात असतो. या वनश्रीमध्ये गुलाब, जास्वंद यांसारखी  फुलझाडे, ऑíकडसारखी शोभिवंत झाडे, कोलोयस अकलिया ड्रसिना यांसारखी नुसत्या पानांचे सौंदर्य असलेली झुडपे आहेत. सगळ्यांबरोबर औषधी वनस्पतीही निरनिराळ्या ठिकाणी आहेत. तसेच भरपूर पोषणमूल्ये असलेली मोसंबी, आवळा, अक्रोड, बदाम यांसारखी फळझाडे आहेत, चहा-कॉफी यांसारख्या झाडांमध्ये उत्तेजक द्रव्ये आहेत.  वरील सर्व झाडांचे उद्यानकलाशास्त्राद्वारे उत्पादन व संवर्धन केले तर लागवडीचे क्षेत्र वाढेल. यातील कोणत्या झाडांना जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करून त्याची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येईल. तसेच औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी त्यांचे चांगल्या तऱ्हेने नियोजन करणे आवश्यक आहे. आता शेतकरीवर्गही या क्षेत्राकडे आकर्षति होत आहे. जंगलात  वाढणाऱ्या वनस्पतींचा औषधासाठी उपयोग करणेही धोकादायक झाले आहे. कारण अनेक वेळा या वनस्पतींवर कीड पडते, एकाच ठिकाणी अनेक झाडे दाटीवाटीने वाढल्यामुळे ती खुरटतात. त्यांचा दर्जा कमी होतो. तसेच जंगलातील या औषधी वनस्पतींची सतत तोडणी केल्यामुळे त्यातील काही वनस्पती नष्ट झाल्या आहेत. किंवा काहींची संख्या कमी होत आहे. चंदनासारख्या मौल्यवान झाडांची तस्करी होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. सर्व सामान्य औषधासाठी लागणाऱ्या वनस्पती उदा. शतावरी, अडुळसा, आवळा, हिरडा, बेहडा यांना बाजारात जास्त मागणी आहे. लोणावळा, कर्जत, खोपोली, महाड, महाबळेश्वर कास पठार हा भाग औषधी वनस्पतींनी संपन्न आहे. पण ठिकठिकाणी मनुष्यवस्ती फार्महाउसेस, पर्यटन क्षेत्रे वाढत आहेत. त्यामुळे वृक्षतोड चालू आहे. हे सर्व थांबवण्यासाठी झाडांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्यानाच्या कुंपणाच्या बाजूला अडुळसा, निरगुडी यासारख्या वनस्पती लावता येतील. तसेच कुंपणाकरिता निरनिराळ्या रंगांच्या बोगनवेली लावता येतील. त्यामुळे या उद्यानाचे सौंदर्यही वाढेल व रक्षणही होईल. संरक्षणाबरोबरच त्यांचे संवर्धन होण्यासाठी झाडांना गांडूळ खत किंवा शेणखत देणे गरजेचे आहे. शक्यतो रासायनिक खते देऊ नयेत. एकूणच उद्यानकलाशास्त्र हे एक आवश्यक शास्त्र आहे.

प्रा. रंजना देव

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org