अतितलम तंतूंची निर्मिती ही अतिशय कठीण असते. हे तंतू अत्यंत तलम असल्यामुळे कताई प्रक्रियेमध्ये तसेच पुढील विणाई व रासायनिक प्रक्रिया करताना खूपच काळजी घ्यावी लागते. अतितलम तंतू बनविण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यामध्ये द्विघटक तंतू पद्धत, तंतू विभाजन पद्धत आणि सामान्य वितळ कताई पद्धत या अधिक प्रचलित आहेत. द्विघटक तंतू (बायकंपोनंट फायबर) पद्धतीमध्ये पॉलिस्टर व इतर एखादे बहुवारिक यांची एकत्रपणे कताई केली जाते. त्यामुळे एकाच तंतूमध्ये पॉलिस्टर व इतर बहुवारिक शेजारी शेजारी असते. अशा तंतूला द्विघटक तंतू असे म्हणतात. या तंतूपासून कापड बनविले जाते. नंतर दुसरे बहुवारिक एखाद्या द्रावणात विरघळवले जाते आणि कापडात अत्यंत कमी जाडीचा (अतितलम) पॉलिस्टर तंतू शिल्लक राहतो.
तंतू विभाजन (स्प्लिट फायबर) पद्धतीमध्ये एकाच तंतूमध्ये विभाजन करता येण्यासारखे बहुवारिक वापरून पॉलिस्टरबरोबर द्विघटक तंतू बनविला जातो आणि नंतर या तंतूंचे विभाजन करून अतितलम तंतू तयार करता येतात.
नेहमीची वितळ कताई वापरूनसुद्धा अतितलम तंतूंचे उत्पादन करता येते, परंतु यासाठी उच्च दर्जाचे पॉलिस्टर बहुवारिक, कताई आणि खेच प्रक्रियेत मोठी दक्षता घ्यावी लागते. तंतू तयार होताना त्यावर अनावश्यक ताण पडणार नाही, तसेच तंतूचे घर्षण होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या पद्धतीने सामान्यपणे ०.८ डेनिअपर्यंतच्या तलमतेचे तंतू बनविले जातात. यापेक्षा कमी तलमतेचे तंतू तयार करण्यासाठी वरील दोन पद्धतींचा वापर केला जातो.
अतितलम पॉलिस्टर तंतूंचा स्पर्श कापसासारखा मृदू-मुलायम असून त्याला रेशमासारखा सुळसुळीतपणा असतो. हे वापरायला अत्यंत आरामदायक असतात. यामुळे या तंतूंचा उपयोग मुख्यत: खास समारंभात घालण्याचे कपडे, दर्जेदार साडय़ा, क्रीडापटूंचे कपडे, अंतर्वस्त्रे अशा प्रकारच्या कपडय़ांमध्ये केला जातो.
अतितलम तंतूंचे कापड धूळ पटकन खेचून घेत असल्यामुळे त्यांचा वापर स्वच्छता कारणांसाठी वापरले जाणारे कापड बनविण्यासाठी केला जातो. याशिवाय उद्योगामध्ये वापरली जाणारी गाळणी (फिल्टर), बास्केटबॉल, उष्णतारोधक व विद्युतरोधक कापड इत्यादी बनविण्यासाठी या तंतूंचा उपयोग केला जातो.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जम्मू-काश्मीरचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण
जम्मू-काश्मीर संस्थानाचे महाराजा प्रतापसिंग यांच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या हरीसिंग यांची कारकीर्द इ.स. १९२५ ते १९४७ अशी झाली. १९४७च्या फाळणीवेळी ‘इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट’नुसार ब्रिटिशांनी भारतीय संस्थानिकांना त्यांच्या अस्तित्वाविषयी तीन पर्याय ठेवले : भारतात विलीन व्हावे किंवा पाकिस्तानात विलीन व्हावे अगर स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व राखावे. काश्मीरच्या महाराजांना आपले राज्य कुठेही विलीन न करता स्वित्र्झलडप्रमाणे स्वतंत्र देश म्हणून राखायचा होता.
हरीसिंगांनी आपला राज्य स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय भारत व पाकिस्तान दोन्हींच्या सरकारांना कळविला. भारताने तो नाकारला तर पाकिस्तानने स्वीकारला. महाराजांचे विश्वासू सल्लागार मेहरचंद यांनी त्यांना सल्ला दिला की, काश्मीरचा प्रदेश परकीय सत्तांनी वेढलेला असून त्याला चीन, रशिया या देशांकडून धोका असल्याने स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. नेमके गीलगीट स्काऊट्स या सुरक्षा पथकाने त्याच वेळी बंड केले. तोच पाकिस्तानातूनही सशस्त्र लोक घुसले. हे पाकिस्तानी सनिक नसून ‘वायव्य सरहद्द प्रांतातील आफ्रिदी आणि मेहसूद या टोळ्यांच्या सशस्त्र कबिल्यां’पैकी ते होते, हे म्हणणे पाकिस्तानने कायम ठेवले आहे. या कबिल्यांनी काश्मीरचा मोठा प्रदेश आपल्या कब्जात केला.
 या हल्ल्यांना तोंड द्यायला असमर्थ असलेल्या हरीसिंगांनी भारत सरकारला त्यांचे सन्य पाठवून काश्मीरचे रक्षण करण्याची विनंती केली. भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल माऊंटबॅटन यांच्या सल्ल्यावरून नेहरूंनी महाराजांना कळविले की, त्यांनी भारतात विलीनीकरण केल्यासच भारत सन्य पाठवू शकेल.  
मग महाराजांनी नाइलाजाने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी विलीनीकरणाच्या दस्तऐवजांवर सह्य़ा केल्या व २७ ऑक्टोबरला भारतीय सेनेने श्रीनगर विमानतळ ताब्यात घेऊन हल्लेखोरांनी घेतलेला बराच प्रदेश मुक्त केला. तरीही हल्लेखोरांच्या ताब्यात ‘आझाद’ (पाकव्याप्त) काश्मीर राहिले.
सुनीत पोतनीस  -sunitpotnis@rediffmail.com