एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ युरोपियन संगीतकारांमध्ये फ्रान्झ शुबर्टची गणना होते. केवळ ३१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या फ्रान्झ पीटर शुबर्टची व्हिएन्ना ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. वयाच्या बाराव्या वर्षी शुबर्टची व्हिएन्नाच्या प्रसिद्ध रॉयल चॅपेल गायकवृंदात निवड झाली. याच काळात स्वतंत्र संगीतरचना करण्यास त्याने सुरुवात केली. पियानो आणि व्हायोलिन वादनावरही त्याने प्रभुत्व मिळवले. शुबर्टला मोझार्ट, बिथोवेन आणि हायड या श्रेष्ठ संगीतकारांच्या संगीताचीही माहिती याच काळात मिळाली. त्याच्या संगीताच्या कारकीर्दीत त्याने जर्मन क्लासिकल संगीत आणि रोमॅन्टिक संगीत यांना सांधणारे, मेलोडी आणि हार्मोनी यांचा सुरेख मेळ साधून लाइडर या नवीन शैलीला जन्म दिला. इ.स. १७९७ ते १८२८ अशा आयुष्याच्या अपुऱ्या कालखंडात त्याने ६००हून अधिक सांगीतिक रचनांची निर्मिती केली. या रचनांमध्ये ३६० रचना लाइडर शैलीच्या होत्या. त्याशिवाय सात सिंफनीज, चर्चच्या पवित्र संगीत रचना, दहा संगीत नृत्यनाटिका शुबर्टच्या नावावर जमा आहेत. त्याशिवाय त्याने रचलेले पियानो संगीतही वैशिष्टय़पूर्ण होते. पियानो, फ्ल्यूट आणि व्हायोलिन या विविध वाद्यांसाठी त्याने मेजर आणि मायनर (तीव्र आणि कोमल) स्वरांचा वापर इतका चपखलपणे केला की पारंपरिक संगीत शैलीपेक्षा शुबर्टचे संगीत अगदीच नावीन्यपूर्ण ठरले. शुबर्टने आपले संगीत अधिकतर खाजगी बठकींसाठी दिले. या संगीताला ‘श्युबरटाइड्रस’ असे म्हणतात. त्याने आयुष्यात फक्त एकच २६ मार्च १८२८ रोजी सार्वजनिक संगीत जलशाला आपले संगीत दिले. पण त्या दरम्यान त्याची तब्येत टाइफाइडच्या ज्वराने फारच खालावली होती. या सार्वजनिक कार्यक्रमानंतर सहा-सात महिन्यांत त्याची तब्येत आणखी खालावत जाऊन १९ नोव्हेंबर १८२८ रोजी त्याचे निधन झाले. फ्रान्झ शुबर्टच्या आयुष्यभरात त्याच्या कलाकारितेची विशेष दखल घेतली गेली नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संगीत रचनांविषयी औत्सुक्य निर्माण होऊन त्याच्या पुढच्या पिढीतील रॉबर्ट शूमन, फ्रान्झ लिस्झ, ब्राम्स वगरे संगीतकारांनी या महान संगीतकाराच्या कार्याचा अभ्यास करून ते जतन करून ठेवले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

हरित पट्टय़ासाठी वृक्ष व्यवस्था

पर्यावरणाचे आरोग्य राखण्यासाठी हरित पट्टे वाढवण्याची सूचना करतात. हरित पट्टे शहरात, खेडय़ांत, रस्त्यांच्या दुतर्फा, कारखान्यांच्या सभोवती, घरे, मदाने, व्यावसायिक इमारती, शिक्षण संस्था, सर्व ठिकाणी अपेक्षित आहेत. कारखाने आणि रस्ते येथे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो तर इतर ठिकाणी सूक्ष्म-पर्यावरण सुधार, नजरेस आल्हाददायक, वृत्ती उत्तेजित करण्यासाठी हरित पट्टे उपयुक्त ठरतात. दमल्या-भागल्या खेळाडूंना मदानाकाठाचे वृक्ष सावली-गारवा देतात, तर नेमबाजी शिकणाऱ्या जवानांची नजर निशाणाच्या बाजूच्या हिरवाईमुळे ताजीतवानी राहते. तीव्र तापमानात झाडांच्या सावलीमुळे घर कमी तापते, शीतीकरणाचा खर्च कमी होतो.

परंतु हे सर्व फायदे मिळवण्यासाठी वृक्षांची व्यवस्था-मांडणी हुशारीने करावी लागते. प्रदूषणसोशीक वृक्ष-प्रकार, त्यांची उंची, आकार, घनता, ऋतूप्रमाणे होणारी पानगळ, पानांचे गुण, इत्यादींची माहिती तर जरुरीची असतेच, पण हरित पट्टय़ाची प्रदूषणसंदर्भातील दिशा ही महत्त्वाची असते.

रस्ते विकास प्राधिकरणाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या दोहो बाजूस वृक्षांच्या चार रांगा योजल्या होत्या- १. रस्त्याकाठी फुले येणारे लहान वृक्ष, २. त्यामागे मध्यम आकाराचे फळांचे वृक्ष, ३. साधारण उंच वृक्ष ४. आणि या सर्वामागे उंच सदाहरित वृक्ष. रस्त्याकडेच्या चार ओळींतील वृक्ष एकआड एक पद्धतीने लावल्यामुळे हरित पट्टा िभतीसारखा अभेद्य न होता, स्पन्जासारखा होऊन त्यात हवा सहज खेळते. खेळत्या हवेतली प्रदूषके मोठय़ा प्रमाणावर सहनशील झाडांमध्ये शोषली जातात, तर संवेदनशील झाडे प्रदूषणनिदर्शनाचे कार्य करतात.

वाहनांचे प्रदूषण जास्तीत-जास्त प्रमाणात दुभाजकाच्या दिशेने पडते म्हणून दुभाजकावर प्रदूषणसहनशील झुडपे, ज्यांची वाढ १.५ ते २ मीटरच असेल अशी झुडपे लावणे योग्य ठरते. उदा.- कण्हेर, तगर, पांढरा चाफा, बोगनवेल, कडुमेंदी इत्यादी.

शहरात रस्त्याकाठी वृक्ष लावताना फुटपाथवर रोपटय़ाभोवती कमीत कमी एक मीटर त्रिज्येची जागा मोकळी ठेवल्यास झाडाला दिलेले पाणी मुळांना मिळते, पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकते. असे केल्याने मुळांची वाढ सर्व दिशांनी सारखी होते आणि दहा मीटर व्यासाचा पर्णसंभार सर्व बाजूंनी सारखा वाढतो.

प्रा. शरद चाफेकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org