ऑस्ट्रियाच्या एकोणिसाव्या शतकातील दिग्गज संगीतकारांच्या मालिकेतील जोहान स्ट्राऊस द्वितीय याचे स्थान महत्त्वाचे आहे. १८२५ साली व्हिएन्नाजवळच्या खेडय़ात जन्मलेल्या जोहान स्ट्राऊसचे वडील जोहान स्ट्राऊस प्रथम हेसुद्धा नावाजलेले संगीतकार होते. आपल्या मुलाने संगीताच्या क्षेत्रात न येता बँकर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांच्या विरोधामुळे जोहान स्ट्राऊस द्वितीयने त्यांना न कळत व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. उपजतच संगीताची आवड आणि ज्ञान असलेल्या स्ट्राऊसने अल्पकाळातच व्हायोलिन वादनात प्रभुत्व मिळविले. पण पुढे ही गोष्ट कळल्यावर वडिलांनी त्याला मारझोड करायला सुरुवात केली. पुढे बाप आणि मुलात एवढे वितुष्ट आले की बापाने दुसरे लग्न करून आपल्या कुटुंबाशी संबंध तोडला. यानंतर मात्र जोहानने विविध प्रकारच्या संगीताचा, वाद्यांचा अभ्यास करून स्वतचा वाद्यवृंद स्थापन केला. पुढे त्याने स्वतच्या सांगीतिक रचना बांधायला सुरुवात केली. या काळात व्हिएन्नातील ऑस्ट्रिया हंगेरियन सम्राटाच्या दरबारात जोहानला शाही संगीतकाराचे मानाचे स्थान होते. १८४८ साली ऑस्ट्रियनसम्राटाविरुद्ध बंड झाले. त्यात जोहानने बंडखोरांची बाजू घेतल्याने त्याला अटक झाली. परंतु बंड शमल्यावर त्याला परत पूर्ववत स्थान मिळाले. १८४९ साली वडिलांच्या मृत्यूनंतर स्वतचा आणि वडिलांचा वाद्यवृंद एकत्रित करून त्याने युरोप, अमेरिकेचे दौरे सुरू केले. जोहानने तत्कालीन संगीत नृत्यनाटिकांच्या सादरीकरणात काही बदल करून स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली. जोहानच्या या संगीत नृत्यनाटिकांना वाल्ट्झ असे नाव आहे. जोहानने वाल्ट्झ नृत्यनाटिकांच्या ४००हून अधिक संगीत रचना तयार केल्या. ‘ब्ल्यू डॅन्यूब’, ‘टेल्स फ्रॉम द सिएन्ना वूड्स’ या रचनांमुळे त्याला युरोपात प्रचंड लोकप्रियता लाभली. जोहानच्या जीवनावर आणि संगीतावर आधारित युरोपात आणि हॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदíशत झाले. अल्फ्रेड हिचकॉकचा ‘वॉल्ट्झ फ्रॉम व्हिएन्ना’, वॉल्ट डिस्नेचा ‘दी वाल्ट्झ किंग’, ‘द ग्रेट वॉल्ट्झ’ हे त्यापकी काही.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

वृक्षारोपण : संवर्धन आणि संरक्षण

निरोगी, सशक्त वृक्षबाळाचे वैज्ञानिक पद्धतीने रोपण केल्यास त्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते. मात्र सुरुवातीची दोन वर्षे त्यांना ट्री गार्डचे संरक्षण हवेच. रोप वाढत असताना त्यास पाण्याची गरज नसते, कारण रोपाची मुळे जमिनीमधील ओलाव्याकडे धाव घेऊन खोडास मजबुती देतात. प्रखर उन्हाळ्यामध्ये मात्र पाणी हवे. वृक्ष सरळ वाढण्यासाठी ट्री गार्डच्या आतमध्ये फांद्या वाढू देऊ नयेत. खोडावरील खालच्या फांद्या नियमित कापल्यामुळे वृक्ष सरळ उंच वाढतो आणि खोड मजबूत होते. खोडाच्या सभोवती कमीत कमी १ मीटर मोकळी जागा हवी. या जागेमध्ये माती हवेशीर असावी, कारण वृक्षाला पाणी आणि आवश्यक मूलद्रव्ये देणारी मूळसंस्था येथेच कार्यरत असते. या भागातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, तसेच वृक्षास जैविक खताचा शाश्वत पुरवठा व्हावा म्हणून त्यावर शोभिवंत फुलांच्या वनस्पतींचा रांगता थर असावा परंतु त्याची वाढ खोडाभोवतीच मर्यादित असावी. भरपूर पर्णसंभार असलेले देशी वृक्ष असतील तर तेथे विविध पक्षी सातत्याने येत असतात, त्यामुळे वृक्षास हानिकारक किडींचा त्रास होत नाही. वृक्षारोपण केल्यावर तेथे लावलेल्या ट्री गार्डवर त्या वृक्षाचे स्थानिक व शास्त्रीय नाव, कूळ आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व मोजक्या शब्दांमध्ये लिहावे. शैक्षणिक संस्था, उद्याने यामधील वृक्ष या माहितीमध्ये औषधी उपयोगांचा समावेश असावा. शास्त्रीय पद्धतीने केलेल्या वृक्षारोपणामध्ये वृक्षांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य टक्के असते. मात्र अपवादाने एखादे रोप रोगग्रस्त झाल्यास ते रोप काढून टाकावे. मातीत बुरशीनाशके मिसळून काही दिवसांनी परत त्याच प्रकारचे नवीन रोप लावावे. वृक्ष हे भौगोलिक परिस्थितीनुसार वाढत असतात. त्यांना अनुकूल असलेल्या वातावरणामधून आपणास हव्या असणाऱ्या भागात वृक्षारोपणातून स्थलांतर म्हणजे त्यांच्या मृत्यूस आमंत्रणच होय.

वृक्षांचा सन्मान आणि वृक्षारोपणास प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्येक राज्याने त्यांचा स्वतंत्र राज्यवृक्ष निवडला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून केलेल्या वृक्षारोपणास शास्त्रीय बठक आणि कलेचे अंग असेल तर हा उपक्रम अतिशय सुंदर, आनंद देणारा आणि शाश्वत होऊ शकतो. त्यासाठी तुमचे वृक्षावर मनापासून प्रेम हवे.

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org