स्वत: युद्धकुशल सेनानी असलेल्या महाराजा रणजित सिंहांनी आपले सन्य युरोपियन पद्धतीने प्रशिक्षित करून शस्त्रास्त्रे अद्ययावत ठेवण्याचे काम कटाक्षाने केले. त्यांच्या फौज-ए-खासमध्ये सरदार हरिसिंग नलवा, सरदार गुरुमुखसिंग लांबा, सरदार शामसिंग अत्तारीवाला, मुलराज डेरा, जोरावरसिंग हे भारतीय; तर अलार्ड, व्हेंचुरा, क्लॉइड कोर्ट, पावलो अवीटाबील हे युरोपियन आणि अलेक्झांडर गार्डनर, जोसियान हेरियन हे अमेरिकन सेनाधिकारी होते. आपल्याशी हे परदेशी सेनाधिकारी किती निष्ठावंत आहेत याची महाराजा मधूनमधून चाचपणी करीत.
पाश्चिमात्य देशांत पूर्वेकडचे नेपोलियन म्हणून ओळखले जाणारे रणजित सिंह त्यांचा रुबाब व अगत्य यांनी पाहुण्यावर मोठा प्रभाव पाडत असत. रशियाचा राजकुमार नेसेलरोड याने पंजाबी व्यापाऱ्यांना रशियात काही सवलती आणि सुरक्षा देण्याचे आश्वासन १८२१ साली पत्राद्वारे दिले होते. जर्मन शास्त्रज्ञ बॅरन ह्यूजेलने पंजाब-काश्मिरात फिरल्यावर ‘ब्रिटिशशासित भारतापेक्षा महाराजांचा पंजाब अधिक सुरक्षित वाटला’ असे म्हटले आहे. व्हिक्टर जॅकमोंट हा फ्रेंच प्रवासी महाराजांचा चौकसपणा, मुत्सद्देगिरी, संभाषण चातुर्य यांनी प्रभावित झाला. महाराजांनी फ्रेंच, इंग्लिश संस्कृतिविषयक, नेपोलियन आणि त्याचे सन्य, देव, आत्मा, सतान, स्वर्ग, पाताळ वगरेंविषयक शेकडो प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडले. रणजित सिंह आजारपणामुळे लहानपणीच एका डोळ्याने अंध झाले होते. महाराजांच्या एका फ्रेंच सेनाधिकाऱ्याला कंपनी सरकारच्या एका ब्रिटिश सेनाधिकाऱ्याने कुचेष्टेने विचारले, ‘‘तुमचे एकाक्ष महाराजा राज्यकारभार कसे करू शकतात?’’ संतप्त फ्रेंच अधिकारी उद्गारला, ‘‘आमचे राजे एका डोळ्याने पाहतात तरी तुमचे ब्रिटिश सरकार आमच्या राज्याला हात लावायला धजावत नाही, महाराजा जर दुसऱ्या डोळ्याने पाहू लागले तर तुमच्या साम्राज्याची पुरती वाताहत होईल!’’
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल –  पॉलिस्टर तंतूमधील कमतरता
पॉलिस्टर तंतू हा  बहुतेक गुणधर्माच्या बाबतीत अतिशय चांगला, इतर नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपेक्षा वरचढ असला तरी या तंतूमध्ये तीन प्रमुख दोष आहेत.
पॉलिस्टर तंतूची बाष्पशोषक क्षमता ही त्याच्या वजनाच्या फक्त ०.४  टक्के इतकी असते. इतर कोणत्याही नसíगक किंवा मानवनिर्मित तंतूंपेक्षा ही अत्यंत कमी आहे. पॉलिस्टर तंतूच्या या गुणधर्मामुळे त्याचे कपडे लगेच सुकतात. परंतु या गुणधर्माच्या फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत. जेव्हा फार मोठय़ा प्रमाणावर हा बाष्प रूपातील घाम एकत्रितपणे शरीराबाहेर येतो तेव्हा त्याचे द्रवात रूपांतर होते. आपण अंगावर घातलेले कपडे जर बाष्प रूपातील किंवा द्रव रूपातील घाम शोषून घेऊ शकत नसतील तर हा घाम आपल्या त्वचेवरच राहतो आणि आपल्याला बेचन वाटू लागते. म्हणूनच १०० टक्के पॉलिस्टरच्या अखंड तंतूंपासून तयार केलेले कपडे अंगावर घालण्यासाठी आरामदायी नसतात.  
पॉलिस्टरच्या अल्प बाष्पशोषण क्षमतेमुळे या तंतूंची विद्युतवहन क्षमता कमी असते. कपडे वापरत असताना त्यांचे अनेक वस्तूंशी घर्षण होते आणि या घर्षणामुळे कपडय़ांवर स्थितिक विद्युत तयार होते. पॉलिस्टरच्या कमी वहन क्षमतेमुळे ही तयार झालेली स्थितिक विद्युत वाहून नेली जात नाही व ती कपडय़ांवर तशीच राहते. कित्येक वेळा, विशेषत: थंडीमध्ये, या स्थितिक विद्युतमुळे कपडय़ांमध्ये कडकड असा आवाज आलेला, तसेच कपडय़ांवर ठिणग्या पडल्याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. काही वेळा या स्थितिक विजेमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही स्थितिक विद्युत मानवाच्या आरोग्यावर, प्रामुख्याने त्वचेवर गंभीर परिणाम करते.  
सर्वसाधारणपणे कपडय़ांना रंग देताना तंतूमधील बहुवारिकामधील रासायनिक क्रियाशील रेणुसमूह आणि रंगातील  रासायनिक क्रियाशील रेणुसमूह यांची रासायनिक क्रिया होते आणि कापडावर रंग चढतो  व तो रंग रासायनिक क्रियेमुळे पक्का बसतो. परंतु पॉलिस्टर बहुवारिकामध्ये रासायनिकदृष्टय़ा क्रियाशील रेणूसमूह असत नाहीत, यासाठी पॉलिस्टर तंतूंमध्ये मोठय़ा दाबाखाली रंग घुसवावा लागतो आणि अशा रीतीने तंतूंमध्ये घुसवलेला रंग धाग्यांच्या बहुवारिकांमधील सूक्ष्म पोकळ्यांमध्ये विखुरतो. त्यामुळे अशा रंगांना विखुरणारा रंग  असे म्हणतात. या रंगाच्या कणांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. हा रंग तंतूंमध्ये व्यवस्थित शिरावा यासाठी कापडाचे तापमान वाढवले जाते आणि हवेच्या मोठय़ा दाबाखाली ही रंगाई केली जाते. तापमान वाढविल्यामुळे तंतू प्रसरण पावतात आणि रेणूंमधील अंतर वाढते आणि दाब दिल्याने रंगाचे कण तंतूंमध्ये शिरणे सोपे जाते.
विखुरणारे रंग खूप महाग असतात आणि उच्च तापमान आणि हवेचा मोठा दाब यामुळे ही रंगाई प्रक्रिया अतिशय खर्चीक असते.
चं. द. कोणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org