मध्यपूर्व पोलंडमधील वॉर्सा हे शहर, पोलंडची राजधानी आहे, तशीच वॉर्सा प्रांताचीही राजधानी आहे. इतर अनेक शहरांविषयी असते तशी वॉर्साच्या प्रथम वसतीबद्दलही एक आख्यायिका सांगितली जाते. सध्याच्या पोलंडमधील विसुला नदीकाठी वार्स आणि त्याची पत्नी सावा हे मच्छीमार जोडपे कधी काळी राहत असे. त्या प्रदेशाचा राजा झिमोनिस्ट वाट चुकून निवाऱ्याच्या शोधात असताना या कोळी जोडप्याने त्याला निवारा दिला. कृतार्थ होऊन राजाने ते जोडपे राहत असलेला प्रदेश त्यांना मालकी हक्काने भेट दिला. पुढे तिथे वसलेल्या गावाचं नाव वॉर्सा झालं! वॉर्सा शहराचा इतिहास फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे. हे शहर त्याच्या सौंदर्याबद्दल, स्थापत्याबद्दल विख्यात नसून त्याच्यावर अनेक शतकांपासून आक्रमकांची झालेली सत्तांतरे, त्यांनी केलेली शहराची राखरांगोळी आणि त्यातूनही चिकाटीने परत उभे राहिलेले वॉर्सा यामुळे चकित करणारे आहे. पुढच्या काळात वॉर्सावर झालेल्या आक्रमणातून १६५५ मध्ये पोलंड-लिथुनिया युतीविरुद्ध स्वीडन-प्रशिया आघाडीचे युद्ध होऊन स्वीडन विजयी झाले. १६५५ ते १६६० या काळात वॉर्सा स्वीडनच्या ताब्यात होते. १६६४ साली वॉर्सा रशियाच्या हातात पडले. वॉर्सा ही रशियन पोलंडची राजधानी झाली. पुढच्याच वर्षी १६६५ मध्ये नेपोलियनने वॉर्सावर आपला अंमल बसवला. १८१५ साली रशियाने वॉर्सा घेईपर्यंत वॉर्सा फ्रेंचांच्या ताब्यात राहिले, ते पहिले विश्वयुद्ध संपेपर्यंत. त्यानंतर स्वतंत्र पोलंडची राजधानी असलेल्या वॉर्साचा औद्योगिक विकास सुरू झाला. या काळात १९३६ साली वॉर्साची लोकसंख्या १३ लाख झाली आणि त्यापकी ४ लाख लोक ज्यू समाजाचे होते. जर्मनांनी १९३९ साली दुसऱ्या विश्वयुद्धाच्या सुरुवातीस  वॉर्सावर कब्जा केला. विश्वयुद्ध संपल्यावर वॉर्सा आणि पूर्ण पोलंड देशच सोविएत युनियनच्या पोलादी पडद्याआड गेले. ते पुढची ४५ वष्रे सोविएतचा एक भाग बनून राहिले. १९९० साली पोलंडमध्ये लोकनिर्वाचित प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले आणि वॉर्सा त्या सरकारची राजधानी झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ ; प्रा. ए. के. शर्मा

प्रा. अरुणकुमार शर्मा यांचा जन्म १९२४ साली कलकत्ता येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मित्रा इन्स्टिटय़ूट येथे झाले. त्यांनी आशुतोष महाविद्यालयातून १९४३ बी.एस्सी. आणि १९४५ साली एम.एस्सी.ची पदवी मिळवल्यावर ते यू.पी.एस.सी.च्या परीक्षेत पास झाले आणि त्यांची भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेत नेमणूक झाली. तेथील वनस्पतिसंग्रहालयात व उद्यानाच्या विकासावर विशेष भर दिला व वनस्पती संकलनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवला. १९४७ साली कलकत्ता विद्यापीठात अस्थायी शिक्षक आणि नंतर १९४८ साली साहाय्यक व्याख्याता म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांनी वर्धवान विद्यापीठातून डी. एस्सी.ची पदवी संपादन केली. त्यांना वनस्पतिशास्त्र विषयातील सायटोजिनेटिक्स आणि सायटोकेमिस्ट्री आणि सेल बायोलॉजी या विषयाची विशेष आवड निर्माण झाली.

प्रा. शर्मानी क्रोमोझोमचे (रंगसूत्रांचे) भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जाणून घेण्याचे नवीन तंत्र शोधून काढले, त्यास संपूर्ण जगात मान्यता मिळाली. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाला संशोधन केंद्र म्हणून नावारूपास आणले. वरील विषयात सहकार्यासोबत अनेक पुस्तके लिहिली. उदाहरणार्थ – क्रोमोझोम : थियरी अ‍ॅड प्रॅक्टिस. तसेच आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत सायटोलॉजी आणि तत्सम विषयावरील शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या शोधकार्यात आणि लिखाणात त्यांची सुविद्य पत्नी डॉ. अर्चना शर्मा यांचे मोठे साहाय्य लाभले.

प्रा. शर्मा यांना १९७२ साली जवाहरलाल नेहरू फेलोशिप मिळाली. १९७४ साली  इंडियन बोटॅनिकल सोसायटीचे बिरबल सहानी हे पदक मिळाले. तसेच १९७६ साली एस. एस. भटनागर पुरस्कार मिळाला. प्रो. शर्मा इंडियन सायन्स काँग्रेसचे प्रेसिडन्ट होते. १९८३ साली त्यांना पद्मभूषण किताब मिळाला. त्यांच्या पत्नी अर्चना शर्मा यांनादेखील वरील सर्व सन्मान मिळाले.

इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस बंगलोर, नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स, अलाहाबाद या संस्थांचे प्रा. शर्मा फेलो होते. प्रा. शर्मा १९७६ ते ७८ या काळात इंडियन सोसायटी ऑफ सायटोलॉजी अ‍ॅड्. सायटोजनेटिक्सचे अध्यक्ष होते.

–  डॉ. सी. एस. लट्टू

 मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org