मक्याशी आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मात्र अजूनही महाराष्ट्रात मका राहतो उंबरठय़ाबाहेरच. ताटात काही तो येत नाही फारसा.
मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. परंतु मका हे मुख्य अन्न नाही. त्याचं रूपांतर जनावराचं मांस, अंडी किंवा दुसऱ्या कोणत्या तरी प्रकारच्या प्राणीज पदार्थात होतं. आता तर मक्याची मुख्य लागवड इथेनॉल या इंधनासाठीच होते.
मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. त्यानंतरच्या धाडसी प्रवाशांनाही अमेरिकेच्या रेड इंडियन्सच्या मक्याच्या शेतीचं दर्शन झालं. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. रेड इंडियन्सनी मासे व मांसाहारासोबतच आपल्या शेतातील मक्याचा पूरक आहार स्वीकारला. भटक्या जमातींच्या शेतीत मक्यानं स्थान पटकावलं. मिसिसिपीच्या व नर्ऋत्येच्या दऱ्याखोऱ्यांत मका-शेती स्थिरावली. मागोमाग समाजातील वरच्या गटांनीही मक्याची शेती सुरू केली.  मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.
पॉप कॉर्न या मूळ मक्याच्या वाणातून शास्त्रज्ञांनी सुधारित वाण तयार केले. कडक उन्हामुळे मक्याच्या दाण्यांच्या लाह्य़ा झाल्या. इथूनच पॉप कॉर्नचा प्रवास  सुरू झाला.
१९४८च्या उन्हाळ्यात न्यू मेक्सिकोच्या उत्खननात प्राचीन गुहांमध्ये सहा फूट गाळात मक्याचे विविध प्रकारचे दाणे सापडले. प्राचीन आदिवासींनी हा साठा गुहेत केला असावा. यामुळे मक्याच्या उत्क्रांतीचा चित्रपटच हाती लागला.  पुढे नसíगक आणि १९३५च्या कृत्रिम तंत्रज्ञानाने आजच्या अनेक वाणांची निर्मिती झाली. मक्याची गुणवत्ता वाढत गेली.
– डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे)    
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ६ फेब्रुवारी
१९२७ – ‘श्री ज्ञानेश्वरी टीका’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे कर्ते गणेश कृष्ण आगाशे यांचे निधन. ‘श्री ज्ञानेश्वरी टीका’ हा एकमेव ग्रंथ लिहून ते थांबले असते तरी मराठी साहित्यातील त्यांचे योगदान कदापि विसरले गेले नसते. त्यांचा जन्म १८६४ साली कोल्हापूर येथे झाला. बी. ए. झाल्यावर कोल्हापूरच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. पुढे एल. एल. बी. झाल्यावर मिरजेस मुन्सफ आणि पुढे दिवाण पदावर त्यांना बढती मिळाली. विजापूरकरांच्या ग्रंथमालेसाठी आगाशे यांनी ‘कीटक सृष्टी’ आणि पाश्चात्या राष्ट्रांची सामाजिक उत्क्रांती हे ग्रंथ तसेच काशीयात्रा हा निबंध लिहिला. कोल्हटकरांच्या मतविकार आणि खाडिलकरांच्या विद्याहरण या नाटकांवरील त्यांच्या टीकालेखांमुळे एक चोखंदळ नाटय़मर्मज्ञ अशी त्यांची ख्याती झाली. मराठी साहित्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘श्री ज्ञानेश्वरी टीका’ हा त्यांचा ग्रंथ. सहा भागांच्या या ग्रंथातील पहिल्या पाच भागांत ज्ञानेश्वरीचा संहिता व तिच्यावरील टीका असून सहवा भाग उपसंहाराचा आहे. प्रत्येक ओवीतील बिकट शब्दांचे अर्थ देऊन ते अर्थच योग्य का हे त्यांनी समजावले आहे. मिरजेचे ‘खरे मंदिर’ हे त्यांच्या श्रमाचे प्रतिक होय.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : खोकला
खोकला ही गोष्ट म्हटले तर बारीकशी बाब. मात्र खोकला वारंवार येऊ लागल्याबरोबर दम्याची सुरुवात किंवा रात्री झोप न येणे असे प्रकार होऊ लागले की मग तो गंभीर प्रकार होऊन बसतो. खोकल्यावरची बहुतांशी इंग्रजी औषधे ही कफ सुकवणारी, खोकला कोरडा करणारी, मेंथॉल सारखी तीव्र घटकद्रव्ये असणारी असतात. त्याने तात्पुरता फायदा होत असला, तरी एकूण शरीरावर नेहमीकरिता अपाय होत असतो. खोकल्याकरिता कारणांबरोबर त्या वेळेच्या अवस्थेचा विचारही महत्त्वाचा आहे. खोकला हा केवळ कफाचा विकार नव्हे, त्याचा वायूशी संबंध आहे. त्याकरिता वातानुलोमनाचा विचार, अधिक चांगला परिणाम खोकल्याकरिता देतो. आपण पाच प्रकारच्या खोकल्यांचा विचार करत आहोत.
१) कोरडा खोकला बरा व्हायला सोपा आहे. रुक्ष, थंड, तिखट, उष्ण असे पदार्थ टाळावेत. चहा, धूम्रपान, फाजील बोलणे, जागरण, उपवास, मोठय़ाने बोलणे वज्र्य करावे. दमा वा अन्य विकारांकरिता तीव्र औषधे घेऊ नये. बी असलेल्या काळ्या मनुका स्वच्छ धुवून रोज पंचवीसतीस चावून खाव्या. एलादि वटी रोज सहा गोळ्या चघळाव्यात. वासापाक तीन चमचे दोन वेळा घ्यावा. २) कफ असणारा खोकला पूर्ण बरा होण्याकरिता पुदिना, आले, लसूण, ओली हळद, तुळशीची पाने, मिरे यांची चटणी करून खावी. मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या. नागरादि कषाय; अडुळसा, कोरफडयुक्त खोकला काढा घ्यावा. लहान बालकांना टाकणखार लाही मधाबरोबर चाटवावी. ३) डांग्या खोकला आतडी पिळवटून टाकणारा खोकला आहे. त्याकरिता बकुळीच्या फुलांचा रस मधातून द्यावा. प्रवाळ, कामदुधा या गोळ्या वासापाकबरोबर द्याव्यात. ४) गंडमाळा, टॉन्सिल्सचा खोकला या विकारात लक्ष्मीनारायण, दमागोळी, ज्वरांकुश या गोळ्या कफमिश्चरबरोबर द्याव्यात. चुन्याची निवळी द्यावी. ५) क्षयाच्या खोकल्यात चौसष्ट पिंपळी चूर्ण, खोकला चूर्ण, सितोपलादि चूर्ण, एलादि वटी, वासापाक, नागरादि कषाय व काळ्या मनुका यांचा यथायोग्य वापर करावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : आधुनिक जग आणि कर्करोग
हल्ली कॅन्सर झाला म्हणजे संपलेच अशी परिस्थिती उरलेली नाही. स्तनांचा कॅन्सर झालेल्या अनेक स्त्रिया यशस्वी उपचारानंतर अनेक वर्षे तर जगतातच, पण पुढे वृद्धापकाळामुळे किंवा इतर काहीतरी कारणांमुळे दगावतात. कॅन्सर आणि आम्ही प्लास्टिक सर्जन यांचे नाते आहे, कारण कोठलाही भाग काढला तर तो भाग परत बांधून  देणे हे आमचे काम असते.
    पूर्वी एक स्तन काढला तरी बायका तसेच दिवस काढत. जास्त पदर घेत. आपले वैगुण्य लपवत असत. पण स्तन ही स्त्रियांची एक महत्त्वाची खूण आहे. ते संपूर्णपणे झाकणे, त्यातील काही भाग सूचकतेने दाखवणे, मुद्दाम पदर पाडणे किंवा सावरणे किंवा त्यांचे उत्तान प्रदर्शन मांडणे या सर्व गोष्टी प्रसंग, प्रथा आणि प्रयोजन यावर ठरतात. हे विधान वैज्ञानिक आहे याची कृपा करून दखल घ्यावी. जशी एखादी कुलीन स्त्री अरण्यातही आपले अवयव लपवते, तसेच सत्कर्मी माणसे आपल्या कर्माचा उघड बभ्रा करीत नाहीत, अशी ज्ञानेश्वरांची ओवी असली तरी हल्लीच्या कुलीन स्त्रिया जास्त मोकळ्या झाल्या आहेत, यात शंकाच नाही आणि त्यात वावगे ते काय? पण या बदलत्या परिस्थितीमुळे कॅन्सरमुळे काढावा लागणारा स्तन परत बनवून द्या, अशी मागणी वाढत आहे.
    स्तनाचा कॅन्सर चाळिशीच्या आसपास किंवा नंतर होतो असे दिसते. या वयात बाळंतपण झालेल्या बहुतेक बायकांचे खालचे ओटीपोट सुटलेले असते. त्या भागाला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्या माहीत असतात. तेव्हा हा भाग वापरून, हलवून स्तन तयार करता येतो. अनायासे सुटलेले ओटीपोटही कमी होते आणि ज्याला पूर्वी जीन पँट म्हणत आणि हल्ली जीन्स म्हणतात त्या घालणे सोपे होते आणि कमी विद्रूप दिसते. हल्ली दुकानात ‘बाय वन- गेट वन फ्री’ असते असाच हा प्रकार आहे. खरेदी आणि स्त्रिया यांचे नाते असल्यामुळे त्यांना ही कल्पना पसंत पडते.
   असे दिसते की ज्या स्त्रियांच्या आईला, आजीला, मावशीला किंवा आत्यालाही जर स्तनाचा कर्करोग झालेला असेल तर त्या स्त्रियांमध्ये तो कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग होणे याचे प्रमाण इतरांच्या मानाने थोडे असते. जन्मजात दिसणारे कुरळे जावळ, घारे डोळे किंवा सावळा अथवा गोरा रंग यासारखे या आनुवंशिकतेचे चिन्ह स्पष्ट दिसत नाही आणि ज्या उरोभागात स्तन उगवणार आहे त्या पेशीतही रोग दडलेला नसतो, परंतु इथल्या पेशींची जातकुळी वेगळी असते. या पेशीसमूहात दहशतवादी, बेभान, उच्छृंखल आणि बेशिस्त पेशी ओळखण्याची आणि त्यांना मारून टाकण्याची इच्छाशक्ती कमी असते, म्हणूनच मग हा रोग बळावतो. ही काय भानगड आहे ते पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते 
rlthatte@gmail.com