Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९
प्रादेशिक

दीनानाथ दलाल, जॉन फर्नांडिस अशा कोणा दिग्गजाचे हे जलरंगांतील निसर्गचित्र नव्हे. हे आहे प्रत्यक्ष दृश्य, मुंबईच्या मध्यभागी असलेल्या आरे वसाहतीतील. डिसेंबर महिन्यात हुलकावणी देणारी थंडी जानेवारीमध्ये मात्र चांगलाच तळ ठोकून आहे. तांबडं फुटत असतानाचे हे दृश्य टिपले आहे वसंत प्रभू यांनी.

गोपीनाथ मुंडे यांचे ‘बहुजन तितुका मेळवावा!’
मुंबई, ५ जानेवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून रान पेटविणाऱ्या संभाजी ब्रिगेड, शिवसंग्राम या संघटना आणि त्यांचा बोलविता धनी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले जातीय राजकारणाचे डावपेच तीव्र केले असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध न करता ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको, अशी ठाम भूमिका घेत ‘ओबीसी तितुका मेळवावा’च्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक हरिभाऊ राठोड यांनीही आजच शिवाजी पार्क येथे भटक्या-विमुक्तांचा मेळावा घेऊन मुंडे यांच्या प्रयत्नांना शह देण्याचा प्रयत्न केला. भटक्या-विमुक्तांना सरकारच्या घरकुल योजनेतून घरे देण्याचे व रेशनकार्ड देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.

‘एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाचे छायाचित्रकार वसंत प्रभू यांच्या कामगिरीची ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून दखल
मुंबई, ५ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चर्चा जगभर झाली. त्यावेळी मुंबईतील छायाचित्रकारांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक अमेरिकेतील ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकानेही केले आहे. ‘वुइथ शटर्स क्लिक, बेअरिंग टू रॅम्पेज इन मुंबई’ या मथळ्याखाली एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे छायाचित्रकार वसंत प्रभू यांनी काढलेल्या छायाचित्रांचा हवाला प्रभूंच्या अनुभवांचे वृत्तांकन करण्यात आले आहे. त्या वृत्तात लिहिले आहे की, उधळून लावलेली टेबले, तुटलेल्या काचा, स्विमिंग पूलच्या बाजूला पडलेले परदेशी पर्यटकांचे मृतदेह यांची छायाचित्रे आजही एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे छायाचित्रकार वसंत प्रभू यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत. ताजमहाल पॅलेसमध्ये ज्यावेळी दहशतवाद्यांनी हाहाकार माजवला होता, त्यावेळी प्रभू त्या ठिकाणी उपस्थित होते.

‘गृहस्वप्ना’चा एफएसआय घोटाळा अद्याप चौकशीच्या चक्रातच!
मुंबई, ५ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईत उपनगरात एक इतका एफएसआय आणि एक इतका टीडीआर मिळतो, याची कल्पना असतानाही म्हाडातील उच्चपदस्थांच्या ‘गृहस्वप्न’ सोसायटीने २.४ इतका एफएसआय बेकायदा घेतल्याचे प्रकरण तब्बल वर्षभर फक्त चौकशीच्या चक्रात फिरत आहे. विधिमंडळ अधिवेशनात यावर चर्चा होऊ नये म्हणून उच्चपदस्थांकडून दबाव आणल्याचे समजते.

कायदा व वैद्यकीय व्यवसाय विषयावरील परिषदेचे आयोजन
मुंबई, ५ जानेवारी / प्रतिनिधी

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्स्लटन्ट आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कायदा व वैद्यकीय व्यवसाय’ या विषयावरील एक आगळी वेगळी परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. वैद्यकीय विषयाशी निगडित कायदे, रुग्ण व डॉक्टरांचे हक्क व जबाबदाऱ्या, वैद्यकीय व्यवसायातील त्रुटी अशा अनेक विषयांवर या परिषदेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
‘कायदेशीर नोटीस मिळाली पुढे काय?’ व ‘रुग्णाचा अचानक मृत्यू पुढे काय’ या विषयांवरील कार्यशाळा ३१ जानेवारी रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, जुहू येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी ‘रुग्णांशी संभाषण’ या विषयावरील नाटिका आणि ‘वैद्यकीय कायद्यातील बदल’ व ‘वैद्यकशास्त्रात चुका कुठे होतात?’ या विषयावरील परिसंवाद जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेल, जुहू येथे होणार आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड, विधीज्ञ राम जेठमलानी, न्यायमूर्ती वाग्यानी, पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, डॉ. अरुण बाळ, डॉ. ललित कपूर, डॉ. संजय ओक आदी मान्यवर या परिषदेत सहभागी होणार आहेत. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सेस’ खेरीज वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्था या परिषदेशी संलग्न आहेत. इच्छुक डॉक्टरांना या परिषदेत भाग घेण्यासाठी ६६६.ंेूे४ेुं्र.ूे या वेबसाइटवरील परिषदेचे माहितीपत्रक व अर्ज डाऊनलोड करता येईल. नाव नोंदणीसाठी ०२२-२४३८३४९८ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

कल्याण मनपाचे सहायक आयुक्त जगदाळे निलंबित
कल्याण, ५ जानेवारी / वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर जगदाळे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्यात कसूर केल्याने आयुक्त गोविंद राठोड यांनी त्यांना निलंबित केले. अनधिकृत बांधकामाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने एक समिती नेमली आहे. तरीही अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे जगदाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे आयुक्तांनी सांगितले. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

केईएममधील महिला डॉक्टरची आत्महत्या
मुंबई, ५ जानेवारी / प्रतिनिधी

परळच्या महात्मा गांधी रुग्णालयातील वसतिगृहात आज एका २५ वर्षीय महिला डॉक्टरने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे जीवनाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. आत्महत्या करणाऱ्या या डॉक्टरचे नाव रोहिणी गणेश सोनावणे असून, ती केईएम रुग्णालयातून पदव्युत्तर शिक्षण घेत होती. रोहिणीचा भाऊ आज सायंकाळी वसतिगृहात तिला भेटण्यासाठी गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काळाचौकी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.