सामाजिकता आणि वैयक्तिकता ही परस्परांना पूरक अशी मानवी जीवनाची दोन अंगे आहेत. समाजप्रियता ही माणसाची गरज आहे. निकोप जीवनासाठी माणसाला समाजात मिळून मिसळून राहावे लागते. लोकसंपर्काविना जीवन म्हणजे ‘जीवना वेगळी मासोळी’ अशी आपली अवस्था होते.
ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या सेमिटिक धर्मानी सामाजिक जीवनाप्रमाणे पतिपत्नीमधील आध्यात्मिक जीवनासाठी सामुदायिकतेचे तत्त्व लागू केले आहे. जीव आणि शिव यांचे नाते आत्यंतिक खासगी आहे. पती आणि पत्नी यांच्या नात्यासारखे ते वैयक्तिक आहे. अतिशय गहिऱ्या नातेसंबंधाचा आविष्कार त्यांच्या शय्याकक्षात होत असतो. परंतु ते चोवीस तास आपल्या खोलीत बंदिस्त राहात नाहीत. ती एकांतातून जणू लोकांतात येतात. कुटुंबातील अनेकांबरोबर त्यांचा संपर्क येत असतो.
प्रार्थनेचेही तसेच आहे. साधकाने परमात्म्याशी एकांतात हृदयसंवाद साधावा, असे प्रभू येशूने शिकविले. त्याने साधकाला बजावले, ‘तू जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घे आणि आपल्या गुप्तनिवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल.’’ येशूने स्वत: रात्रीच्या रात्री एकांतात अदृश्याच्या सहवासात घालविल्या. त्या परम आणि चरम प्रसंगी तो त्याच्या परमात्मा पित्याबरोबर एकांती होता. प्रार्थना वैयक्तिक असते, तशीच ती सामुदायिक असते. ‘‘आम्हांला प्रार्थना करायला शिकवा’’ अशी आर्जवे शिष्यांनी केली तेव्हा प्रभूने त्यांना ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या’ ही समूह प्रार्थना शिकविली. ही समष्टीची प्रार्थना आहे. सर्वाची अन्नाची गरज पूर्ण व्हावी, सर्वानी एकमेकांना क्षमा करावी, सर्वाची दुष्टपणापासून मुक्तता व्हावी, अशी विनंती त्यात केली आहे. एका हाताने प्रार्थना करता येत नाही. दोन्ही हात एकत्र जुळवावे लागतात. वैयक्तिक आणि सामुदायिकता हे साधकाचे दोन हात आहेत. ते एकत्र जुळले म्हणजे परिपूर्ण प्रार्थना साकारते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com
तारे हे नेहमी एकाच तेजस्वितेने प्रकाशतात की त्यांची तेजस्विता बदलू शकते?
आकाशातील ताऱ्यांचं लुकलुकणं सर्वपरिचित आहेच. तारे अशाप्रकारे लुकलुकण्याचं कारण पृथ्वीभोवतालचं वातावरण हे आहे. उंच डोंगरावरून काळोख्या रात्री स्थिर वातावरणात ताऱ्यांचं लुकलुकणंही फारसं जाणवत नाही. वर्षांनुर्वष ताऱ्यांची तेजस्विता बदलत नाही हे निरीक्षण वरवर पाहता योग्य वाटतं. पण जर ताऱ्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं तर काही ताऱ्यांची तेजस्विता कमी-जास्त होताना आढळते. ज्या ताऱ्यांची तेजस्विता एका ठराविक कालावधीत कमी-जास्त होताना आढळते, त्या ताऱ्यांना ‘रूपविकारी तारे’ असं म्हणतात. रूपविकारी ताऱ्यांचं खगोलशास्त्रात महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक तारा त्याच्या जन्मानंतर ठरावीक टप्प्यांवर अस्थिर असतो. या अस्थिरतेमुळे त्याच्या तेजस्वितेत फरक पडतो. या फरकामध्ये बऱ्याच वेळेला एक सातत्य असतं. ताऱ्यांची तेजस्विता सर्वात जास्त झाल्यानंतर ती हळूहळू कमी होऊ लागते. ठरावीक काळानंतर तेजस्विता कमीत कमी होते व त्यानंतर पुन्हा वाढू लागते. ज्या ठरावीक कालावधीत तेजस्वितेचं एक चक्र पूर्ण होतं, त्याला ‘आवृत्तिकाल’ असं म्हणतात. ताऱ्याची ही अस्थिर अवस्था हजारो ते लाखो र्वष टिकते. दक्षिण आकाशात दिसणाऱ्या तिमिंगल तारकासमूहातील ‘ओमिक्रॉन’ हा तारा अतिशय प्रसिद्ध रूपविकारी असून त्याची तेजस्विता +२.९ पासून +९.६ पर्यंत मंदावते. या ताऱ्याचं तेजस्वितेचं एक चक्र पूर्ण होण्यासाठी सुमारे ३३१ दिवस लागतात. १५९६ मध्ये डेव्हिड फॅब्रिशिअस या खगोलशास्त्रज्ञानं या ताऱ्याची रूपविरिता सर्वप्रथम शोधली. त्या वेळी दुर्बिणीचा शोधही लागायचा होता. या ताऱ्याच्या आश्चर्यकारक रूपविकारितेमुळे याचं नाव ‘मिरा’ असं ठेवलं. ‘मिरा’ या लॅटीन शब्दाचा अर्थ ‘सुंदर’ असा होतो. ‘मिरा’ हा आधुनिक काळात शोधलेला पहिलाच रूपविकारी होता.आकाशात अनेक प्रकारचे रूपविकारी तारे आढळतात. यातील सेफिड प्रकारचे, बिटा लायरी प्रकारचे, अल्गोल प्रकारचे असे अनेक प्रकारचे रूपविकारी तारे खूप महत्त्वाचे आहेत. या ताऱ्यांमुळे ताऱ्यांची उत्क्रांती अवस्था उलगडण्यास मदत झाली.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८
कानपूरच्या एका झोपडपट्टीत वाढलेल्या परंतु राजकुमार आणि बिजोयकुमार या क्रांतिकारक भावांमुळे क्रांतिकारकांची दीदी म्हणूनच लोकप्रिय झालेल्या सुशीलादीदी घोष.. पती आणि त्या दोघेही नोकरीव्यवसायात.. भावांना १० वर्षांची शिक्षा होताच वडील खचले आणि कुटुंबाचा भार दीदीवर आला. क्रांतिकारकांना आश्रय देणाऱ्या, त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्या, फाशी रद्द व्हावी म्हणून गांधींनाही भेटणाऱ्या दीदींची छायाचित्रे खतरनाक महिला म्हणून पोलीस ठाण्यात असत. ३२ च्या सविनय कायदेभंगातही त्या होत्या. परंतु याच सुशीलादीदी असे पोलिसांना सिद्ध करता न आल्याने त्या सुटल्या. १३ जानेवारी १९६३ ला त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर
बीनाच्या बाबांना मासे खूप आवडायचे. ते मूळचे कोकणातले. आता पुण्यात राहात होते. बाबांना समुद्रातले मासे आवडायचे तर आईला गोडय़ा पाण्यातले. कारण तिच्या गावाजवळ मोठे तळे होते आणि त्या तळ्यातले मासेच गावात मिळायचे. बीनाला मात्र मुरंबा, पोळी, बटाटय़ाची भाजी, वरण, उसळ हे जेवण आवडायचे.
सुटीचा दिवस होता. आई सकाळीच मासे घेऊन आली होती. बीना आईला वर्गातल्या गमती सांगत होती. ऐकत ऐकत आईने बाजारातून आणलेली पिशवी ताटात पालथी केली. बीनाचे डोळे हे. एवढे. मोठे झाले. आईने आणलेल्या चार माशांपैकी दोन मासे चक्क हालचाल करत होते. बीनाने आईचे हात घट्ट पकडले. ‘‘आई, प्लीज प्लीज प्लीज मला हे मासे पाळायला दे ना ग!’’ ती कळवळून, अजीजीने म्हणत राहिली. ‘आई दे ना. नाही म्हणू नकोस.’ ‘वेडी आहेस का, अग ते थोडय़ा वेळात मरून जातील’, आई म्हणाली. तोपर्यंत बीना उठली. तिचा लहानपणाचा आंघोळीचा टब पाण्याने भरून घेऊन आली. माशाला उचलायला तिने हात जवळ नेला तोच माशाने हालचाल केली. बीना जरा गडबडली. ‘‘ए आई, तूच उचलून टाक ना त्यांना पाण्यात.’’
आता आईही बीनाच्या बरोबर माशांची काळजी करायला लागली होती. ‘‘अग थांब, जरा मोठा टब घेऊ. हा लहान आहे.’’ तिने मोठा टब आणला. मासे पाण्यात सोडले. दोन काळे, चकचकीत, वाटोळ्या डोळ्यांचे मासे शेपटी हलवत एका लयीत पाण्यात फिरू लागले आणि बीनाला आभाळाएवढा आनंद झाला. साऱ्या मित्रमैत्रिणींना फोन करून तिने ही बातमी दिली. बीनाच्या घरी बालगोपाळांची गर्दी जमली. पंख आणि शेपटी हलवत एखाद्या नर्तकासारखे ऐटीत आणि चपळपणे फिरणारे मासे पाहून जो तो मनात विचार करू लागला. आपल्या घरीही असे कुणी असेल तर किती गंमत येईल.
संध्याकाळी बाबा घरी आल्यावर बीना धावत त्यांच्याकडे गेली आणि बोटाला धरून त्यांना मासे दाखवायला घेऊन आली. ‘‘यातला एक अगदी मऊ आणि आळशी आहे. बाबा. त्याचं नाव काळू आणि दुसरा सारखा इकडून तिकडे तिकडून इकडे करतो तो चपळू.’’ ‘‘अरे वा! बीनाताईंचे मासे अगदी छान आहेत बुवा. कधी आणले.’’ बाबांनी विचारले. बीना गोंधळली. खरे कळले तर बाबा ओरडतील म्हणून रडवेली झाली आणि आईकडे पाहू लागली. आई म्हणाली, ‘‘अहो आज जेवायच्या आधी एक महत्त्वाचे काम करूया. बीनाच्या माशांसाठी खाणं आणि काचेच घर आणू या.’’ बीनाने धावत जाऊन आईच्या कंबरेभोवती आनंदाने मिठी मारली. बाबा म्हणाले, ‘‘चला, आपल्या आधी मासे जेऊ देत.’’ त्यांनी बाहेर जाऊन स्कूटर सुरू केली. बीना लाडक्या काळू-चपळूकडे वळली. एखाद्या सजीवाचा नाश करण्याऐवजी त्याला जगू देणं यासारखी समाधानाची गोष्ट नाही.
आजचा संकल्प- मी एखादा पाळीव प्राणी पाळेन आणि त्याला काळजीपूर्वक व प्रेमाने वाढवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com
|