Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, १३ जानेवारी २००९
विशेष लेख
पत्रकार-बातमीदार हा निखळ मनोरंजनाचा विषय ठरू शकतो, लहान मुलांसाठीच्या कार्टून स्ट्रिपच्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध होऊ शकतो, यावर सध्याच्या माध्यमयुगात विश्वास बसणार नाही. परंतु असे एक पात्र आहे. ‘शोधपत्रकारिता’ आणि ‘निरागसता’ या दोन संकल्पना तशा परस्परविरोधीच, परंतु ‘टिनटिन’ने त्यांची विलक्षण लोभस सांगड घालीत नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्याचा हा वाढदिवस जगभर साजरा झाला..
दहशतवादविरोधी मोहिमांपासून रिअॅलिटी शोपर्यंत. सध्या सर्वच क्षेत्रांचे माध्यमीकरण झाले आहे. खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमपासून संगीत-नाटय़कलावंतांच्या ग्रीन रूमपर्यंत माध्यमाचे कॅमेरे पोहोचले आहेत. त्यातच ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली शोधपत्रकारिता, म्हणजे ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’ची थट्टा सुरू आहे. कधी आपल्या वाहिनीचा ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी, तर कधी व्यक्तिगत सूडबुद्धीमुळे शोधपत्रकारितेचे कातडे पांघरलेले पत्रकार समाजात वावरत आहेत. हल्लीचा जमानाही उल्टा-पुल्टाच आहे म्हणा! विकासात्मक कार्याला प्रसिद्धी देण्यासाठी माहिती मिळविण्याकरिता शोधपत्रकारिता करावी लागते नि एखाद्या गैरकारभाराची फाईल टेबलवर आयती उपलब्ध होते!
हे सर्व माध्यमपुराण सांगण्याचे कारण म्हणजे पत्रकारिता, पत्रकार-बातमीदार हा निखळ मनोरंजनाचा विषय ठरू शकतो, लहान मुलांसाठीच्या कार्टून स्ट्रिपच्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध होऊ शकतो, यावर सध्याच्या माध्यमयुगात विश्वास बसणार नाही. परंतु, असे एक पात्र आहे. भाषा-खंडांच्या मर्यादा ओलांडून जगप्रसिद्ध झालेले. टिनटिन.
बेल्जियममधील कार्टूनिस्ट जॉर्ज रेमी यांच्या कल्पनेतून टिनटिन हे पात्र साकार झाले. १० जानेवारी १९२९ साली ‘ल सिएकल’ या फ्रेंच वृत्तपत्रामधून लहान मुलांसाठीची कार्टून मालिका म्हणून टिनटिनचे पदार्पण झाले. एखाद्या सनसनाटी स्टोरीच्या शोधात असलेला तरुण बातमीदार, म्हणजे हा टिनटिन. देव आनंदप्रमाणे केसांचा तुरा राखणारा टिनटिन हा जोडीला स्नोई हा कुत्रा घेऊन शोधपत्रकारितेच्या मोहिमेवर जात असे.
आपल्याकडे फास्टर फेणे, डिटेक्टिव्ह डीटी अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करणाऱ्या व्यक्तिरेखांची पुस्तके बाळगोपाळांमध्ये प्रसिद्ध होती. ‘करमचंद’, ‘व्योमकेश बक्षी’, ‘डिटेक्टिव्ह धीरज’ अशा गुप्तहेर शोधमोहिमांच्या मालिकाही गाजल्या. सत्यजित राय यांचा ‘फेलूदा’ त्यांच्या कथांतून, ‘शोनार केल्ला’सारख्या बंगाली चित्रपटांतून गाजला. दूरदर्शनच्या पहिल्या टप्प्यामध्ये ट्रान्सटेल या जर्मन कंपनीशी झालेल्या करारांतर्गत ओल्ड फॉक्स ही गुप्तहेराच्या कामगिरीवर आधारित परदेशी मालिका आवडीने पाहिली गेली. अहो, आपल्या जेम्स बॉण्डचेच उदाहरण घ्या की! त्याचा नवा चित्रपट प्रदर्शित होण्याचा अवकाश, जगभर कोटय़वधी डॉलर खर्ची पाडून प्रोमोज झळकतात.
टिनटिन या सर्वापेक्षा हटके! लहान मुलांनाच डोळ्यासमोर ठेवून टिनटिन आणि त्याच्या बरोबरच्या व्यक्तिरेखा विकसित केल्यामुळे त्या कथानकामधील निरागसता हे आगळे वैशिष्टय़ ठरते. १९२९ नंतर अगदी १९८३ पर्यंत ‘अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ या शीर्षकाचे २४ कथाखंड प्रकाशित करण्यात आले. एखाद्या गैरप्रकाराची माहिती मिळून त्या मोहिमेवर टिनटिन रवाना होतो, त्यानंतर प्रथम कोणत्या तरी पेचप्रसंगात सापडतो आणि सरतेशेवटी तो सर्व प्रकार उघडकीस आणण्यात त्याला यश येते, अशा धाटणीवर टिनटिनचा प्रवास. परंतु, टिनटिन हे केवळ मनोरंजनात्मक व्यक्तिरेखा-कथानक राहिले नाही. सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे साधन म्हणून त्याच्या पत्रकारितेचा वापर करण्यात आला. समकालीन आंतरराष्ट्रीय मुद्दय़ावर टिनटिनच्या माध्यमातून प्रहसनात्मक टिप्पणीही करण्यात आली. त्यामुळेच कालांतराने टिनटिन हे केवळ बालचमूचे कार्टून म्हणून मर्यादित राहिले नाही. आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय होत ‘फॅमिली एन्टरटेनमेंट’च्या संकल्पनेचे टिनटिन हे अनेकार्थाने प्रतीक ठरले.
‘टिनटिन इन लॅण्ड ऑफ सोव्हिएट’च्या माध्यमातून पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडावर प्रकाश टाकण्यात आला होता. ‘टिनटिन इन कॉँगो’मुळे तेथील सामाजिक आंदोलनांची दखल घेण्यात आली. ‘डेस्टिनेशन मून’ आणि ‘एक्स्प्लोअर्स ऑफ मून’च्या सादरीकरणामधून १९५०-६० च्या दशकांमधून चांद्रमोहिमांसाठी अमेरिका-रशियामध्ये चाललेली चढाओढ चित्रित करण्यात आली. ‘टिनटिन इन तिबेट’द्वारे दलाई लामा आणि तिबेट आंदोलनाचा वेध घेण्यात आला. याच गोष्टीमधून टिनटिन आपल्या हिमालयाच्या सफरीवर आला होता. ‘टिनटिन इन अमेरिका’ या मालिकेद्वारे अतिप्रगत डॉलरभूमीवरही टिनटिन बागडला. अशा विविधांगी, विश्वव्यापी स्वरूपामुळेच ‘टाइम’ नियतकालिकाच्या कव्हर स्टोरीप्रमाणेच गेली सात-आठ दशके टिनटिनच्या शोधमोहिमा जागतिक औत्सुक्य आणि चर्चेचा विषय ठरल्या!
दुसऱ्या महायुद्धामध्ये बेल्जियमवर हिटलरचे आक्रमण झाले नि टिनटिनचे जन्मदाते वृत्तपत्र ताब्यात घेतले गेले. काही काळ टिनटिनची लेखणी थंडावली. ‘टिनटिन इन अमेरिका’ आणि ‘दी ब्लॅक आयलण्ड’ या दोन खंडांवर नाझी सत्ताधीशांनी बंदी घातली. टिनटिनचा जनक जॉर्ज आणि त्याच्या सहकाऱ्यांना चौकशी समितीलाही सामोरे जावे लागले. ‘टिनटिनच्या माध्यमातून आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय आघाडीची बाजू लावून धरत नसून केवळ चरितार्थ व लोकरंजनासाठी ही मालिका चालवीत आहोत,’ असे स्पष्टीकरण त्यांनी या चौकशीदरम्यान दिले. हिटलरशाहीच्या अस्तानंतर काही कालावधीसाठी टिनटिनच्या लेखणीतील राजकीय भाष्याची, त्यातील औपरोधिक शैलीची धार काहीशी कमी नक्कीच झाली.
टिनटिनप्रमाणेच त्यामधील अनेक व्यक्तिरेखा वाचकप्रिय ठरल्या. स्नोई हा त्याचा कुत्रा, शोधमोहिमांमध्ये टिनटिनची साथ देणारा कॅप्टन हॅडॉक, शोध-संदर्भाची रसद पुरविणारा ‘अबसेंट माईण्डेड’ प्रोफेसर कॅलक्युलस, टिनटिनच्या मोहिमांमध्ये विनोदाची कारंजी उडविणारे थॉम्सन अॅण्ड थॉम्सन हे दोन धांदरफळे गुप्तहेर आदींनी टिनटिनच्या निरागस, हलक्याफुलक्या मार्मिक विनोदात्मक शैलीमध्ये भर टाकली.
प्रस्थापितांविरोधीचे, म्हणजेच पर्यायाने अमेरिकेविरोधी भाष्य आणि युरोप-अमेरिकेदरम्यान स्पर्धात्मक चढाओढीमुळे टिनटिनला डॉलरची बाजारपेठ म्हणावी तेवढी गाजविता आली नाही. वॉल्ड डिस्ने, वॉर्नर ब्रदर्ससारख्या बडय़ा स्टुडिओच्या स्पर्धेत मर्यादित यश मिळणे, हीसुद्धा टिनटिनसाठी मोठी कामगिरी ठरली. परंतु, तरीही बेल्जियममध्ये जन्मलेला टिनटिन हा केवळ युरोपपुरताच मर्यादित राहिला नाही. गेल्या ८० वर्षांच्या वाटचालीमध्ये ‘क्लासिकल युरोपीय कार्टून’ म्हणून संबोधिण्यात आलेल्या टिनटिनची शोधपत्रकारिता ५० भाषांमधून वाचकांपर्यंत पोचली. आजमितीस टिनटिनच्या जगभरात तब्बल दोन अब्ज प्रती खपल्या आहेत!
जगभरातील कार्टूनविश्वावर वॉल्ट डिस्नेचा पगडा आहे. ‘टॉम अॅण्ड जेरी’, ‘मिकी माऊस’ आणि बरेच काही. गेल्या पाच-सात वर्षांमध्ये जपानी-चिनी काटरून भारतीय वाहिन्यांच्या माध्यमातून बाळगोपाळांच्या पसंतीस उतरली आहेत. शिनचॅन हे वात्रट कार्टे हे त्यापैकीच एक. कायम मदतीस धावून येणारा निन्जसुद्धा आवर्जून पाहिला जाणारा. या तुलनेत अभिजात शास्त्रीय संगीताप्रमाणे टिनटिन हा अगदी दर्दी कार्टूनरसिकांपुरताच मर्यादित राहिलाय. अस्सल इंग्रजी माध्यमातून आणि कॉन्व्हेंट शाळांमधून शिकलेली मुले-मुली, लष्करी आस्थापनांमधील तरुण पिढी, ब्रिटिश कौन्सिलसारख्या ग्रंथालयांचे सदस्य अशा ‘क्रीम ऑफ दी सोसायटी’ने टिनटिनचा वाचनास्वाद घेतला आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्टूनच्या माध्यमातूनही गेल्या काही वर्षांमध्ये टिनटिन भारतीय प्रेक्षकांशी संवाद साधतो आहे.
शोधपत्रकार असूनही निरागसता जपणाऱ्या टिनटिन या व्यक्तिरेखेचे जानेवारीत ‘सहस्त्रचंद्रदर्शन’ साजरे होत आहे. त्या निमित्ताने टिनटिनच्या धाडसाचे किस्से कार्टूनविश्वात पुन्हा नक्कीच धमाल उडवतील!
आशीष पेंडसे
ashpen6@yahoo.com