
रविवारी शाकंभरी पौर्णिमा हा मांढरदेवी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मांढरगडावर राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी काळुबाई दर्शनासाठी मोठीच्या मोठी रांग लावली होती. (छाया- राहुल देशपांडे, सातारा)
महाराष्ट्रात जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसला झुकविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
नवी दिल्ली, १२ जानेवारी/खास प्रतिनिधी
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटपाची चर्चा अनुकूल ठरावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय नखरे सुरु झाले आहेत. विविध राज्यांमध्ये लोकसभेच्या सुमारे १५ अतिरिक्त जागा मागून तसेच माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या ‘उमेदवारी’ला समर्थन देण्याची घोषणा करीत काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे दडपण आणण्याचा आज राष्ट्रवादीने प्रयत्न केला.
‘ऊर्जा आस्थापनांचे संरक्षण गरजेचे’
नवी दिल्ली, १२ जानेवारी/पीटीआय
मुंबईतील दहशतवादी हल्ला हा भारताच्या आर्थिक विकासावरचा आघात होता, त्यामुळे हायड्रोकार्बन क्षेत्रातील ऊर्जा आस्थापनांनी स्टेट व नॉन स्टेट अॅक्टर्सपासून त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सांगितले.
सत्यमला जीवदान देण्याचे प्रयत्न सुरु
राजूचे ‘गॉडफादर’ राजशेखर रेड्डींवर भाजपचे टीकास्त्र
नवी दिल्ली, १२ जानेवारी/खास प्रतिनिधी
माजी सीईओ रामलिंगम राजू यांनी केलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे मोडकळीस आलेल्या सत्यमला जीवदान देण्यासाठी केंद्र सरकारने विविध पातळ्यांवर प्रयत्न आरंभिले आहेत. दरम्यान, रामलिंगम राजूचे ‘गॉडफादर’ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी असल्याचा आरोप आज भाजपने केला.
कार्पोरेट जगताला हादरा देणाऱ्या सत्यमचा घोटाळा उजेडात आल्यानंतर सत्यमशी संबंधित सर्व घडामोडींवर पंतप्रधान मनमोहन सिंगही बारकाईने नजर ठेवून आहेत. रामिलगम राजूने केलेल्या घोटाळ्याचा फटका सत्यमच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांना बसू नये, अशी त्यांची भावना असल्याचे समजते. आज सेबीचे अध्यक्ष चंद्रशेखर भावे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धाचे वातावरण नाही -मोहंती
भुवनेश्वर, १२ जानेवारी/पी.टी.आय.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर भारत व पाकिस्तानच्या सीमेवर युद्धाची शक्यता नसल्याचे लष्कराच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. के. मोहन्ती यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘भारताला शेजारी राष्ट्रांशी नेहमीच सलोख्याचे संबंध हवे आहेत मात्र, त्यांनी मर्यादा ओलांडल्यास त्याही परिस्थितीला तोंड देण्यास आम्ही दोनशे टक्के समर्थ आहोत.’’
‘२६/११’ नंतर पाकिस्तानी लष्कराच्या कथित हालचालींबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘असल्या हालचालींनी भारताला फरक पडत नाही. पाकिस्तानने हल्ला करण्याचे धाडस केले तर, भारत त्याला तितक्याच किंबहुना त्याहून अधिक सक्षमपणे उत्तर देईल.’’ मुंबईतील घटनेनंतर संपूर्ण जगासमोर पाकिस्तान एकटा पडला असून, तो हल्ल्याचे धाडस मुळीच करणार नाही, असे ते म्हणाले. ‘‘पूर्वीच्या धडय़ावरून पाकिस्तान हल्ला करण्याची चूक पुन्हा करणार नाही, याची खात्री आहे.’’
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एफ. एच. मेजर यांनी, ‘कोणतीही आगळीक घडलीच तर, भारतीय हवाई दल त्याला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.’ असे कालच म्हटले होते. त्यानंतर एका दिवसाने मोहान्ती यांनी वरील विधान केले असून त्यामुळे युद्धाची वातावरण नसल्याचे अधिक स्पष्ट झाले आहे.
भारत २०२० पर्यंत माणसाला चंद्रावर
उतरवणार -अण्णादुराई
सालेम, १२ जानेवारी/पीटीआय
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो इ.स. २०२० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवेल असे चांद्रयान-१ या मोहिमेचे प्रकल्प संचालक एम.अण्णादुराई यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिलीवहिली चांद्रमोहीम यशस्वी केली आहे.
ते म्हणाले की, गेल्या ऑक्टोबरमध्ये चांद्रयान-१ या अंतराळयानाचे उड्डाण यशस्वी झाले. त्यामुळे आता वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या दोन वर्षांत चांद्रयान-२ मोहीम पूर्ण केली जाईल व त्यानंतर चांद्रयान-३ मोहीम हाती घेण्यात येईल. चांद्रयान मोहिमेतून मोठय़ा प्रमाणात माहिती उपलब्ध झाली आहे व त्याचे विश्लेषण करण्यात वैज्ञानिक गुंतले आहेत.
चांद्र संशोधनासाठी संयुक्त संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी अनेक देशांनी भारताकडे विचारणा केली आहे, असेही अण्णादुराई यांनी स्पष्ट केले आहे.
इंधनाच्या किमतीत १० दिवसांत कपात
नवी दिल्ली, १२ जानेवारी/पी.टी.आय.
येत्या दहा दिवसांमध्ये इंधनांच्या किमतींमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. मात्र, ही कपात किती प्रमाणात करायची हे अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर निश्चित केले जाईल, असे पेट्रोलियम राज्यमंत्री दिनशा पटेल यांनी सांगितले.
पेट्रोटेक परिषदेनंतर वार्ताहरांशी इंधनांच्या किमतींबाबत बोलताना पटेल म्हणाले, ‘‘मध्यमवर्गीय व शेतक ऱ्यांना दिलासा देण्यासाठी इंधनाच्या किमती कमी करण्याचा आमचा प्रयत्न असून, त्याकरता अर्थ खात्याशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. मात्र, किती प्रमाणात किमती कमी करावयाच्या याबाबत मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जाईल.’’
मागील महिन्यात जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली होती. त्यावर पेट्रोल व डिझेलच्या किमती अनुक्रमे पाच व दोन रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तेलाच्या किमतीही आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाल्यामुळे शासकीय पातळीवर पुन्हा एकदा इंधन दरांमध्ये कपातीचा विचार सुरू आहे.
‘‘आम्ही शक्य तितक्या लवकर व अधिक प्रमाणात किमतींमध्ये कपात करणार आहोत.’’ असे पटेल यांनी सांगितले.
पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी तर, घरगुती वापराचा गॅस २५ रुपयांनी कमी करण्यात येईल, असे शनिवारी मुंबईमध्ये सांगितले होते.
राष्ट्रध्वजाच्या लिलाव प्रकरणी दोघे निलंबित
भरतपूर, १२ जानेवारी/पी.टी.आय.
राजस्थानतील भरतपूर येथे शेती व पणन मंडळाच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना रद्दी मालाबरोबर लिलावामध्ये तिरंगा राष्ट्रध्वज विकल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले.
या खात्यातील कार्यकारी अभियंता देवेंद्र पाल सिंग व भांडारपाल देवीदयाल बन्सल हे या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळल्याने त्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. मागील वर्षी जुलैमध्ये लिलाव करण्यात आलेल्या इतर ३३ बाबींसह तिरंगाही विकण्यात आला होता. आग्रा येथील एका भंगारमालाच्या व्यापाऱ्याने त्याची खरेदी केली होती. येथील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याबाबत बातम्या आल्यावर मंडळाचे महाव्यवस्थापक के. सी. मीना यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
वसुंधराराजेंविरुद्ध एफआयआर दाखल
जयपूर,१२ जानेवारी/पीटीआय
न्यायालयाच्या आदेशांचे पालन करताना पोलिसांनी आज राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट व विश्वासघात असे आरोप ठेवण्यात आले आहेत. माजी शहर विकास व गृहनिर्माणमंत्री प्रताप सिंग सिंघवी, माजी महापौर अशोक परनामी, गृहनिर्माण मंडळाचे माजी अध्यक्ष अजयपाल सिंग व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ललित किशोर चतुर्वेदी, जयपूर विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांच्यावरही एफआयआर दाखल केला आहे. कलम ४२०, ४०९, १२० बी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. |