 नर्म विनोदी शैलीत गेली दहा वर्षे सर्वच क्षेत्रांची मुशाफिरी करणाऱ्या तंबी दुराई यांच्या
‘दोन फुल एक हाफ’ या सदराचे संकलन, त्याच नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहे. पद्मगंधा प्रकाशनाने सिद्ध केलेल्या या पुस्तकाची कुमार केतकर यांनी लिहिलेली प्रस्तावना
हिटलरला विनोदाचे वावडे होते. त्याची नाझी दहशत इतकी होती की, त्याच्या कारकीर्दीत, जर्मनीमध्ये विनोदी लेखक वा व्यंगचित्रकार निर्माणच झाले नाहीत. त्याच काळात इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेत मात्र विनोदाचे, व्यंगचित्रांचे, अर्कचित्रांचे अमाप पीक आले. फॅसिस्टांना विनोद आवडत नाही. म्हणजे परवडत नाही. त्यांना विनोदाची भीती वाटते. आपली कुणीतरी टवाळी उडवतो आहे, कुणीतरी आपल्याला हसतो आहे, उपहासाने आपले म्हणणे उडवून लावतो आहे, छद्मीपणे कुणीतरी आपली नक्कल करतो आहे, अशी भीती हिटलरला वाटत असे. परंतु असे वाटण्यासाठी आपल्याला अगदी हिटलरचेच उदाहरण घ्यायची गरज नाही. बऱ्याच जणांना विनोदाची धास्ती वाटते. परंतु त्यांच्याकडे हिटलरी दहशत बसविणाऱ्या टोळ्या नसतात. तसे पाहिले तर विनोद हा ‘अहिंसक’ प्रवृत्तीचा असतो. म्हणजे असायला हवा.
परंतु आपल्याला माहीत आहे की, विनोद हिंस्र असू शकतो, क्रूर असू शकतो, अपमान करणारा आणि असहिष्णू असू शकतो. अनेकदा तर थेट शिवी हासडण्यापेक्षा वा कानफटात मारण्यापेक्षा विनोद आघात करू शकतो. दुसरा कोणताच प्राणी विनोदाचे शस्त्र वापरून सावज घायाळ करीत नाही. वाघ वा बिबटय़ा हरणाची वा शेळीची मस्करी करीत नाही. घाबरलेला ससा व हरीण त्याची शिकार करायला आलेल्या हिंस्र प्राण्याची फिरकी घेत नाही. परंतु डिस्नेच्या कार्टून फिल्म्समध्ये मात्र सर्व प्राणी यथेच्छ फिरक्या घेतात, टिंगल उडवतात, रॅिगगही करतात. वॉल्ट डिस्नेचा उंदीर तर सारखा त्या मांजराला हैराण करीत असतो. मांजर आपटले, त्याचे नाक वा शेपूट कापले गेले, त्याच्या डोक्यात सामान पडून ते जखमी झाले, त्याचे थोबाड फुटले की कुठेतरी लपून तो उंदीर त्या मांजराची केविलवाणी अवस्था पाहून खो-खो हसतो. (प्रत्यक्षात आपल्या घरात घुसलेला उंदीर आपलीच अवस्था अशी केविलवाणी करीत असतो!) असो.
परंतु विनोद असा क्रूरच असला पाहिजे वा असतो असे नाही. विनोद निर्विषही असू शकतो. तो वाचकाला (आणि ज्याच्यावर विनोद केला असेल त्याला) अंतर्मुख करू शकतो. स्वत:चे वैगुण्य हळुवारपणे दाखवू शकतो. विनोद हा मानसिक उपचाराचे साधन होऊ शकतो. त्याचप्रमाणे सामाजिक सामंजस्याचे माध्यमही होऊ शकतो. विनोद
तर रडवूही शकतो. हेलावून टाकू शकतो. हवालदिल करू शकतो. स्वत:लाच नव्हे तर समाजालाही ताळ्यावर आणू शकतो. विनोद विकृतीशी संघर्ष करू शकतो आणि शहाजोगपणा, गर्व, औद्धत्य, ढोंग, अरेरावी, उच्चभ्रूपणा इत्यादी स्वभावविशेषांचे वस्त्रहरण करू शकतो.
वस्त्रहरण झाल्यामुळे संकोच वाटतो वा लाज वाटते; परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे वस्त्र परिधान केलेल्या सुजाण वाचकांना/ प्रेक्षकांना विनोदामुळे एक प्रकारचे कवच मिळते. विनोदाने सावध केलेल्यांचे वस्त्रहरण होत नाही.
म्हणजेच विनोद हा सामान्य माणसांचा भगवान श्रीकृष्ण आहे. त्याचा आधार आहे.
तंबी दुराई यांचा विनोद हा वाचकाला असा सजग करतो, आनंद देता देताच आत्मपरीक्षण करायला लावतो आणि त्यातील निर्विषपणामुळे आल्हाददायक गुदगुल्याही करतो. परंतु फॅसिस्ट प्रवृत्तीच्या माणसाला तंबी दुराईंची भीतीही वाटू शकेल. (तशी वाटली नाही तर ते ‘दोन फुल’ नव्हे तर रिकामे ग्लास ठरतील!) निर्विष असणे म्हणजे निर्हेतुक असणे नव्हे. लक्ष्य असावेच लागते. टारगेट असल्याशिवाय सोडलेला विनोदाचा बाण म्हणजे भरकटत जाणारा दिशाहीन बाण-तो कुणालाही रक्तबंबाळ करू शकतो. तंबी दुराईंचे बाण काळजीपूर्वक सोडलेले असतात. बाणाइतकेच महत्त्व प्रत्यंचेला असते. बाण सुटायच्या अगोदर प्रत्यंचेवर कुठे, किती, कसा ताण द्यायचा याचे भान असावे लागते. तंबी दुराई यांना ते भान आहे. म्हणूनच त्यांचे बाण तशा प्रवृत्तींवर आघात करतात. व्यक्तींवर नव्हे. कारण त्या प्रवृत्ती कुणामध्येही असतात, निर्माण होऊ शकतात वा प्रकटतात.
तंबी दुराईंचा ‘अडीच’कीतला स्तंभ मी बरीच वर्षे वाचत आलो आहे. त्यांनी ‘दोन फुल आणि एक हाफ’ असे नाव त्या स्तंभाला का दिले हे मला माहीत नाही. त्या स्तंभाची मांडणीही तशीच आहे. कित्येक वेळा ‘दोन फुल’पेक्षा त्या ‘हाफ’ची कीक अधिक जबरदस्तही ठरली आहे. कधी कधी तर त्या ‘दोन फुल’ने मिळालेली कीक त्या ‘हाफ’ने उतरविलेलीसुद्धा आहे! तर या स्तंभाचे नाव हेच का, हा मुद्दा बाजूला ठेवू या. कारण आता ते पूर्णपणे रुळले आहे. माझ्या माहितीत असे कितीतरी वाचक आहेत की ते ‘लोकरंग’ हातात पडल्याबरोबर प्रथम तंबी दुराईंचे पठण करतात. ज्यांना हा तंबी कोण आहे हे माहीत आहे आणि ज्यांच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ते लगेच त्यांना फोनही करतात. (त्यामुळे रविवारी सकाळी त्यांचा फोन एन्गेज्ड असतो.) गेल्या काही वर्षांत तर तंबी दुराईंनी ‘लोकसत्ता’च्या इतर पानांवरही आपले ग्लास सुंदर अशा कॉकटेल- मॉकटेल्समध्ये भरून आणले आहेत.
तंबी दुराईंचा हा संग्रह अगोदरच प्रसिद्ध व्हायला हवा होता. म्हणजे एव्हाना दुसरा खंड प्रसिद्ध झाला असता! तंबी दुराईंना असलेले फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. महाराष्ट्रभर महाराष्ट्राची (म्हणजे निदान ‘लोकसत्ता’च्या वाचकवर्गाची!) सांस्कृतिक प्रकृती ठणठणीत असल्याचा तो पुरावाच मानायला हवा. कारण त्यांच्या स्तंभातली पात्रे काल्पनिक नाहीत. त्यांची सर्व पात्रे दररोज टी.व्ही.वर आणि वृत्तपत्रांमध्ये सतत वावरत असतात, भाषणे ठोकत असतात, वाद घालत असतात, शिवीगाळ करीत असतात, परस्परांची खिल्ली उडवीत असतात, कुरघोडी करीत असतात, निर्थक बोलत असतात वा लिहीत असतात. राजकारणी, साहित्यिक, सामाजिक पुढारी आणि समाजकंटक, पत्रकार आणि टी. व्ही.वरले अॅन्कर-पर्सन्स, नट-नटय़ा, भांडवलदार-उद्योगपती, बुवा आणि बापू-अशी आपल्या रोजच्या परिचयातील ही सर्व पात्रे आहेत.
त्यांच्यात विलासराव देशमुख आहेत आणि बाळासाहेब ठाकरे आहेत, अनिल-मुकेश अंबानी आहेत आणि अमरसिंग आहेत, राज-उद्धव आणि गडकरी-मुंडे, अरुण साधू आणि हातकणंगलेकर, शरद पवार आणि नरेंद्र मोदी, जब्बार पटेल आणि अमोल पालेकर, नारायण राणे आणि नरेंद्र दाभोळकर, मनोहर जोशी आणि आर. आर. आबा.. मल्टिस्टार कास्ट!
एक प्रकारची मूर्तिभंजक वृत्ती, बिनधास्त शैली, व्यंगभेदी दृष्टी, मर्मभेदी बुद्धी तंबी दुराईच्या प्याल्यांमध्ये ओतप्रोत भरली आहेत म्हणूनच वाचणाऱ्याला ‘कीक’ बसली तरी ‘झिंग’ येत नाही. वाचकानेच ताळतंत्र सोडला की संपलेच सारे! पत्रकाराला- स्तंभलेखकाला- ‘तीर्थ विठ्ठल-क्षेत्र विठ्ठल’प्रमाणेच ‘वाचक विठ्ठल’ असतो. त्या विठ्ठलाप्रतीच लेखन करायचे असते. हे फक्त मराठी वाचकापुरते मर्यादित नाही.
याच ‘जनर’मधले अमेरिकन अर्क- स्तंभलेखक आर्ट बुकवॉल्ड, रसेल बेकर, डेव बेरी यांचाही वाचक हाच विठ्ठल असतो. म्हणूनच जगभरातील त्यांच्या वाचकांना ठायी ठायी तोच विठ्ठल भेटतो. जर अमेरिकन वाचकांना आर. आर. आबा आणि नितीन गडकरी परिचयाचे असते तर त्यांना तंबी दुराईंमध्ये आर्ट बुकवॉल्डच दिसला असता!
हा अर्क- व्यंग्य- स्तंभीय लेखनप्रकार जगभर आहे. महाराष्ट्रातही विविध शैलींमधून अनेक लेखकांनी तो हाताळला आहे. दत्तू बांदेकरांपासून ठणठणपाळ (जयवंत दळवी) यांच्यापर्यंत. प्रत्येकाचा बाज वेगळा, पण विठ्ठल तोच. तंबी दुराई गेली नऊ वर्षे दर आठवडय़ाला आपले ग्लास भरत आले आणि तरीही त्या पेयाचा आपल्याला वीट आलेला नाही. या चवीचे नाव काय? आंबट, तुरट, तिखट, खारट, चरचरीत, कुरकुरीत, झिणझिण्या आणणारी.. खरे म्हणजे हे सर्व काही आणि ‘स्टिल, इटस् डिफरन्ट!’
ही प्रस्तावना लिहिण्यासाठी म्हणून तंबीच्या ‘टॉप टेन’ स्तंभांची यादी करण्याचा विचार मी केला होता. त्यानुसार हातात मार्कर घेऊन मी बसलो आणि लगेचच तो नाद सोडून दिला. कारण जवळ जवळ प्रत्येक स्तंभाला टिक मार्क करायचा प्रसंग येत होता.
तंबी दुराईंच्या स्तंभाने विनोदशैलीचा एकच फॉर्म वापरलेला नाही. कधी निवेदन, कधी संवाद, कधी कविता, कधी अभंग, कधी कथा, कधी पत्रकारी बाज तर कधी समीक्षेचा ढांचा. इतके विविध फॉम्र्स हाताळणे हे केवळ लेखनकसब असून येत नाही, तर त्यासाठी त्या पद्धतीचे वाचन आणि व्यासंगही लागतो. परंतु तसे वाचन करतानाही एक तिरकी नजर लागतेच. अगदी संत साहित्याचे वाचन करतानाही ती तिरकी नजर तशीच सरळ (म्हणजे तिरकी, पण बुद्धिबळातला उंट तिरका चालतानाच सरळ चालतो तशी) ठेवावी लागते. ज्या व्यक्तींवर लिहायचे त्यांचे फक्त विचार आणि राजकारण माहीत असून चालत नाही, तर त्या व्यक्तीच्या लकबी, सवयी, शरीरयष्टी यांचेही नेमके ज्ञान असावे लागते. अनेकदा तंबी दुराईंना ती दृष्टी अंतज्र्ञानाने प्राप्त झाली असावी, असे वाटते. कारण मुकेश आणि अनिल अंबानी त्यांच्या आईबरोबर माजघरात कसे बोलत असतील हे तंबी दुराईंना कसे कळले असावे? राज आणि उद्धव बाळासाहेबांच्या पुढय़ात अनेक गंभीर समस्यांविषयी कशी चर्चा करीत असतील हे त्यांना कसे उमगते?
तंबी दुराईंनी मंगेश पाडगावकरांपासून हेमंत दिवटेंपर्यंत आणि रवींद्र पिंग्यांपासून प्रवीण दवणेंपर्यंत सगळ्यांची ‘खेचली’ आहे. आणि (बहुधा) तरीही त्यांचे व्यक्तिगत संबंध व्यवस्थित टिकून आहेत. याचे मुख्य कारण या लेखनात विखार नाही. कुणाची तरी सालं काढून स्वत:चे अस्तित्व आणि महत्त्व दाखविण्याचा प्रयत्नही नाही. कुणाच्या तरी खासगी भळभळीवरती मीठ टाकण्याची दुष्टता नाही आणि हवेत स्वच्छंदपणे उडणाऱ्या पक्ष्यांचा आनंद हिरावून घेण्याची शिकार नाही. तंबी दुराई काही पक्ष्यांवर बार जरूर उडवतात, पण त्यांना इशारा देण्यासाठी, त्यांची शिकार करून त्यांना भाजून खाण्यासाठी नव्हे.
तंबी दुराईंचा अहं त्यांच्या लेखनात कुठेही डोकावत नाही. हे सोपे नव्हे. आपल्या साहित्यिक व पत्रकारांना आत्मप्रौढीचा व्हायरस इतका ‘आत्मांध’ करून टाकतो की त्यांना जगात चालणारी प्रत्येक गोष्ट आपल्याच संदर्भात चालते असे वाटत असते. साहित्यिकांपेक्षा राजकारणी खरोखरच बरे म्हणायचे. बहुधा तंबी दुराईंनाही तसेच वाटत असावे. म्हणूनच तंबीच्या राजकीय पात्रांविषयी आपल्याला हसता हसताच सहानुभूती वाटते आणि साहित्यिक वा पत्रकारांच्या शहाजोगपणाविषयी चीड वाटते. स्वत: पत्रकार (आणि साहित्यिकही) असूनसुद्धा तंबी दुराई या व्हायरसचे बळी ठरलेले नाहीत.
मला खात्री आहे, हा स्तंभ (आणि हे पुस्तक) वाचणाऱ्यांना तशा व्हायरसपासून ‘मुक्ती’ मिळेल. आपल्या स्वभावात, वागण्यात, व्यवसायातही तसा व्हायरस घुसणार नाही याची ही ‘लस’ आहे. ती सर्वानी टोचून घ्यायला हवी!
देव पाण्यात ठेवणे
भाऊ शिगवण , बोरिवली (प.) यांनी विचारलेल्या देव पाण्यात ठेवणे म्हणजे काय? ते का केव्हा ठेवतात? या दोन प्रश्नांची उत्तरे-
जेव्हा खूपच मोठं संकट आलं असेल, बाकीचे सगळे उपाय करूनसुद्धा उपयोग होत नाही, अशा वेळी देव पाण्यात ठेवतात. उदा. घरातील आजारी व्यक्ती अनेक उपाय करूनसुद्धा बरी होत नसेल तर संकट निवारणारा देव्हाऱ्यातील गणपती एका तामणात ठेवून तो बुडेल इतकं पाणी त्या तामणात घेणे. आजारी व्यक्ती अंथरूणावरच पडून असेल अशा वेळी शक्यतो हा प्रयोग केला जातो. आजारी व्यक्ती बरी होईपर्यंत किंवा त्या व्यक्तीच्या आजाराचा धोका टळेपर्यंत हा गणपती पाण्यात बुडवून ठेवला जातो. नंतर पाण्यातून काढून (तामणातून) परत देव्हाऱ्यात हा गणपती ठेवला जातो. अनेकांना याचा चांगला अनुभव आला आहे. मात्र मूळ कुठल्याही ग्रंथात अगदी ‘धर्मसिंधूत’सुद्धा याला शास्त्रीय आधार दिलेला नाही.
सुनिती जोशी, डोंबिवली
शेवटचा उपाय म्हणून देव पाण्यात ठेवतात.
‘महा संकटकाळी’ किंवा ‘अति महत्त्वाच्या प्रसंगी’ आपल्या मदतीला धावून येण्याच्या अपेक्षेने प्रत्यक्ष परमेश्वरालाच संकटात टाकून त्याचा ‘धावा’ (आराधना) करण्याचा शेवटचा उपाय (लास्ट रिसोर्ट) म्हणून देव पाण्यात ठेवण्याची पद्धत आहे. सर्वसामान्यपणे एखादे न होणारे काम व्हावे म्हणून सायंकाळी (तिन्हीसांजेला) देव प्रतिमा पूर्णपणे बुडेल अशा पात्रात (वाटी, ग्लास) दूधमिश्रित पाण्यात ‘मूर्ती’ ठेवतात. ही एक केवळ पूर्वापार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली श्रद्धा आहे. याला क्वचित ‘गणेशपुराण’, ‘हनुमंतपुराण’ यांसारख्या प्रश्नसिद्धांत प्रकरणात कदाचित आधार सापडू शकेलही. मात्र ‘ठोस’ शास्त्रीय आधार अद्याप आढळलेला नाही. ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा हा भाग आहे.
दोन मूर्ती एकाच देवाच्या असल्यास दोन समान ध्रुवांमध्ये (शक्तींमध्ये) ‘अपसरण’ होते या न्यायाने दोन मूर्ती न ठेवण्याची पद्धत आहे.
पूर्वीच्या काळी ‘ध्वनीवर्धक’ (लाऊडस्पीकर) नव्हते. त्यामुळे सर्व वस्तीला, नगराला ज्ञात व्हावे म्हणून शंखनाद/ शंखध्वनी करीत असत. हीच पद्धत युद्धसमयी लढाईची सुरुवात होत असतानाही तसे जाहीर करण्यासाठी वापरली जाई.
जयंत पठाडे, डोंबिवली
शंख का वाजवतात?
भाऊ शिगवण , बोरिवली (प.) यांनी विचारलेल्या पूजा-कथा, आरती आणि अन्य धार्मिक कार्य करतेवेळी लोक शंख का वाजवतात? या प्रश्नाचे उत्तर
पूजा-कथा, आरती आणि धार्मिक कार्य करतेवेळी लोक शंख वाजवितात कारण खरा शंख हा वाजविल्यामुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध होते. तसेच शंखध्वनीमधून ओंकाराचे शब्द हे उमटतात. ओंकार हा तर विश्वव्यापक आहे. हा शंख सागरात उत्पन्न होतो, तो सागराला हद्द सोडून देत नाही. ती सोडू नये, आपल्या धरणीचे रक्षण करावे म्हणून शंख वाजविला जातो.
यशवंत वाळवेकर, पुणे
अशोक परब यांनी विचारलेल्या आत्मा व परमात्मा यातील फरक काय? या प्रश्नाचे उत्तर
प्रत्येक जीन हा स्वतंत्र देहधारी आत्मा आहे. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान या पंचप्राणांत तरंगणारा आत्मा स्वतंत्र असल्यामुळे कोणत्याही कारणामुळे शरीर नष्ट झाले तरी आत्म्याला क्षती पोहोचत नाही. तो दुसरा देह धारण करण्यास स्वतंत्र होतो व हे चक्र अव्याहत चालू राहते. आत्मा अजन्मा, सनातन व पुरातन आहे. विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे शरीर जन्मते, वाढते, झिजते व अखेर नष्ट होते, पण आत्मा अमर आहे. त्याला कोणी छेदू, जाळू, भिजवू वा वाळवू शकत नाही.
परमात्मा तथा ईश्वर हा सत्य, शिव व सुंदर आहे. परमेश्वराच्या दहा अवतारांत श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम व श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहे. यज्ञ, ज्ञान, वैराग्य आणि सौंदर्य, वैभव यांनी परमात्मा परिपूर्ण आहे. आनंद, सौख्य देणाऱ्या परमात्म्याची बरोबरी कुणीही करू शकत नाही.
२ अनिल गुडेकर, यांनी विचारलेल्या ऋषी-मुनी म्हणजे कोण? या प्रश्नाचे उत्तर
इंद्रियांच्या आकलनापलीकडे असलेले ज्ञान ज्यांना प्राप्त झाले ते व ज्या महापुरुषांना वेद दिसले वा कळले ते ऋषी होत. प्रतिभाशाली, वेदाचे ज्ञान असणारे, कवी, ज्ञानी व यज्ञयाग करणारे ते ऋषी.
ब्रह्मर्षी म्हणजे ब्रह्म जाणणारे ब्राह्मण होय. भृगु, कश्यप, वसिष्ठ हे ब्रह्मर्षी होत. देवर्षी म्हणजे देव ज्ञातीचे ऋषी. धर्म, नारद, वालखिल्य, पुलत्स्य हे देवर्षी होत.
महर्षी म्हणजे आचरण, ज्ञान, वैराग्य, शील यात श्रेष्ठ असणारा ऋषी राजर्षी म्हणजे क्षत्रिय असलेले व प्रजारंजनामुळे ऋषीत्वाला पोहोचलेले ऋषी इक्ष्वाकू, नाभाग विश्वामित्र हे राजर्षी होत.
कांडर्षी म्हणजे धर्म, न्याय, व्याकरण, शस्त्रास्त्र विद्या यांना प्रवृत्त करणारे कांडर्षी होय. व्यास, जैमिनी, शांडिल्य इ.
श्रुतर्षी म्हणजे अन्य ऋषीकडून विद्या शिकलेले ऋषी. तपस्वी म्हणजे तपस्या वा आराधना करणारा. सर्व ऋषी प्रथम तपस्वीच असतात.
गोत्रर्षी म्हणजे मानवंशाच्या कुलशाखा ज्या ऋषीपासून निर्माण झाल्या ते ऋषी. ही गोत्रसंख्या ८३५ आहे. उदा. वासिष्ठ, कौंडिण्य इ.
२ बाबाराव मुसळे,यांनी विचारलेल्या महाकाली व दुर्गा एकच का? या प्रश्नाचे उत्तर
दुर्गम दैत्याला मारणारी व विंध्याचलातील दुर्गम स्थानी तप करणारी ती दुर्गा. महिषासुरमर्दिनी दुर्गाच आहे. दुर्गा ही पार्वतीचा अवतार आहे. दुर्गमासुराने शाकंबरी देवीचा नि:पात करण्यासाठी स्वारी केली तेव्हा देवीने कामाक्षी, तुळजा, बगला, त्रिपुरा व कालिका यांना पाचारण केले. दहा दिवसांत चौसष्ट योगिनीच्या साह्य़ाने देवीने त्याला मारले. आपले नाव दुर्गा राहील असे शाकंबरीनेच सांगितले. शुंभनिशुंभाच्या वधासाठी पार्वतीने आपल्या कुशीतून जी देवता निर्माण केली ती महाकाली होय. तिने चंडमुंडोना मारले म्हणून तिचे नाव चामुंडा झाले. काली ही माया व पुरुष यांचे स्वरूप म्हणून तिच्या पायाखाली शिव दाखवला आहे. युद्धात तिने देहभान विसरल्याने शिवाच्या छातीवर पाय दिला. हे तिला कळले तेव्हा तिने लज्जा व आश्चर्य यामुळे जिव्हा बाहेर काढली तेच महाकालीचे रूप भक्तांना आवडले. कालीचा उत्सव कोलकात्यांत दुर्गेचा उत्सव म्हणून साजरा होतो. नऊ अवतार हे पार्वतीचे आहेत.
नंदिनी बोपर्डीकर, पुणे
मुक्तछंद हा शब्द ‘फ्री व्हर्स’ या इंग्रजी शब्दाचा मराठी अनुवाद असून हा शब्द रूढ होण्यापूर्वी तो मुक्तकाव्य, स्वैरछंद, निर्यमक छंद, मुक्तपद्य अशा अनेक नावांनी ओळखला जात असे. नव्याने रुजू पाहणाऱ्या या छंदासाठी बेबंदकाव्य, स्वैरपद्य, स्वच्छंद अशी पर्यायी संबोधने सुचवली गेली होती, पण अनिलांनी जाणीवपूर्वक मुक्तछंद हे नाव रूढ केले. कारण तो छंद स्वैर वा बेबंद नव्हता. मुक्तछंद हा मुक्त झाला तरी छंद आहे आणि छंद झाला तरी मुक्त आहे, हेच त्यांना सुचवायचे होते. मुक्तछंदात गद्याची अर्थसहजता आणि पद्याची लयबद्धता अपेक्षित असते.
मुक्तछंदाचा पाया चार्ल्स बॉदलेयरने फ्रान्समध्ये घातला. वॉल्ट व्हिटमनने त्याचा स्वीकार करून इंग्रजी भाषेत आणला, तर वॉल्ट व्हिटमनच्याच ‘ओ कॅप्टन’ या कवितेने प्रभावित झालेल्या अनिल यांनी मराठीत आणला.
तालबद्धता, स्मरणसुलभता, श्रृतीसुभगता या गुणांनी लोभावून प्राचीन कवींनी यमकास अव्वल स्थान दिले होते. परंतु पुढे यमकाचा काव्यात अतिरेक होऊन यमकाचा काव्यप्रवाहात अडथळा होऊ लागला. बॅ. सावरकर आणि अनिल या दोन्ही कवींनी युरोपात चाललेल्या मुक्तछंदाच्या चळवळीचा, तिच्या प्रभावाचा पगडा आपल्या मनावर पडल्याचे प्रांजळपणे मान्य केले असले तरी हा प्रभाव ‘अपूर्ण अपुले ईप्सित झाले पूर्ण जिथे भासे, मनुजाचे मन सहज पावते आकर्षण तेथे’ या प्रकारचा होता. त्यांना काव्याबाबत हवा असलेला बदल, जिथे प्रत्यक्षात अवतरला होता, अशा काव्याकडे ते आकर्षित झाले होते. मनात दाटणाऱ्या भावकल्लोळांना जुने रूढ छंद न्याय देऊ शकणार नाहीत. या गोष्टीची जाणीव त्यांना झाली होती. इथे निव्वळ अनुकरण किंवा नक्कल म्हणून छंदबदल अपेक्षित नव्हता. युरोपातील कवींनी वापरलेल्या छंदातील सुटसुटीतपणा, त्यांनी घेतलेले छंदस्वातंत्र्य आणि त्यांचे प्रकटीकरणावर झालेले इष्ट परिणाम जाणवल्यामुळे त्यांना हा छंदबदल आवश्यक वाटत होता. छंदबंधन पाळण्यापेक्षा काव्य प्रकटीकरणातील उत्स्फूर्तता आणि स्वाभाविकता टिकविणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. मराठीतच नव्हे तर इतर भारतीय भाषांतही नवछंदाच्या प्रवृत्तीने जोर धरला होता. बंगालीत मायकेल मधुसूदन दत्तांनी ‘तिलोत्तमा’ लिहून निर्यमकतेचा मार्ग अनुसरला. रवींद्रनाथांची ‘निष्फलकामना’ मुक्तछंदात आहे. सुमित्रानंदन पंत, सूर्यकांत त्रिपाठी यांनी हिंदीत, तर न्हानालाल यांनी गुजरातीत पाया घातला.
मुक्तछंद हा शब्द ‘फ्री व्हर्स’ या इंग्रजी शब्दाचा मराठी अनुवाद असून हा शब्द रूढ होण्यापूर्वी तो मुक्तकाव्य, स्वैरछंद, निर्यमक छंद, मुक्तपद्य अशा अनेक नावांनी ओळखला जात असे. नव्याने रुजू पाहणाऱ्या या छंदासाठी बेबंदकाव्य, स्वैरपद्य, स्वच्छंद अशी पर्यायी संबोधने सुचवली गेली होती, पण अनिलांनी जाणीवपूर्वक मुक्तछंद हे नाव रूढ केले. कारण तो छंद स्वैर वा बेबंद नव्हता. मुक्तछंद हा मुक्त झाला तरी छंद आहे आणि छंद झाला तरी मुक्त आहे, हेच त्यांना सुचवायचे होते. मुक्तछंदात गद्याची अर्थसहजता आणि पद्याची लयबद्धता अपेक्षित असते. मुक्तछंदाची व्याख्या गणमात्रेच्या ठोकळेबाज जुळणीतून निर्माण झालेल्या रूढ साच्यातील पारंपरिक, त्रिविध पद्धतीतील छंदापेक्षा भिन्न, यति, यमक, गेयता, कडव्यातील विवक्षित चरणसंख्या इत्यादी अनावश्यक छंदोबंधने झुगारून देऊन किंवा विकल्पाने, स्वेच्छेने पाळून निर्माण झालेल्या व छंदोलय प्रकटण्यास आवश्यक असलेली, ताल, लय, एवढीच बंधने पाळणारा अशी केली जाते. त्यामुळे मुक्तछंद हा छांदस, मात्रिक, गद्योच्चारी आणि मुक्तशैलीमय असा चातुर्विध असतो.
अनिल, पु. शि. रेगे, वा. ना. देशपांडे या मुक्तछंदाच्या प्रवर्तक कवींनी मुक्तछंदाचे विविध प्रकार रुळविले. पुढे त्या मुक्तछंदप्रकारातून पुन्हा मुक्तछंदाचे उपप्रकार निर्माण झाले. रचनाबंधविषयक विविध प्रयोगांना मुक्तछंदाने वाव मिळाला. त्यानंतर शरच्चंद्र मुक्तिबोध, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे, नारायण सुर्वे, ग्रेस अशा अनेक कवींनी मुक्तछंद हा काव्यप्रकार वापरला. आजची मराठी कविता तर प्रामुख्याने मुक्तछंदात प्रकटते आहे.
असं असलं तरी मराठी छंदशास्त्राचा विचार कमीच झाला आहे. छंद शास्त्रीय समीक्षा या पुस्तकात डॉ. शुभांगी पातुरकर यांनी मुक्तछंदाचा शास्त्रोक्त वेध घेतला आहे. छंद शास्त्रीय समीक्षा, मराठी कवितेतील मुक्तछंद, ओवीछंद, रूप आणि आविष्कार, कविता दशकाची, मुक्तछंद कविता, समज आणि गैरसमज अशा वेगवेगळ्या कोनांतून मुक्तछंद संकल्पनेचा वेध घेतला आहे. त्याचबरोबर मर्ढेकर, विंदा करंदीकर, अनिल, पु. शि. रेगे, बाळकृष्ण बन्नोरे, अरुण काळे अशा काही निवडक कवी आणि त्यांच्या कविता यावरील समीक्षा लेखांचा समावेश आहे. तर दुसऱ्या भागात आवडलेल्या साहित्यकृतीचे आस्वादक अंगाने केलेले समीक्षण आहे.
मुक्तछंद ही संकल्पना ज्या कवींनी रुजवली, त्यांनी या छंदोप्रकाराची शिस्त पाळली. त्याचप्रमाणे आशयावरही अन्याय होऊ दिला नाही. श्री. पु. भागवत ‘मर्ढेकरांची कविता’ या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात. ‘शिशिरागमा’पासून मर्ढेकरांच्या रचनेमध्ये शब्दांचे रूप, वाक्यांची मांडणी, विराम चिन्हांचा वापर, ओळींची रचना यांच्या बाबतीत आशयाशी संवादी असा वैशिष्टय़पूर्ण व काटेकोर साक्षेप बाळगण्याचा प्रयत्न आढळतो. म्हणूनच मर्ढेकरांना छंदबदल न करता आशय हवा तसा प्रभावीपणे अभिव्यक्त करणे सहज शक्य झाले. तर डॉ. पातुरकर म्हणतात, ‘एखादा पटाईत घोडेस्वार जसा अबलख व नाठाळ दोन्ही प्रकारच्या घोडय़ांवर स्वार होऊन सहजच घोडदौड करीत मजल गाठतो, तसे मर्ढेकरांचे काव्याबाबतचे तंत्रनैपुण्य आहे. या प्रावीण्यामुळेच छंदाबाबत अनेक प्रकारचे स्वातंत्र्य घेऊनही व्यामिश्र आशयाच्या कवितेची छंदोलय त्यांना सहज सांभाळता आली. ‘विंदांनी ‘सुनित’ या रचनाप्रकाराला मुक्तछंदात आणले. ‘तालचित्रे’ हा नवा भावसंकर आणला. वैदिक सूक्त या प्रकाराचे मराठी मुक्तछंदात धडाक्यात पदार्पण करविले. मुक्तछंदाच्या चळवळीचे प्रणेतेपद आलेल्या अनिलांची एक आठवण सांगताना त्या लिहितात, १९३५ मध्ये नागपूरच्या तेलंखेडी तलावात पेरिना चमन या प्रेमी युगुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाले अन् आज सर्रास प्रचलित असणारा छांदस मुक्तछंद मराठी कवितेला मिळाला. कवीच्या सहजस्फूर्त आशयाशी आणि अभिव्यक्तीच्या स्वरूपाशी छंद आपोआपच निगडित होत असतो, असं ते म्हणत. ‘प्रेमजीवन’ हा त्यांनीच नामकरण केलेला छांदस मुक्तछंद त्यांच्या त्या वेळच्या भावनिक आंदोलनाशी आपोआप निगडित झाला. आणि १५.२.१९३५ या दिवशी लिहायला घेतलेले ‘प्रेम आणि जीवन’ हे खंडकाव्य १६.२.१९३५ या दुसऱ्या दिवशी लिहून पूर्ण झाले. अशा अनिलांनी मराठी कवितेला काय दिले नाही? मुक्तछंद हा शब्द दिला. मुक्तछंदात्मक कविता दिली. मुक्तछंदाचे छांदस, मात्रिक, गद्योच्चारी हे सर्व प्रकार दिले. मुक्तछंदाचा हिरिरीने पुरस्कार करणारे जोरदार लेखन केले. अशा प्रकारे ‘मुक्तछंद’ या नावाशी स्वत:चे नाव अविच्छिन्न रीत्या जोडून टाकले.
पण मुक्तछंद या शब्दाविषयी, त्याच्या स्वरूपाविषयी, त्याच्या व्याप्तीविषयी अनेकांचे आकलन अपुरे असल्यामुळे अथवा पुरेसे स्पष्ट नसल्यामुळे, आजची कविता बहुतांशी मुक्तछंदात प्रकटत असली तरी मुक्तछंदाच्या संकल्पनेपासून, नियमांपासून, पारंपरिक वैशिष्टय़ांपासून लांब जात चालली आहे. याचा परामर्श घेताना त्या म्हणतात, ‘अभिरुची घडवणारी, अर्थच्छटांचे लावण्यमय नर्तन करणारी, प्रत्ययकारी, हृदयंगम, आशयघन, पुन:प्रत्ययाचा आनंद देणारी कविता आज खरोखरच हरवली आहे. त्या जागी किळसवाण्या प्रतिमांतून प्रकटणारी असंबद्ध कविता आली आहे. कवितेच्या प्रांतात खरोखरच गद्यप्राय, रूक्ष, गचाळ, अशा कवितांनी धुमाकूळ घातला आहे. अंदाधुंद, अस्ताव्यस्त शब्द व अर्थहीन बडबड यामुळे असह्य होत चाललेली आहे. कवितेला छंदत्व देणाऱ्या छंदोलयीचाही त्यांनी निरोप घेतला आहे. काव्याच्या मूलधाराचाच त्याग केल्यामुळे नवी कविता म्हणजे गद्यप्राय शब्दांची उतरंड होऊन बसली आहे. अशा तुटक वाक्यखंडांनाच कविता म्हणून पुढे करीत, हे स्वत: कविवर्य म्हणून मिरवणार असतील तर दोष त्या कवींचा आहे, मुक्तछंदाचा नाही, जसे सिग्नल तोडण्याचा दोष तोडणाऱ्याकडे जातो, सिग्नलकडे नाही. तसेच हे आहे.’
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.co
|