Leading International Marathi News Daily                                  रविवार, १८ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानला अखेर पुरावे पटले!
इस्लामाबाद, १७ जानेवारी/वृत्तसंस्था

मुंबई हल्लाप्रकरणी भारताने दिलेले पुरावे अखेर पाकिस्तानला पटले आहेत. भारताने निव्वळ माहिती दिली आहे, पुरावे नव्हेत, अशी

 

वक्तव्ये आधी पाकिस्तानतर्फे करण्यात येत होती. आज मात्र पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की, भारताने दिलेले पुरावे ठोस वाटत आहेत. त्यांची आता छाननी सुरू असून त्याआधारे फौजदारी खटल्यासाठी ठोस असे पुरावे आम्ही जमा करीत आहोत.
मुंबईवरील हल्ल्यांत पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याच्या आरोपानंतर पाकिस्तानने एक त्रिसदस्यीय दहशतवादविरोधी समिती स्थापन केली आहे. या समितीला आता दहा दिवसांत आपला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थात पाकिस्तानात अद्याप मुंबई हल्लाप्रकरणी एकही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. आमच्यावर भारताचे कोणतेही दडपण नाही आणि कोणत्याही देशाच्या दडपणाला आम्ही जुमानणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

‘पाकने नकारघंटा वाजवू नये ’
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या चौकशीचा तपशील येत्या काही दिवसांतच जाहीर केला जाईल, असे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे तो तपशील परिपूर्ण असावा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारघंटा पाकने वाजवू नये आणि त्याला अन्य वळण देण्याचा प्रयत्नही केला जाऊ नये, अशी अपेक्षा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे.
लष्कर-ए-तय्यबा आणि अन्य दहशतवादी संघटनांविरुद्ध पाकिस्तानने कठोर पावले उचलावी, असा स्पष्ट संदेशही पंतप्रधानांनी दिला आहे. पाकिस्तानने भारताला पहिला औपचारिक प्रतिसाद दिला त्यामध्ये म्हटले आहे की, दहशतवादी हल्ल्याबाबत आम्ही चौकशी सुरू केलेली असून जमात-उद-दावा या बंदी घातलेल्या संघटनांच्या पाच प्रशिक्षण छावण्या बंद करून लष्करच्या अनेकांना अटक केली आहे. हा हल्ला आमच्या राष्ट्रावरील आहे. मुंबई हे भारतातील मुक्त आणि आक्रमक शहर असल्याने त्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी या शहराची निवड केली. परंतु सुसंस्कृत जग पाकविरोधात आहे आणि कोणताही देश असा घृणास्पद प्रकार सहन करू शकत नाही, याचे भान ठेवावे, असेही त्यांनी म्हटले.