Leading International Marathi News Daily

सोमवार , २६ जानेवारी २००९

लाल किल्ला

गुंतता ‘हृदय’ हे ..
गेल्या १९ वर्षांत ‘कमजोर’ हृदयानिशी मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असा प्रवास करीत देशाच्या राजकारणातील सर्वोच्च शिखर केवळ सरच केले नाही तर त्यावर पाच वर्षे बस्तानही बसविले. त्यामुळे अडवाणींपासून अर्जुन सिंह आणि प्रणव मुखर्जींसह अनेकांचा हृदयभंग झाला.
गेल्या चार वर्षांपासून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देत आले आहेत. पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनी त्यांनाच शुभेच्छा देण्याचा प्रसंग देशवासीयांवर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करणेही मनमोहन सिंग यांच्यासाठी कसे

 

शक्य नव्हते, याचा उलगडा त्यांच्यावर झालेल्या अतिशय गुंतागुंतीच्या बायपास सर्जरीमुळे एव्हाना अवघ्या देशाला झाला आहे. हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा अवरुद्ध करणाऱ्या तब्बल पाच रक्तवाहिन्यांचे ग्राफ्टिंग करावे लागल्यामुळे पंतप्रधानांच्या हृदयावर किती जबरदस्त दडपण होते, हेही सर्वश्रुत झाले आहे.
मनमोहन सिंग यांच्या हृदयातील धमन्यांचा असा गुंता होण्यात चंगळवादी जीवनशैलीचा मुळीच ‘दोष’ नव्हता. तरीही त्यांच्यावर तातडीने करण्यात आलेल्या या बायपास सर्जरीमुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेल्या अनेक नेत्यांच्या हृदयात धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली असेल. कारण मोसम लोकसभा निवडणुकांचा आहे. या काळात प्रकृतीच्या कारणांमुळे होणारी पीछेहाट अनेक बुजुर्गाच्या राजकारणाची इतिश्री करणारी ठरेल. गेल्या दसऱ्यानंतर इस्पितळात पडलेले प्रियरंजन दासमुन्शी यांचे उदाहरण ताजेच आहे. राजकारणाच्या नादी लागून बायपासचा मुहूर्त टाळणारे दासमुन्शी यांनी आपली राजकीय कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आणली आहे. गंभीरपणे राजकारण करणाऱ्यांना ही जोखीम पत्करणे परवडणार नाही. मनमोहन सिंग यांनीही ती पत्करली नाही. २२ मे २००४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यापासून २२ जानेवारी २००९ पर्यंत मनमोहन सिंग अविरतपणे कार्यरत होते. एकदा प्रोस्ट्रेट ग्रंथीचे, तर एकदा कॅटरॅक्टचे ऑपरेशन असे दोन अपवाद वगळता ते साऊथ ब्लॉक आणि ७ रेसकोर्समध्ये दिवसाचे १२ ते १५ तास काम करीत. पण भोजन आणि व्यायामात खंड न पडू देणारी कमालीची संयमी आणि शिस्तबद्ध दिनचर्या राखूनही त्यांच्या हृदयाची गुंतागुंत टळली नाही. भारताची असूया वाटणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश, चीनसारख्या घातकी आणि निंदक शेजाऱ्यांप्रमाणे पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीला पाण्यात पाहणाऱ्यांची कधीच कमतरता नसते. त्यात डॉ. मनमोहन सिंग पडले सरळमार्गी व्यक्ती. त्यांच्या मार्गात विरोधी पक्षांनी, मित्र म्हणविणाऱ्या पक्षांच्या महत्त्वाकांक्षी आणि पाताळयंत्री नेत्यांनी एवढेच काय स्वपक्षीयांनीही वेळोवेळी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. कित्येकांनी वरकरणी सहृदय आणि नरम भासणाऱ्या मनमोहन सिंग यांच्यावर ‘फिदायीन’ हल्ले चढविण्याचा प्रयत्न केले. २२ जुलै २००८ रोजी विश्वासमतादरम्यान भर लोकसभेत कोटय़वधी किंमतीच्या हजाराच्या नोटा फडफडताना बघून भारताच्या हातातोंडाशी आलेला भारत-अमेरिका अणुसहकार्य करार निसटून जातो की काय, या चिंतेपोटी त्यांचे हृदय त्या क्षणाला किती धडधडले असेल, याची कल्पनाही करवत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात कमकुवत पंतप्रधान, अशी कोणत्याही सद्गृहस्थाचे हृदय विदीर्ण करून टाकणारी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी गेल्या साडेचार वषार्र्त वारंवार केली. मनमोहन सिंग यांचे ईसीजी व एंजिओग्राफीचे अहवाल स्वतपाशी ठेवून तर अडवाणींनी असे हृदयविदारक आरोप केले नसतील ना, अशी शंका आता मागे वळून पाहताना येते. अडवाणी तर विरोधी पक्षाचेच नेते होते, पण प्रकाश करात, करुणानिधी यांच्यासारख्या मित्र म्हणविणाऱ्यांनीही आर्थिक उदारीकरणाच्या प्रयत्नांना सर्वशक्तीनिशी विरोध करताना सोडलेले तीर मनमोहन सिंग यांच्या हृदयाला विदीर्ण करीत राहिले. थेट वेध घेणारी वक्तव्ये करण्यात तरबेज अर्जुन सिंहांच्या शाब्दिक तीरांना ते चुकवू शकले नाहीत आणि अखेर ओबीसी आरक्षणाचा कायदा झाला. गोड बोलून विश्वास संपादन करीत धोरणात्मक मुद्यांवर दिशाभूल करणाऱ्या अस्तनीतील असंख्य निखाऱ्यांनीही त्यांच्या हृदयावरील दडपण अनेकपटींनी वाढविले होते. शिवराज पाटील यांच्यासारखे १०, जनपथचा वरदहस्त लाभलेले ‘निष्काम’ कर्मयोगीही त्यांचे ब्लडप्रेशर सतत वाढवीत होते. ज्ञात आणि अज्ञात अशा असंख्य राजकीय दहशतवाद्यांनी त्यांची आतून बाहेरून कोंडी केली होती. अवरुद्ध झालेल्या पाच रक्तवाहिन्या हे त्यांच्यावर कळत-नकळत होणाऱ्या आघातांचे निदर्शकच ठरावे. मात्र, गेल्या साडेचार वर्षांपासून चोहोबाजूंनी होणारे हे सारे हल्ले सोसून, सर्वाना पुरून उरत पंतप्रधानपदाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. एम्समध्ये बायपास सर्जरी करण्यासाठी निघताना उरलेल्या दोन-तीन महिन्यांसाठी आपण पुन्हा त्याच निवासस्थानी परतू की नाही, या प्रश्नाने त्यांना ७ रेसकोर्समधून बाहेर पडताना हुरहूर लावली असेल. कारण युपीए सरकारचे सत्तेतील शेवटचे चार-पाच आठवडे उरले असले तरी त्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकसह राजपथच्या दुतर्फा असलेल्या विविध भवनांमध्ये आसनस्थ झालेल्या भल्याभल्यांची हृदये धडधडत होती. विशेषत पंतप्रधानपदासाठी स्व. राजीव गांधी यांच्या विरोधात २५ वर्षांपूर्वी बाह्या सरसावणारे प्रणवबाबू तर आपण ‘हंगामी’ बनणार या कल्पनेने नेताजी सुभाषचंद्र जयंतीच्या दिवशी मोहरून गेले होते. सरकारमधील ‘नंबर टू’ प्रणवदा ‘नंबर वन’ बनले तर चार-पाच आठवडय़ांत ‘वन टू का फोर’ तर होणार नाही, या शंकेने कदाचित सोनिया गांधींना ग्रासले असावे. प्रणवदांच्या उत्साहाचे भरते ओसरल्यानंतर पंतप्रधानांच्या जबाबदाऱ्यांची नीट विभागणी करताना मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत ते फार तर ‘फस्र्ट अमंग इक्वल’ ठरतील, अशी रचना सोनियांनी केली.
युपीएची पाच वर्षांची इनिंग्ज औपचारिकपणे संपुष्टात येण्यापूर्वीच मनमोहन सिंग यांची खेळी परिणामकारकपणे संपली, असा निष्कर्ष निघणे स्वाभाविक आहे. मनमोहन सिंग पूर्णपणे बरे होऊन पंतप्रधानांच्या कार्यालयात सक्रिय होईपर्यंत चौदाव्या लोकसभेचे विसर्जन होऊन आदर्श निवडणूक आचारसंहिताही लागू झालेली असेल. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळात त्यांचे साऊथ ब्लॉकमध्ये पुनरागमन होईल ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणूनच. पंधराव्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेस पक्षाचा नसला तरी सोनिया गांधींचा कल राहुल गांधींच्या नावावर निवडणूक लढविण्याऐवजी त्यांचेच नाव पुढे करण्यावर आहे. स्वच्छ, निगर्वी आणि भ्रष्टाचाराचा लवलेश नसलेली प्रतिमा ही मनमोहन सिंग यांची कागदावर का होईना, जमेची बाजू ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत या प्रतिमेचा काँग्रेसला कोणताही राजकीय लाभ झालेला नाही. पण विरोधकांपाशी विश्वासार्ह नेतृत्वाचा दुष्काळ असताना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मनमोहन सिंगांचा चेहरा समोर करून आपली स्थिती बळकट करण्याची काँग्रेसला संधी आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या मुद्यावरून चालणारी उरलीसुरली स्पर्धाही संपुष्टात येईल आणि सक्रिय राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या अर्जुन सिंह आणि प्रणव मुखर्जी यांची महत्त्वाकांक्षा अंतिमत मोडीत निघेल. निवडणुकांनंतर काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाल्यास राहुल गांधी यांचे नेतृत्व पुढे आणण्यातील अडथळे दूर झालेले असतील.
अर्थात, दुसऱ्यांदा झालेल्या बायपास सर्जरीमुळे देशाच्या राजकारणातील मनमोहन सिंग पर्वाचा शेवट समीप आला हा समज चुकीचा ठरू शकतो. १९९१ च्या उत्तरार्धात मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री म्हणून राजकीय आखाडय़ात उतरले ते वर्षभरआधी बायपास सर्जरी करून. मे २००४ मध्ये त्यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळत असताना काही महिने आधी ते एंजिओग्राफी करून तरतरीत झाले होते. गेल्या १९ वर्षांत ‘कमजोर’ हृदयानिशी त्यांनी अर्थमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असा प्रवास करीत देशाच्या राजकारणातील सर्वोच्च शिखर केवळ सरच केले नाही तर त्यावर पाच वर्षे बस्तानही बसविले. त्यामुळे अडवाणींपासून अर्जुन सिंह आणि प्रणव मुखर्जींसह अनेकांचा हृदयभंग झाला. नियम आणि कायद्यांना पळवाटांच्या साह्याने धाब्यावर बसवून सत्ताकारण करणारे आणि वैयक्तिक जीवनात कुठल्याही शिस्तीला न जुमानणारे पंतप्रधानपदाचे अनेक दावेदार िरगणात आहेत. त्यांच्यापैकी काहींच्या हाती काठी आली आहे, तर काही असंख्य व्याधींनी त्रस्त आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागून नवे सरकार सत्तेत येईपर्यंत आपली प्रकृती ठणठणीत राहिली पाहिजे, असे पंतप्रधानांच्या आसनात हृदय गुंतून असलेल्या सर्वच दावेदारांना वाटणे स्वाभाविक आहे. ऐन निवडणुकांच्या काळात प्रकृतीने दगा दिला तर पंतप्रधानपद कायमचे हातून निसटेल, अशी भीती त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. सहा वर्षांनी लहान असलेल्या मनमोहन सिंग यांच्यापेक्षा आपली प्रकृती कित्येक पटींनी ठणठणीत आहे, ही जाणीव ८२ वर्षीय अडवाणींना निश्चितपणे सुखावून गेली असेल. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधानपदासाठी सतत धडधडणारे त्यांचे हृदय अजूनही भक्कम आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील अन्य स्पर्धकांच्या ईसीजीची तुलना करता ‘मैं इतना बुरा भी नहीं, माँ’ असा निष्कर्ष काढत त्यांनी डोळ्यात आनंदाश्रू दाटू द्यायला हरकत नाही.
सुनील चावके