शेतक ऱ्याला रोबोटिक सूट
जगात काही देशांमध्ये शेतीसाठी मजूर मिळणे कठीण आहे, तर काही देशांमध्ये मुबलक प्रमाणात मजूर उपलब्ध आहेत. तेथे उलट हाताला पुरेसे काम नाही. विशेषत: विकसित देशांमध्ये अशा मजूरांचा तुटवडा हा तेथील शेतकऱ्यांचा डोकेदुखीचा प्रश्न बनलेला आहे. त्यातही जपानी माणूस तसा एकंदरीत कष्टाळू. शेतीबाबतही तेथील माणूस वय झाले तरी काम करीत राहणारा. तरुण वर्ग इतर उद्योगाकडे वळला तरी वयस्कर माणूस शेतीतच खपणारा. पण वयामानाने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याची जणीव असलेल्या व तंत्रज्ञानात पुढारलेल्या जपानमधील टोकियो कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी एक रोबोटिक सूट तयार केला आहे. हा सूट म्हणजे जपानच्या वयस्कार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे.
जपानमध्ये अगदी थोडके तरुण शेतीकडे वळत आहेत व बहुतांश वृद्ध माणसेच त्यात टिकून आहेत. जपानमध्ये शेतीत राबणाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के माणसे आहेत सरासरी ६० वर्षांहून अधिक वयाची. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करीत काम करावे लागते. त्यांवर गेली १० वर्षे टोकियो कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधक काम करीत होते. थकलेल्या मानवी शरीराला काही आधार मिळाला तर जडीपाची कामेही करता येतील का या कल्पनेवर हे संशोधन आधारलेले होते. आता मात्र या संकल्पनेला मूर्त रुप देण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात या गटाला यश आले आहे. त्यांनी वयस्कर शेतकऱ्यांसाठी एक रोबोटिक सूट तयार केला आहे. एखाद्या लोहपुरुषासारखा हा सूट आहे. त्याला विशिष्ट ठिकाणी मोटरी बसवलेल्या आहेत. जेव्हा अधिक ताकदीची गरज लागेल तेव्हा गुडघ्यासारख्या सांध्यांच्या ठिकाणी या मोटारींपासून अधिक उर्जा निर्माण होते. परिणामी काम करताना लागणारा जोर उपलब्ध तर होतोच, पण त्याचा ताणही मानवी शरीरावर पडत नाही.
सध्या तयार करण्यात आलेला रोबोटिक सूट थोडासा जड वाटणारा असला तरी आणखी दोन वर्षांत या सूटचे वजन पंचवीस किलोपर्यंत आणता येईल असा संशोधकांचा दावा आहे. एवढेच नव्हे तर आता हा रोबोटिक सूट जपानी बाजारात येणार असून प्रसंगी तरुण माणसेही या सूटचा वापर करुन शहरांमध्ये कमा करण्यापेक्षा शेतीत काम करण्यास तयार होऊ शकतील असाही संशोधकांचा अंदाज आहे. हा सूट घालून बटाटय़ाच्या पिशव्या वाहणे, झाडांच्या फांद्या ढाटणे आदी स्वरुपाचीही कामे करता येतात. त्यामुळे जपानच्या सरकारला अन्न-धान्य आयात करण्याबाबतची ग्रासणारी चिंताही कमी होऊ शकेल, असे मानले जाते.
फिरस्ता
शेवग्याचे नवे वाण
शेवगा ही भारतातील बहुतेक राज्यातील आवडती व लोकप्रिय भाजी आहे. शेवगा या भाजीचे जगभर गेले दशकात महत्त्व वाढले. त्याला दोन प्रमुख कारणे आहेत.
१) शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात. मोबाईल, घडय़ाळे, टीव्ही इत्यादी दर लिटरला २० हजार रुपयांनी ते जाते.
२) वाळलेल्या शेवगा बियाची पावडर ही पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १०००लि.पाणी र्निजतुक करण्यास ८०० ग्रॅम पावडर वापरावी असे सुचित केले आहे. त्यामुळे शेवगा बियांची पावडर जगभर निर्यात होते.
शेवगा स्वतंत्र शेती महाराष्ट्रात आम्ही १९८१ पासून सुरू केली. स्वतंत्र शेवगा शेती किंवा फळबागात मिश्र किंवा अंतर पीक म्हणून शेवगा शेती आता महाराष्ट्रात ९०० ते १२०० एकरावर आहे.
शेवगा वाण किंवा जाती कोणत्या लावावेत हा या लेखाचा प्रमुख हेतू आहे. महाराष्ट्र व भारतभर जे शेवगा प्रसिद्ध वाण आहेत, त्यातील नामवंत व जास्तीत जास्त शेंगा देणाऱ्या निवडक वाणाची माहिती या लेखात आहे.
आपण बांधावर, बंगल्यात परसदारी किंवा स्वतंत्र शेवगा शेती लावा. अगर फळबागेत अंतर पीक म्हणत लावा, या शेवगा वाणाची खासियत व वैशिष्टय़े लक्षात घ्या. त्या प्रमाणे वाणाची निवड करा.
शेवगा शेती ही रोप लागवडीपासून केवळ सहा महिन्यात उत्पादन देते. ते १० वर्षे शेंगा देते.
वाणातील पी. के. एम २ या वाणाची बंगल्यात, परसात, बांधावर १० झाडे लावून दरसाल ५००० ते ६०० रुपये मिळवणारी मंडळी आहेत.
२) वाण व त्यांची वैशिष्टय़े- १) जाफना - हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे. देशी शेवगा म्हणून ओळखतात. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते. या वाणाला वर्षांतून एक वेळ म्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात. मार्च, एप्रिल, मे मध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२ शेंगा बसतात. दर झाडी एक हंगामात १५० ते २०० शेंगा मिळतात. चवीला चांगली. बी मोठे होतात.
२) कोकण रुचिरा - हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केला आहे. झाडाची उंची ५ ते १६ मीटर. या एका झाडाला १५ ते १७ फांद्या उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाचे असतात. या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंगा या एका देठावर एकच लागते. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात. साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते. दर झाडी पी.के.एम. २ या वाणाचे तुलनेत ४० टक्के उत्पन्न मिळते.
३) पी. के. एम. १ - हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे. या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत. १) रोप लावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात. २) शेंगा ४० ते ४५ सें. मी. लांब असतात. ३) या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून दोन वेळा शेंगा येतात. ४) शेंगा वजनदार व चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही. ५) या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच होतात. ६) दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
४) पी. के. एम. २ - हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतर पीक शेवगा शेतीत आहे. १) शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच केली आहे. २) भारतात आज ज्ञात असलेल्या सर्व शेवगा वाणात हा वाण विक्रमी उत्पादन देतो. दोन हंगामात ओलीता खाली व छाटणी आणि खत व्यवस्थापन उत्तम ठेवल्यास ८०० ते ११०० शेंगा दर झाडी मिळतात. ३) या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. ४) सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते ८० सें. मि. लांब येतात. ५) लांब शेंगा वजनदार शेंगा यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वात जादा मिळतो. ६) एका झाडाला एकाच हंगामात २१९० शंगा मिळवण्याचा विक्रम या वाणाने केला. ७) या वाणात एका देठावर ४-५ शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्टय़ इतर कोणतेही जातीत नाही. ८) बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.
९) सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.
थोडक्यात, पी.के.एम.२ हा वाण लावणे, वाढवणे, जोपासणे योग्य आहे. महत्त्वाचे आहे.
या वरील वाणाखेरीज शेवगा पिकाचे महाराष्ट्रात खालील वाण आढळतात. मात्र ८० ते ८२ टक्के लागवड ही पी.के.एम. २ ची आहे.
१) दत्त शेवगा कोल्हापूर, २) शबनम शेवगा, ३) जी.के.व्ही.के. १ व जी.के.व्ही ३, ४) चेन मुरिंगा, ५) चावा काचेरी. मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम व चव आणि लांबी या दृष्टीने पी.के.एम. २ सर्वश्रेष्ठ आहे. शेवगा पिकावर सध्या राज्यात खालील पुस्तके उपलब्ध आहेत.
१) शेवगा - वि. ग. राऊळ, २) शेवगा लागवड - डॉ. ठोंबरे, ३) शेवगा - डॉ. राहूडकर.
रोपासाठी संपर्क- पुणे (०२०) २६९९५९०४, नगर ९४२६०४६७१६.
वि. ग. राऊळ
लष्करी अळीचा फटका
कपाशीचे पीक वाढविण्यासाठी आणि कीड व रोग नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांनी बीटी या घातक बुरशीचे जनूक पिकात टाकून १२० पिकांवर हल्ला करणाऱ्या हिरव्या बोंड अळीचे (हेलिकोव अर्मिजेरा) आवडते पीक तिच्यासाठी अखाद्य बनवून दोन विजय मिळविणाऱ्याचे तात्पुरते भासवत असले तरी हा आनंद क्षणिकच भासू लागला आहे. कारण किडींना बीटी कपाशीवर जिवंत राहणे अशक्य समजल्यावर, या किडींनी आपला मोर्चा सोयाबीनवर वळवला. प्रत्यक्षातच बोलायचे तर गोदावरी खोऱ्यातील सोयाबीनवर लष्करी अळीने असा काही हल्ला केला की शेतकऱ्यांचे ४० टक्के नुकसान पिकाचे तर झालेच, शिवाय महाराष्ट्राचे खरीप उत्पादनही ३५ टक्के घटले. बाधित सोयाबीनचे उत्पादन तर हेक्टरी १२ क्विंटलपर्यंतही येईल की नाही अशी शंका निर्माण झाली. इतकेच नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्य़ात तर औषधाच्या विषबाधेने एका शेतकऱ्याचा मृत्यूही घडून आला.
सांगावयाचा उद्देश एकच, की मानवाने कीड नियंत्रणासाठी कीडींचे जिरविण्यासाठी जे. बी. टी. सारखे प्रयोग चालू केले आहेत जे घातक दिसू लागले आहेत. याचे सोपे कारण असे की कीटक हेही जिवंत प्राणी असल्यामुळे ते सहजासहजी मरायला तयार होत नाहीत, कारण किटक ही मानवाच्या आधी कोटय़ांवधी वर्षे अस्तित्वात आलेले जीव असून ‘‘सव्र्हेयिवल इन्स्टिंक्ट’’ या तत्वानुसार प्रत्येक प्राण्याला जिवंत राहण्याचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि हा जन्मसिद्ध हक्क बजावणाऱ्या प्राण्याला निसर्गसुद्धा उत्तम प्रकारे साथच देण्याचा प्रयत्न करीत असतो, हेच तत्त्व मनुष्य विसरत चालला आहे.
माणूस मात्र पृथ्वी ही माझ्याच मालकीची असून मी मला वाटेल तसा तिच्यात बदल करू शकतो. एवढी मोठी जंगले/अरण्ये, झाडे तोडून तेथे कारखाने, औद्योगीकीकरण चालू करून वाघ, सिंह या सारख्या हिंस्त्र श्वापदांना ‘घरसे बेघर’ बनवू शकतो. परिणती काय झाली, वाघ-सिंह जवळच्या वाडी - वस्तीवर, जनावरांवर आणि मुला-बाळांवर क्रूर हल्ले करू लागले. हा त्यांच्यावर केलेला मानवी अन्याय नव्हे तर काय? पण ६० किलोच्या मानवाने आता हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे की या बलवान गर्विष्ठ ६० किलोच्या मानवाला काही मिलीग्रॅम वजनाचे कीटक प्रत्यक्षात जेरीस आणू शकतात. इतकेच नव्हे तर कीटक नाशकामुळे माणसास शारीरिक व्याधिही होऊ शकतात. पण बुद्धिमान माणसाच्या डोक्यात हरितक्रांतिची भूमिका चांगलीच फोफावली आणि त्या क्रांतित किती भ्रांती होते हे तो विसरत चालला.
हरित क्रांतिचे मृगजळ पृथ्वीवर अवतरले. निसर्ग निर्मित बियाणे सोडून कंपन्या, कंपन्यांची रासायनिक खते आणि विविध शास्त्रज्ञांनी संशोधित केलेली संकरित बियाणे वापरून हरित क्रांतिच्या मागे तो लागला. उसाचे, कपाशीचे, भाताचे, संकरित ज्वारी, बाजरीचे भरमसाठ उत्पादन त्याने काही काळ पदरांत पाडूनही घेतले व आपण अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण झालो की आपण ‘महासत्ता’ बनणार अशी दिवास्वप्नही पडू लागली. पण जसजसा काळ वाढू लागला तसतसा हे वाढलेले उत्पादन निकस वाटून फक्त आकडेवारीस उपयुक्त ठरू लागले, प्रकृति स्वास्थ्याच्या दृष्टीने मात्र ते अपयशी वाटू लागले. जुनी मालदांडी भाकरीची गोड चव आणि संकरित ज्वारीचे अधिक उत्पादन दिलेल्या ज्वारीच्या चवीत असलेला फरक पोटाला, ओठाला सर्वालाच जाणवू लागला. ज्वारीच्या एका भाकरीचा ढेकर तृप्ततेचा होता पण आता पातळ २-२ भाकरीने पोटही भरत नव्हते आणि ही चव पोट भरले तरी प्रकृतिस पूर्वीच्या ज्वारीइतकी फलदायी आकर्षक वाटत नव्हती.
असाच अंशत: प्रकार कपाशीच्या बाबतीत, तुरीच्या बाबतीत आणि हरभऱ्याच्या बाबतीत सर्वानाच जाणवू लागला. मग त्यातल्या त्यात हुशार शेतकरी घरी वापरण्यासाठी स्थानिक घरचे बियाणे, घरचे खत वापरून घरच्या घरी करू लागले आणि संकरित बियाणे रासायनिक खते मोठय़ा प्रमाणात वापरून शेती उत्पादन वाढविण्याचा ‘आभास’ करण्याच्या मागे लागले आणि उत्पादनाचे आकडे भरमसाठ फुगायला लागले. ही आकडेमोड, उत्पादनाचे आकडेमोड या दृष्टीने समाधानकारक दिसत असली तरी ती शरीराला आलेल्या तात्पुरत्या सुजेसारखी भासत होती. त्याने शुद्ध पहिलवानासारखा तेज:पुंज पिंडाचा आकार भासत नव्हता, याची जाणीव होऊ लागली. इतकेच नव्हे तर हरित क्रांतीचा परिणाम म्हणून वापरलेल्या कीटक नाशकामुळे किडींची प्रतिकार शक्ति चांगलीच वाढू लागली. लष्करी अळी, हिरव्या बोंड अळ्यासारखे प्राणी पहिल्या वर्षी दाद देत, पण नंतर १ वर्षांतच त्यांच्यात प्रतिकारशक्ती येऊन शेतकऱ्यांचे औषधपाणी, कीटकनाशक यांचा खर्च मात्र वाया जात असे. उलट शेतकऱ्यांच्या गबाळेपणाचा व अंधानुकरणाचा फायदा व्यापारी मात्र उचलू लागले हेहि या हरित क्रांतितील कटू सत्य नाकारू शकत नाही कारण-
व्यापारी भेसळयुक्त खते विकू लागले. नकली बियाणे विकून शेतकऱ्यांना बनवू लागले आणि फसून गलितगात्र होऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त बनत गेले. विदर्भ मराठवाडय़ात आत्महत्या वाढू लागल्या तरीही व्यापाऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम घडत नव्हता. कारण ते मात्र आपला काळा पैसा लॉकरमध्ये गुंतवणुकीच्या मागे पडत असत. शेतकऱ्यांना दुकानापुढे लांबच लांब रांगा लावण्यास भाग पाडत कारण खताची कृत्रिम टंचाई, सुधारित चांगल्या बियाण्यांची टंचाई करणारेही बहुतांशी व्यापारीच असत. जंगलात, अरण्यात जशी मृत जनावरांच्या मांसावर गिधाडे तुटून पडतात तशीच मानवी प्राण्यात ही ‘गिधाडे’ आपला कार्यभाग उरकण्यासाठी वाटेल तितका वाममार्गाचा अवलंब करून धनाढय़ झाले. यालाच म्हणावे ‘‘नरेची केला हीन किती नर!’’
किडीच्या विरोधात नव्हे, तर माणूसही जेव्हा माणसाच्या विरूद्ध महत्त्वाकांक्षा पूर्तिसाठी अघोरी स्वभावात वागला तेव्हाही क्रूरकम्र्या मानवाच्या विरूद्ध घटना घडलेल्या आहेत. उदाहरणच बघायचे तरं क्रूरकर्मा हिटलरने ज्यू वंशाचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून ज्यूतर नष्ट झाले नाहीतच पण इस्त्राईलसारखे चिवट, कडवे कर्तबगार राष्ट्राचे जगाला दर्शन झाले. दुसरे उदाहरण हिरोशिमा व नागासाकी या जपान शहरांवर अणुबाँब टाकून जपान्यांचा नायनाट / र्निवश करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हांही ढेकूण तशाही परिस्थितीत मानवाबरोबर जिवंत राहिल्याचे आढळून आले आणि त्यातूनच जिद्दी जपानी प्रगत राष्ट्राची निर्मिती झाली. थोडक्यात, सजीवाने ज्या ज्या वेळी दुसऱ्या सजीवास नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे व त्या ‘‘सव्र्हायवल इन्स्टिंक्टच्या’’ तत्त्वास डिवचू पाहिले त्यावेळेस त्या मानवी सजीव विरोधकांचाही हमखास पराभव होतो व लढणाऱ्या जीवाचाच विजय पदरात पडतो.
थोडक्यात सुचवावेसे वाटते, की रासायनिक किंवा औषधीने कीड नियंत्रण करण्यापेक्षा शेतातच शेतकऱ्याने डोके वापरून अंशत: सापळा पिके लावण्याची पद्धत अवलंबावी. आता प्रश्न पडतो सापळा पिके म्हणजे काय? तर त्याचा अर्थ सापळा पीक म्हणजे मुख्य पिकात असलेली अशी पिके ज्याच्याकडे शत्रूकीड मोठय़ा प्रमाणात आकर्षित होते. ज्यामुळे मित्रकिडीचेही संगोपन होते. संवर्धन होते. त्यामुळे मित्रकिडीचे नैसर्गिकरित्या नियंत्रण केले जाते. वानगी दाखल बोलायचे तर जवस, मका, झेंडू, अंबाडी, राळा ही उत्तम सिद्ध झालेली सापळा पिके असून याच्या लागवडीमुळे (मुख्य पिकात) ६० टक्के किडीचे विनासायास नियंत्रण होऊ शकते. उदाहरण- मुख्य पिकाभोवती झेंडू लावला तर निमॅटोड किडीचे सूक्ष्मकृमीचे उत्तम नियंत्रण होते, चवळी मधून अधून लावली तर ती लेडीबर्ड बिटल किडीचा फडशा पाडते. मक्याचे पीक १ हजारापेक्षा जास्त मावाची अंडी फस्त करते कारण मक्यासोबत क्रायसोपा मित्रकीड असते.
अभ्यासावरून वास्तविक ९८ टक्के किडीचे नैसर्गिकरित्याच नियंत्रण होते, पण अतीहुशार मानव २ टक्के कीड नियंत्रणासाठी अघोरी उपाय योजून आपल्याच हाताने आपले नुकसान करून आरोग्य बिघडून घेतो. पिकांची सकसता कमी करून ते नि:सत्त्व बनविण्याच्या चुकीच्या प्रयत्नास लागतो.
नवीन औषध निर्मिती, बी. टी. कॉटनसारखे शोध हे तात्पुरते समाधान देणारे शोध असून यातून बोध घेऊन ‘‘तुझे आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलासी’’ न्यायाने पूर्वपरंपरागत पद्धतीने चालत आलेली निसर्गशेती आणि निसर्गाचा सहवास धरून माणसाने वागण्याची हीच वेळ आहे हे इतिहासही पटवून देत आहे. एका सजीव मित्र किडीने दुसऱ्या किडीचे नियंत्रण करा, आवश्यकता असेल तर अनेक सापळापिके वापरा, पण रासायनिक औषधे वापरण्याचे टाळा. किडीचे नियंत्रण करण्यास निसर्ग समर्थ आहे; फक्त सजीवाने सजीवाची साथ दिली तर त्याचे उत्तमच फळ मिळणार असून ते सजीवांनाही फायदेशीर होणार. निसर्गालाही प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही.
संपर्क - ९९७००४६२०९.
उद्धव इनामदार
िलबाची निर्यात, विक्री, प्रक्रिया
व्यापारविषयक माहितीमध्ये िलबाचा समावेश िलबूवर्गीय फळांमध्ये होतो. त्यामुळे संत्री, मोसंबी व िलबू यांची एकत्रित माहिती प्रसिध्द होत असते. त्यामुळे फक्त ‘िलबू’ या फळाची सांख्यकीय माहिती मिळवणे अवघड होते.
देशामध्ये आंध्रप्रदेश, गुजराथ, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरांचल व बिहार या राज्यांमध्ये िलबांचे उत्पादन घेतले जाते. जागतिक स्तरावर अमेरिका, इटली, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, अर्जेटिना या देशांमध्ये िलबाचे पीक घेतले जाते. जागतिक बाजारपेठेत अर्जेटिनाचा वाटा ५० टक्के आहे.
भारतातून फक्त तेरा हजार टन िलबांची निर्यात गेल्या वर्षी झाली. ती मुख्यत: संयुक्त अरब देशांना झाली. जागतिकीकरणानंतर ‘जग हे एक खेडे’ म्हणायला सुरुवात झाली असली तरी आपल्याला जगाच्या बाजाराला कोणता कृषीमाल लागतो. याविषयी माहिती नसते. िलबाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति किलो २० ते २२ नग बसतील अशा िलबांना मागणी असते. त्याचप्रमाणे साल पातळ असावी, रस भरपूर असवा.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी िलबांचे उत्पादन घेतले जाते. मात्र लागवडीचे क्षेत्र विखुरलेले आहे. तशात इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे उत्पादनानंतरचे खर्च वाढतात. सर्वच कृषीमालाच्या बाबतीत हे दिसून येते.
देशातील शेतक ऱ्यांची म्हणजे ६० टक्के लोकसंख्येची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर त्यांच्या मालाला देशांतर्गत व निर्यातीची मागणी मिळाली पाहिजे. त्यासाठी दर्जेदार मालाचे उत्पादन वाढले पाहिजे. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. एकटा शेतकरी फारसे काही करु शकत नाही. म्हणून शेतक ऱ्यांनी ‘‘उत्पादकांच्या कंपन्या’’ उभारल्या पाहिजेत. एक पीक सलग क्षेत्रावर घेतले पाहिजे. कृषी विश्वविद्यालयातले तंत्रज्ञान बांधावर पोहोचले पाहिजे.
िलबे वर्षभर उपलब्ध असतात. मात्र उन्हाळ्यात जेव्हा मागणी असते तेव्हा बाजारात माल कमी असतो. सर्व जगातच असे असते, मात्र शेतीच्या क्षेत्रातले प्रगत देश साठवणूक करतात. ६ टक्के मेणाच्या द्रावणात बुडवलेली िलबे १५ दिवस टिकतात. शून्य उर्जेवर आधारित शीतकक्षात दीड महिना टिकतात. निर्यात वाढविण्यासाठी रेफ्रिजरेटेड कंटेनरचा अवलंब केला पाहिजे.
िलबापासून लेमन ज्युईस, लेमन ऑईल, लेमन पावडर, लेमन कॉन्सेंट्रेट, लेमन मार्मालेड अशी अनेक उत्पादने जागतिक बाजारपेठेत चालतात. लेमोनेड आणि िलबू सरबत ही सर्वात जास्त लोकप्रिय पेये. पारंपरिक पदार्थात िलबाचे लोणचे अनेक उद्योजक करत असतात.
स्थानिक बाजारपेठांचा विचार करता आता अनेक कंपन्या थेट विक्रीत उतरलेल्या आहेत. अशा संस्थांना संघटितपणे िलबाचा पुरवठा केल्यास शेतकऱ्यांच्या सहकारी/उत्पादक कंपन्यांना प्रतवारी करुन मॉल्सना पुरवठा करता येईल.
प्रतवारी करणे, मेण लावून टिकवणे, रस कॉन्सेट्रेट करणे ही अल्प खर्चाची, अल्प गुंतवणुकीची तंत्रे अल्पबचत गटांना, कृषीउद्योजिकांना उपयुक्त ठरतील, तर याचप्रमाणे िलबाच्या सालीतला सुगंध वेगळा करणे, पेक्टिन करणे, शीतपेये बनवणे असे उद्योग लघुउद्योगाच्या वरच्या मर्यादेत बसतील. संपर्क- मोबा. ९३२५००६२९१.
पद्माकर देशपांडे
‘शेतीवाडी’त सहभागासाठी
शेतक ऱ्यांना आवाहन
आपल्याकडे शेतकरी गतकाळाच्या मानाने झपाटय़ाने पावले पुढे टाकू लागला आहे. वेगवेगळे प्रयोग ऐकून किंवा स्वत: प्रयोग करून पाहात आहे. एखादा शेतकरी शहरांमधील तारांकित हॉटेल्समध्ये लागणारा ब्रोकोलीसारखा परदेशी भाजीपाला पिकवत आहे. कोणी मधुमका लावत कॉर्नकॉर्नरला माल पुरवतो, तर आताशा मोठय़ा कंपन्याही रिटेल बाजारात उतरून शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत आहेत. कोणी नव-नवीन तंत्रज्ञानात स्थानिक पातळीवर बदल करीत वेगळेच यंत्र
निर्माण करतो.
खरे तर विजेची टंचाई लक्षात घेता कोणी ट्रॅ्रक्टरलाच मोटर पंप जोडून विहिरीतील पाणी उपसण्याचा प्रयोग करतो. यात भलेही विद्वत्तापूर्ण किंवा सखोल माहिती नसेल. पण असे चुकत-माकत केलेले प्रयोगच आपली शेती पुढे नेण्यास कारणीभूत ठरणार आहेत. मग सेंद्रिय शेती कशी परवडेल याचा कोणाचा प्रयोग, अनुभव असेल किंवा मानव संचालित एखादे उपकरण असेल. कृषितज्ज्ञ दाभोलकर यांचा प्रयोग परिवार तर अशा पुढच्या पावलांसाठी आसुसलेला. अधिक उत्पादन मिळण्यासाठी केवळ संकरित बियाणे असून उपयोग नाही तर त्यासाठी काही विशिष्ट पद्धतीही अवलंबाव्या लागतात. अशा प्रकारच्या सर्व प्रयोगांसाठी, अशा प्रयोगांची माहिती लोकसत्ताच्या ‘शेतीवाडी’ तून प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही जे काही प्रयोग करीत असाल, जर काही नवीन तंत्रज्ञान वापरत असाल तर त्याचा अनुभवही लिहा. तुम्हाला शेतीच्या एखाद्या धोरणाबाबत जे काही वाटत असेल ते परखडपणे लिहा. तेवढय़ाच निर्भिडपणे ते विचार लोकांपर्यंत पोहोचतील.
मजकूर कागदाच्या एका बाजूला लिहून तो -
निवासी संपादक, दै. लोकसत्ता,
३/११, अरोरा टॉवर्स, मोलेदिना रोड, कॅम्प, पुणे-१
या पत्त्यावर पाठवावा. पाकिटाच्या वर एका कोपऱ्यात ‘शेतीवाडी’साठी असा उल्लेख करावा. मातीत राबून राठ झालेले हात, औताचा कासरा धरुन तळहाताला घट्टे पडलेले हात घेऊन जिगरबाज मनांचा शेतकरी लिहिता व्हावा, आपलेच प्रयोग, अनुभव त्याने स्वत:च, प्रसंगी तोडक्या-मोडक्या शब्दात माडांवेत.आता सुजाण झालेला शेतकरी स्वत: लिहू शकतो हे सिद्ध करण्याची ही वेळ. त्यांच्यासाठी हे आवाहन. |