Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३१ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

चौकशीसाठी केंद्राने आयोग नेमावा
अडवाणी यांची मागणी
नवी दिल्ली, ३० जानेवारी/खास प्रतिनिधी

 

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेलाभीषण दहशतवादी हल्ला करणारे अतिरेकी कुठून व कसे आले, याचा शोध घेण्यासाठी केंद्रातील युपीए सरकारने चौकशी आयोग नेमावा, अशी मागणी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. गेटवे ऑफ इंडिया ते इंडिया गेट हे अंतर सायकलने पूर्ण करून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणारे विख्यात सायकलपटू विनोद पुनमिया यांचे दिल्ली आगमनप्रसंगी आपल्या निवासस्थानी स्वागत करताना अडवाणी बोलत होते.
‘व्हिल टू हिल’ या अभियानाच्या माध्यमातून मुंबई ते दिल्ली हे सुमारे १५०० किमी अंतर अवघ्या साडेतीन दिवसात पूर्ण करणारे विनोद पुनमिया यांची अडवाणी यांनी मुक्तकंठाने प्रशंसाकेली. पुनमिया यांनी जो पराक्रम दाखविला आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी ठरेल, असे नमूद करताना अडवाणी म्हणाले की, पुनमिया यांनी आपल्या या मोहीमेचा संबंध दहशतवादाशी जोडला आहे.
हाच धागा पकडून अडवाणी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. भारतावरील दहशतवादी हल्ला समुद्रमार्गाने होणार याचे केंद्र सरकारने अनेकवेळा इशारे दिले होते. पण या इशाऱ्यांची वेळीच दखल घेतली गेली नाही. सुरक्षा यंत्रणा बेसावधच राहिली आणि शेवटी असा हल्ला झालाच. मागे कारगीलच्या वेळीही अशीच घुसखोरी झाली होती आणि आम्हाला शेवटपर्यंत पत्ताच लागला नाही. अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याप्रमाणेच हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आणि देशाला उद्वेलित करणारा हल्ला होता. अशा भीषण घटना घडतात तेव्हा त्याची चौकशी केली जाते. पण मुंबईवर एवढा भीषण हल्ला होऊनही त्याची चौकशी न करण्याचा सरकारचा निर्णय अनाकलनीय असा आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे स्वरुप एवढे भीषण होते की या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. तरीही या हल्ल्याची चौकशी न करण्याचा सरकारचा निर्णय योग्य नाही. मुंबईवरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सरकारने आयोग नेमलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन अडवाणी यांनी केले.
दिल्लीतील भाजप मुख्यालयाचे प्रभारी श्याम जाजू यांनी प्रारंभी पुनमिया यांच्या उपक्रमाची माहिती दिली.
लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी यावेळी या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी पुनमिया यांनीही मनोगत व्यक्त केले. पुनमिया यांच्याकडून त्यांच्या सायकलची अडवाणी यांनी माहिती घेतली. यावेळी लोकसत्ता, मुंबईचे निवासी संपादक सुधीर जोगळेकर तसेच या उपक्रमाचे आयोजक प्रसाद महाडकर, मनोज चौधरी आणि पुनमिया यांची मुंबई ते दिल्ली प्रवासात साथ देणारा चमूही उपस्थित होता. तत्पूर्वी, आज सकाळी पुनमिया यांचे जयपूरहून दिल्ली येथे आगमन झाले. इंडिया गेट येथे त्यांचे श्याम जाजू व त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्यासह इंडिया गेटवर उपस्थित राष्ट्रभक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले.