Leading International Marathi News Daily                                 मंगळवार, १० फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानचा पुन्हा कांगावा
इस्लामाबाद, ९ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

 

पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी हे उद्या, मंगळवारी मुंबई हल्ल्यांबाबत भारताने पाकिस्तानकडे सादर केलेल्या पुराव्यांवर प्रथमच भाष्य करणार असल्याची माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली असली तरी भारताने दिलेल्या पुरेशा पुराव्यांअभावी या हल्ल्यांबाबतची चौकशी करणे फार मुश्किल झाले असल्याचा सूर पंतप्रधान गिलानी यांच्या लष्कराचे अधिकारी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत आळवण्यात आला आहे. या हल्ल्यांबाबत पाकिस्तानात अखेर खटला दाखल होईल ही भारताची अपेक्षा अपूर्ण राहण्याचीच शक्यता असून पुरसे पुरावे नसल्याचे कारण देऊन पाकिस्तान भारतीय सरकारकडे आणखी काही प्रश्न उपस्थित करण्याचीच शक्यता आहे.
गिलानी यांच्यासोबत झालेल्या सोमवारच्या बैठकीत लष्करप्रमुख अश्फाक कियानी, संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार, परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, माहिती मंत्री शेरी रहमान आणि अंतर्गत सुरक्षा सल्लागार रहमान मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. पाकच्या संरक्षण खात्याच्या समन्वय समितीने भारताकडून आलेल्या अपुऱ्या पुराव्यांमुळे या हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेणे फारच अवघड जात असून भारताकडे आणखी काही प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असाच सूर आळवण्यात आला. या समितीला आतापर्यंत भारताने सादर केलेल्या पुराव्यांवर कशा प्रकारे तपास करण्यात आला याची माहिती देण्यात आली. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने या घटनेच्या चौकशीत उपस्थित केलेल्या काही मुद्दय़ांवर भारताने अधिक प्रकाशझोत टाकणे आवश्यक आहे असाही मुद्दा या बैठकीत प्रकर्षांने चर्चिला गेला. अखेर भारताच्या या पुराव्यांवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून अधिकृत भाष्य होणार असले व पाकने आतापर्यंत चालविलेल्या चौकशीचा अहवाल जाहीर होणार असला तरी अंतिमत: पाकिस्तान भारताने दिलेले पुरावे पुरेसे नसल्याचा कांगावा करण्याचीच दाट शक्यता आहे.
कसाबशी संबंधित तिघांना कराचीत अटक
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने कराची येथून अजमल कसाबशी निगडित तीनजणांना अटक केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटातील कसाब हा एकमेव अतिरेकी भारताच्या ताब्यात आहे. या तिघांना आता इस्लामाबादला नेण्यात येणार असून, चौकशी प्रक्रिया सुरू आहे, असे वृत्तात पुढे म्हटले आहे. परंतु अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. तीन संशयित व्यक्तींना फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) आणि अन्य गुप्तचर संस्थांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवडय़ात ‘एफआयए’ने मुंबईवरील हल्ल्यासंबंधित चौकशी अहवाल गृहमंत्रालयाकडे सुपूर्द केला होता. आता कॅबिनेट संरक्षण समिती या अहवालाबाबत पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करणार आहे.