Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १३ फेब्रुवारी २००९

व्यापार - उद्योग

‘त्रिवेणी बिआलेट्टी’चा खर्डी येथे उत्पादन प्रकल्प
व्यापार प्रतिनिधी: इटलीतील स्वयंपाकाच्या भांडय़ाचे अग्रेसर ब्रॅण्ड असलेले बिआलेट्टीने भारतात प्रथमच मोठी गुंतवणूक करायचे ठरविले असून, गंगर कुटुंबियासमवेत ७०:३० भागीदारीतून ‘त्रिवेणी बिआलेट्टी उद्योग प्रा. लि.’ नावाची संयुक्त कंपनी स्थापण्याचा निर्णय घोषित केला आहे. एकंदर ६३ कोटी रुपयांची ही गुंतवणूक महाराष्ट्रात खर्डी येथील देशातील कुकवेअर व किचन अप्लायन्सेसच्या सर्वात मोठय़ा उत्पादन प्रकल्पामार्फत होत आहे. खर्डी येथील उत्पादन प्रकल्पावरच त्रिवेणी बिआलेट्टीकडून रु. ४२ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाची उत्पादनक्षमता ५० लाख भांडी प्रति वर्ष इतकी असेल. आशियातील सर्वप्रथम सेसमी हे एकमेवाद्वितीय यंत्र या प्रकल्पात वापरात येणार आहे. ५००० टन दाब देणारी ही यंत्रे नाण्यांच्या छपाईसाठी वापरात येतात. कंपनीकडून भारतात ‘स्टेला’ या ब्रॅण्डनावाने उच्च दर्जाची अ‍ॅल्युमिनियमची नॉन-स्टिक भांडी बाजारात येतील. उच्च दर्जाच्या तीन मिमी जाडीच्या अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेल्या या भांडय़ांसाठी डय़ुराटेक ही प्रणाली वापरात येणार असल्याने ती सध्या बाजारात उपलब्ध भांडय़ापेक्षा तीन पट जास्त टिकाऊ असतील, असा दावा त्रिवेणी बिआलेट्टीचे व्यवस्थापकीय संचालक रचित गंगर यांनी केला. खर्डी येथील उत्पादन प्रकल्पांतून स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात थेट रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

‘एमसीएक्स- एसएक्स’चे मराठीत वेबस्थळ
व्यापार प्रतिनिधी: भारतातील नवीन स्टॉक एक्स्चेंज असलेल्या एमसीएक्स-एसएक्सने आपले पाचवे विभागीय वेबस्थळ मराठीत सुरू केले. (http://marathi.mcx-sx.com). भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी डॉ. ए. एम. पेडगांवकर यांच्या हस्ते वेबस्थळाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र हे एक अग्रेसर औद्य्ोगिक राज्य असून, व्यापारी, निर्यातदार व अन्य उद्य्ोजकीय भागीदारांचे माहेरघर आहे. परंतु भाषेच्या अडसरामुळे वायदा बाजारपेठेच्या फायद्यंपासून वंचित राहिलेल्या येथील मोठय़ा विभागाला या नव्या उपक्रमातून मोठा लाभ उठविता येणे अपेक्षित आहे. करन्सी फ्युचर्सबद्दल शिक्षणासाठी हिंदी, गुजराथी, तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये यापूर्वी एमसीएक्स-एसएक्सने वेबस्थळ सुरू केले आहे. या पुढाकारामुळे या क्षेत्रात कार्यरत ट्रेडर्स, ब्रोकर्स आणि एकंदर उद्योग समुदायाला चलन बाजारपेठ समजून घेण्यास आणि आपल्या पैशाला असलेली जोखीम दूर करण्यास (हेजिंग) मदत होईल.या नव्या वेबस्थळात करन्सी फ्युचर्स व्यवहारांबाबत नित्यनेमाने उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, करन्सी फ्युचर्स प्राइस टिकर (ताजा व बदलता भाव-फलक), रिअल-टाइम चार्ट्स, पाहण्यासाठी मोठे करता येण्याजोगे ऑनलाइन चार्ट्स आणि एकंदर बाजार त्याचे सदस्यत्व वगैरे सर्व आवश्यक माहिती नमूद आहे. भावात नियमित होत असलेले बदल; एकंदर उलाढाल झालेल्या व्यवहाराचे प्रमाण आणि कॉन्ट्रॅक्ट्सचा तपशील अशी सौद्यांसंबंधी निर्णय घेण्यास मदतकारक माहितीही वेबस्थळावर दिली जाईल.

सचिनतर्फे ‘लिट्ल चॅम्पस् बिग कॅम्प’
व्यापार प्रतिनिधी: सचिन ट्रॅव्हल्सने एक अनोखा ‘कूल’ कॅम्प आयोजित केला आहे. ९ ते १९ वयोगटातल्या मुलामुलींना पालक बरोबर नसल्यामुळे कॅम्प ‘टेन्शन फ्री’ आणि ‘सचिन’च्या सेवेमुळे पालकही ‘फिकीर फ्री’ अशी ही योजना आहे. नैनिताल कॉर्बेटच्या परिसरातल्या या बिग कॅम्पसाठी मुंबईहून राजधानी एक्स्प्रेसच्या थ्री टायर एसीनी टूर मॅनेजरबरोबर दिल्लीला जायचं, तिथून बसने कॉर्बेट आणि नैनितालला! हॉटेलमधल्या म्ॉर्मेटरीत किंवा हॉटेलच्या आवारातल्या टेन्टसमध्ये मुलामुलींनी सेपरेट राहायचं! ब्रेकफास्ट, व्हेज-नॉनव्हेज लंच अँड डिनर सगळं काही हॉट अँड डेलिशियस!
दहा दिवसांच्या या कॅम्पमध्ये रॉक क्लाईंबिंग, रॅपलिंग, कमांडो नेट, बर्मा ब्रिज, नाईट वॉक, ट्रेक, जंगल सफारी, साईटसिईंग, बर्ड अँड अ‍ॅनिमल वॉचिंग, फन गेम्स, स्लाईड शो, केबल कार राईड, कॅम्प फायर अशा कितीतरी मस्त मस्त गोष्टी असणार आहेत. प्रत्येक मुलाचा सचिन ट्रॅव्हल्स इन्शुरन्सही काढणार आहे. या कॅम्पमध्ये एनर्जेटिक अ‍ॅडव्हेंचर्स, अमेझिंग एक्साईटमेंट आणि अनएन्डिंग, एन्टरटेनमेंट तर आहेत, पण ती कूल क्लायमेट, क्यूट फ्रेंडस् आणि सचिन स्पेशल क्लासिक ट्रीटमेंटबरोबर एन्जॉय करायची आहे. कॅम्पसंबंधी तपशील सचिन ट्रॅव्हल्सच्या कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा २४४६८०८० क्रमांकावर संपर्क साधता येईल.

बोरिवलीत ‘ट्र व्हॅल्यू प्रॉपर्टी शो’
व्यापार प्रतिनिधी: मीरा रोड ते विरार या भागासाठी ‘ट्र व्हॅल्यू प्रॉपर्टी शो’चे आयोजन २० ते २३ फेब्रुवारीदरम्यान कोरा केंद्र मैदान, एस. व्ही. रोड, बोरिवली (प.) येथे करण्यात येणार आहे. मुंबईपासून लांब अंतरावर असलेल्या पश्चिम उपनगरांसाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर स्थावर मालमत्ता प्रदर्शन भरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मेळाव्याचे आयोजन अर्थ प्रॉपर्टी नेटवर्क इंडिया प्रा. लि.ने केले असून या कार्यक्रमाचे व्यवस्थापन अ‍ॅडेक्स एक्झिबिशन यांनी केले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात मीरा रोड ते विरार या भागातील विविध बांधकाम प्रकल्प मांडण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात वन ते फोर बीएचके निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुल, मल्टिप्लेक्स मॉल्स, औद्योगिक गाळे (६०० चौरस फूट ते १०,००० चौरस फूट) आणि सेकंड होम प्रकल्पही मांडण्यात येणार आहेत. या मेळाव्यादरम्यान खरेदीदारांना विविध लाभ योजना आणि सवलती यांचा फायदा घेता येऊ शकणार आहे. ‘अ‍ॅकोमोडेशन टाइम्स’च्या सहकार्याने या मेळाव्यात स्थावर मालमत्ता उद्योग या विषयावर आठ परिसंवाद होतील.

पेपर प्रॉडक्ट्सच्या निव्वळ विक्रीत १५ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: पॅकेजिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या दि पेपर प्रॉडक्टस लिमिटेड या देशातील आघाडीच्या कंपनीने ३१ डिसेंबर २००८ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत रु. ६१२.०९ कोटींची निव्वळ विक्री करून २००७ या वर्षांत केलेल्या रु. ५२३.०६ कोटींच्या तुलनेत १५ टक्के वाढ केली आहे. करपूर्व नफा या काळात ११.९ टक्क्यांनी घसरलेला असून तो २००७ या वर्षांतल्या रु. ३३.७८ कोटींवरून रु. २९.७७ कोटींवर आला आहे. त्यामुळे प्रती समभाग मिळकतही २००७ वर्षांतील ४.९३ रुपयांच्या तुलनेत ३.४० रुपये नोंद झाली आहे. तिमाहीची तुलना करताना कंपनीने २००८ या वर्षांत संपलेल्या चौथ्या तिमाहीत रु. १४२.७९ कोटींची निव्वळ विक्री केली आहे. २००७ वर्षांतल्या चौथ्या तिमाहीत रु. १४२.२९ कोटींच्या झालेल्या निव्वळ विक्रीच्या तुलनेत त्यात किरकोळ ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. करपूर्व नफा २००८ या वर्षांतल्या चौथ्या तिमाहीत रु. ६.१५ कोटी (अगोदरच्या वर्षांत रु. ११.१५ कोटी) झाला.

‘आयडीबीआय फोर्टिस’तर्फे आता होमअ‍ॅश्युरन्स प्रोटेक्शन प्लॅन
व्यापार प्रतिनिधी: राहत्या घराची सुरक्षितता, तसेच तुमच्या पश्चात त्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाचे दायित्व ही एक मोठी जोखीम सामान्य मध्यमवर्गीयांना सतावत असते. या पाश्र्वभूमीवर आयडीबीआय-फोर्टिस लाइफ इन्श्युरन्स कंपनीने ‘होमअ‍ॅश्युरन्स प्रोटेक्शन प्लॅन’ ही योजना प्रस्तुत केली आहे. ही योजना एक अनोख्या धाटणीची मॉर्गेज रिडय़ूसिंग टर्म इन्श्युरन्स योजना आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे विमाधारकास कमी खर्चात बदलत्या व्याजदरापासूनही सुरक्षा प्रदान केली जाते. होमअ‍ॅश्युरन्स प्रोटेक्शन प्लॅनमुळे वेगवेगळ्या मालमत्तांना सुरक्षा तर मिळेलच पण त्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतींचाही समावेश करण्यात आला आहे. दोन व्यक्तींच्या नावे जर मालमत्ता असल्यास दोघांनाही विमा घेऊन, व्यक्तिगत हप्त्यात मोठी बचतही करता येते. त्या मालमत्तेवर जर दोघांचे संयुक्त कर्ज खाते असेल आणि एका विमेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वाटय़ाचा कर्जाचा भार संपूर्णपणे या पॉलिसीद्वारे उचलला जातो.

मायक्रोवर्ल्डचा ई-स्कॅन-१० भारतीय बाजारात
प्रतिनिधी: मायक्रोवर्ल्डचा ई-स्कॅन-१० हा अ‍ॅण्टी-व्हायरस भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आला आहे. हा अ‍ॅण्टी व्हायरस अत्याधुनिक व्हायरस असून टेकसॅव्हींसाठी तो बहुपयोगी संरक्षण देण्यास उपयुक्त आहे. ई-स्कॅनमधील सर्व अ‍ॅण्टी व्हायरसेस, वम्र्स, टॉर्जन्स, स्पायवेअर आणि इतर बाबी अत्याधुनिक असून त्यांच्यापासून सर्वोत्तम सुरक्षा मिळण्यास उपयुक्त आहे. शिवाय इ-मेल, चॅटींग, डाऊनलोडींग या वेळी येणाऱ्या व्हायरसेसपासूनही तुमचा कॉम्प्युटर वाचविण्यास हा अ‍ॅण्टीवायरस उपयुक्त आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आवश्यक त्या सुरक्षांचा विचार करून हा अ‍ॅण्टी-व्हायरस तयार केल्याचे मायक्रोवर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गोविंद राममूर्ती यांनी सांगितले.

आरती इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक
व्यापार प्रतिनिधी: आरती इंडस्ट्रीज लिमिटेडने चालू वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीअखेरीस कंपनीच्या उलाढालीत २१ टक्के वाढ नोंदविली. कंपनीने रु. ३२५.१ कोटींची उलाढाल केली. या अगोदरच्या वर्षी हे प्रमाण २६८.८ कोटी रुपये होते. डिसेंबर २००८ अखेर संपलेल्या नऊ महिन्यांच्या अखेरीस उलाढालीत ७० टक्के वाढ होऊन ती रु. १११०.५ कोटींची झाली. या अगोदरच्या वर्षीचे प्रमाण ६५४.५ कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे तिसऱ्या तिमाहीअखेरीस ऑपरेटिंग नफ्यात १४ टक्के वाढ झाली. ४१.५ कोटी रुपये ऑपरेटिंग नफा झाला. तिसऱ्या तिमाहीअखेरीस करोत्तर नफ्यात घट होऊन तो ६.८ कोटी रुपये झाला. अगोदरच्या वर्षी तो रु. १३.९ कोटी होता.

रामोजी फिल्मसिटी हॉटेल्सना आयएसओ
प्रतिनिधी: हैद्राबादस्थित रामोजी फिल्मसिटीच्या डॉल्फिन हॉटेल्स लिमिटेडला डीएनव्हीएसतर्फे आयएसओ २२०००:२००५ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉल्फिन हॉटेल्सची रामोजी फिल्मसिटीमध्ये तारा, सितारा, सहारा आणि युरेका अशी चार हॉटेले आहेत. चित्रीकरणासाठी देशातील अनेक ठिकाणांहून चित्रपट निर्माते व कलावंत नेहमी येत असतात. त्यांच्यासाठी तारा हे पंचतारांकित, सितारा हे त्रितारांकित, सहारा हे डिलक्स गटातील तर युरेका हे थीम रेस्टॉरंट अशी हॉटेले आहेत.