भाजपला घटस्फोट देण्यास शिवसेना तयार!
संदीप प्रधान
मुंबई, १८ फेब्रुवारी
शिवसेना-भाजपचे नाते पती-पत्नीचे आहे. नवरा सकाळी बायकोला मारतो आणि संध्याकाळी सिनेमाला घेऊन जातो. तसेच युतीमधील या पक्षांचे आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु आता शिवसेना-भाजपमधील संबंध अधिकच बिघडले असून घटस्फोट होण्याची चिन्हे दिसत आहेत. अर्थात यापूर्वी चिमूरची पोटनिवडणूक आणि राष्ट्रपती निवडणूक यावेळी अशीच परिस्थिती निर्माण होऊनही युती तुटली नव्हती. मात्र आता प्रश्न सत्तेचा आहे.
गेली दोन दशकांहून अधिक काळ असलेली शिवसेना-भाजप युती सध्या तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण भाजपबरोबर राहून महाराष्ट्रात सत्ता प्राप्त होईल, असे शिवसेनेला वाटत नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी सत्ता आली नाही तर कदाचित मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भविष्यात राजकीय बाजी मारतील, अशी भीती उद्धव व त्यांच्या हितचिंतकांना वाटते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सत्ता हेच सध्या शिवसेनेचे ध्येय्य आहे.
दक्षिण मुंबई व यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या वाटणीवरून सध्या युतीत तणाव निर्माण झाल्याचे तात्कालीक कारण दिसत आहे. दक्षिण मुंबईतील जागा सातत्याने लोकसभेवर निवडून जाणाऱ्या मोहन रावले यांना सोडावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. परंतु भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी या मतदारसंघावर दावा केला असून त्या या मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. हळदीकुंकु समारंभापासून भव्य पोस्टर्स लावण्यापर्यंत अनेक मार्गाने त्या वातावरण निर्मिती करीत आहेत. यवतमाळची जागा सेनेच्या खासदार भावना गवळी यांना सोडायला भाजप तयार नाही. भाजपचे खासदार हरिभाऊ राठोड विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी भाजपसोबत राहिले नाहीत. एकीकडे जागावाटपाचा विषय पेटलेला असताना दुसरीकडे सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेत जाऊ नये व भाजपसोबत यावे याकरिता अनेक प्रयत्न झाले. अखेर दादांनी शिवसेनेची निवड केली.
शिवसेनेची भाजपबाबतची नाराजी केवळ तेवढय़ापुरती मर्यादीत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा राज्यातील सरकारने अटक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा केंद्रात भाजपप्रणीत सरकार होते. ठाकरे यांची अटक टाळणे केंद्र सरकारला शक्य होते. तसे प्रयत्न शिवसेनेतील काही मंडळींनी करूनही पाहिले. परंतु केंद्र सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. नारायण राणे व राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर आता हा पक्ष कमकुवत झाला, असे समजून प्रमोद महाजन यांच्यापासून सर्व भाजप नेत्यांनी शिवसेनेचा हात-कान पिरगळण्याचा प्रयत्न केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे खेचण्याचा केलेला प्रयत्न, चिमूरची जागा आपल्याकडे खेचण्यावरून झालेला वाद यामध्ये युतीमधील दोन्ही पक्षाच्या मनाला आणि शरीराला जखमा झाल्या. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मराठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देण्याच्या मुद्दय़ावरून संबंध खूप बिघडले. आता प्रकरण घटस्फोटावर आले आहे. |