Leading International Marathi News Daily
शनिवार, २१ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘कमळा’बाई आजही लाडकी
मुंबई, २० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य युती म्हणजे नुसता संशयकल्लोळ आहे. ‘कमळा’बाईवर आमचे पूर्वीइतकेच प्रेम आहे असा निर्वाळा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती तुटणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे राज्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अबाधित असलेली युती यापुढेही अभंगच राहील, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युती तुटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि गडकरी यांनी आज पडदा टाकला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत अलीकडेच घेतलेली भेट आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घेतलेली भेट यामुळे शिवसेना-भाजप युती तुटण्याच्या चर्चेने वेग घेतला होता. शिवसेनेला युती तोडावयाची असल्यास त्यांनी तसे स्पष्ट सांगावे, असे वक्तव्य गडकरी यांनी केल्याची जोरदार चर्चा आज दिवसभर सुरू होती. मात्र हे राष्ट्रवादी काँग्रेसचे षडयंत्र असल्याचे स्पष्ट करून ठाकरे आणि गडकरी यांनी युती अभेद्य असल्याचा निर्वाळा दिला. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखाद्वारे शिवसेना-राष्ट्रवादी संभाव्य युतीची खिल्ली ‘नुसता संशयकल्लोळ’ या शीर्षकाद्वारे उडविली आहे. हे आमच्या आणि ‘कमळा’बाईच्या संसारात बिब्बा घालण्याचे उद्योग आहेत, असा टोला ठाकरे यांनी लगावला असून आमच्या २२ वर्षांच्या राजकीय संसारातील जोडीदाराने म्हणजेच लाडक्या ‘कमळा’बाईने हिरमुसले होण्याचे कारण नाही. ‘कमळा’बाईवर आमचे पूर्वीइतकेच निस्सीम प्रेम असून पट्टराणीच्या दर्जात आणि प्रेमात कोठेही कमतरता दिसत नाही, असे शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.