जगभर प्लास्टिक
प्रत्येक शहरात आता मॉल वाढीला लागले आहेत. तिथे पिनपासून ते फर्निचपर्यंत सर्व काही मिळतं. मॉलमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातातल्या कॅरी बॅगचं पुढं काय होतं? हा संशोधनाचाच विषय आहे. आता मॉलमध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने सामानाबरोबर कॅरी बॅगही ओघानेच घरी येतात. या बॅग आपण निसर्गात फेकल्या जाण्यापासून कशा रोखू शकतो?
जगभरात कॅरी बॅग व त्यांचे वर्गीकरण, पुनर्वापराविषयी लहान-मोठय़ा चळवळी सुरू आहेत. अमेरिकेत काही हौशी पर्यावरणप्रेमींनी मॉल्समधून मिळणाऱ्या कॅरीबॅग कमीत कमी कशा होतील, घरी सामानामुळे येणाऱ्या बॅग परत-परत कशा वापरल्या जातील आणि वापरून झाल्यावर रिसायकलिंग स्टेशनपर्यंत कशा पाठवल्या जातील, या संदर्भात छोटे-छोटे क्लबच स्थापन केले आहेत. त्यांच्या दबावगटांमुळे तेथील मॉल्स दर तीन-चार वस्तूंसाठी वेगळी कॅरी बॅग देण्यापेक्षा एकाच मोठय़ा बॅगमध्ये सामान देऊ लागले आहेत. समजा, तुम्हाला दोन लिंबं आणि एक किलो बटाटे घ्यायचे आहेत. किमतीचे लेबल लावण्यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टी प्लास्टिकच्या दोन पिशव्यांमध्ये भरणे भाग आहे. अशा वेळी केवळ दोन लिंबांसाठी एक किलोच्या आकाराची पिशवी वापरणे गरजेचे नाही. ही दोन लिंबं तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीशिवाय किंवा लहान आकाराच्या पिशवीत विकत घेऊ शकता. बटाटय़ासाठी मात्र एक किलोची पिशवी तुम्ही वापराल. ह्य़ा सर्व पिशव्या घरी तुम्ही वेगळ्या काढून ठेऊ शकता. पारदर्शक प्लास्टिक, अपारदर्शक प्लास्टिक, रंगीत प्लास्टिक, प्लास्टिकचे डबे, झाकणं, टॅग्ज्स या सर्वाच्या ग्रेड्स ठरवलेल्या आहेत. त्या ग्रेडची माहिती त्या-त्या प्लास्टिकच्या वस्तूंवर दिलेली असते. त्यानुसार त्या तुमच्या घरी वेगवेगळ्या कंटेनरमध्ये साठवायच्या. हा कचरा अशाप्रकारे सात-आठ डस्टबीन्समध्ये घरोघरीच वेगळा होतो. आपल्याकडे जसे रेशन कार्ड असते, तसेच तिथल्या काही गावांमध्ये ‘गार्बेज कार्ड’ मिळते. कचरा डंपिंग स्टेशनवर नेण्याचा तुमच्या सोयीनुसारचा दिवस ठरवला जातो. आठवडय़ाच्या शेवटी हा कचरा तुम्ही त्या स्टेशनपर्यंत स्वत: नेऊन ‘रिसायकलिंग युनिट’मध्ये टाकायचा. त्याची नोंद तर तुमच्या गार्बेज कार्डवर होतेच, पण घरीच कचऱ्यातले प्लास्टिक आणि अॅल्युमिनिअमच्या कॅन्स वेगळ्या करून आणल्याने काही रक्कम तुमच्या नावावर बक्षीस म्हणून वेगळी काढली जाते. ती तुम्हाला थेट न मिळता तुमच्यातर्फे एखाद्या शाळेच्या पर्यावरण क्लबसाठी देणगी म्हणून दिली जाते. या पैशातून शालेय मुलांना कचऱ्याचे वर्गीकरण केवळ पुस्तकातच न शिकवता प्रत्यक्ष डंपिंग स्टेशनवर आणून शिकवले जाते.
आपण वापरणारे फुड प्रोसेसर्स, वॉशिंग मशिन्स व इतरही अनेक घरगुती उपकरणांचे ९५ टक्क्य़ांहून अधिक पार्ट्स विविध तऱ्हेच्या प्लास्टिकचे असतात. टेफलॉनचे तवे हा पण प्लास्टिकचाच एक प्रकार आहे. अगदी घरोघरी हे ‘नॉन-स्टिक’ तवे दिसतात. या सर्व गोष्टी खराब झाल्यावर त्यांचे घरच्या घरीच वर्गीकरण करून रिसायकलिंगसाठी पाठवायची सोय असणारी मोठी साखळीच विकसित देशांमध्ये आहे. स्कॉटलंड आणि काही इतर युरोपीय देशांमध्ये स्वयंपाक घरातील फर्निचरमध्येच प्लास्टिकच्या पिशव्या साठवण्यासाठी, चटकन परत वापरता येतील अशा तऱ्हेने अडकवण्यासाठी खास कप्पाच ठेवलेला असतो. बिस्किटाचे पुडे, चॉकलेट, चिप्स आणि केकचे प्लास्टिक रॅपर्स विविध रंगी आणि आकर्षक असतात. ते गोळा करून, एकमेकांमध्ये विणून फॅशनेबल पर्स तयार केल्या जातात. त्यांचे चांगले मार्केट अमेरिकेत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून बनवलेली शोभिवंत फुले, गिफ्ट आर्टिकल्स यांनाही प्रचंड मागणी तिथे आहे.
अगदी आपला शेजारी, बांगलादेशातही दहा मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर कडक बंदी आहे. ही बंदी राबविल्यानंतर बांगलादेशात कॉटन, ज्यूट आणि पेपर बॅग्ज्सचे मार्केट एकदम वाढले. प्लॅस्टिकमुळे होणारा कचरा तर आटोक्यात आलाच, पण पुनर्वापराची आणि कचरा वर्गीकरणाची मानसिकताही निर्माण झाली. महिलांच्या लहान-लहान गटांमार्फत या कॉटन व पेपर बॅग बाजारात आल्याने त्यांना रोजगारही मिळाला. अशाच काही महिला गटांतर्फे सिंगापूरमध्ये प्लास्टिकच्या बॅगला पर्याय म्हणून रस्त्यांवर लावलेल्या आणि नंतर कचऱ्यात जाणाऱ्या बॅनर्सच्या बॅग शिवण्याची मोहीम निघाली. प्लास्टिकच्या बॅगपेक्षा या बॅनर बॅग भक्कम, आकर्षक व टिकाऊ आहेत. या बॅग्ज विकत घेऊन वापरणे हे सिंगापूरच्या काही भागांमध्ये ‘स्टेटस सिंबॉल’ आहे.
प्लास्टिकची सहज उपलब्धता, त्याचा लवचिकपणा, अगदी कुठल्याही आकार-प्रकारात विविध वस्तू बनवता येण्याची सोय आणि या सर्व वस्तू परत-परत रिसायकल होण्याची शक्यता यामुळे प्लास्टिकला आपल्या आयुष्यातून हद्दपार करणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच प्लास्टिकचा वापर आणि पुनर्वापर आपल्या हातात आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पर्यावरण समस्या कमी करण्यासाठी या कचऱ्याचे जागच्या जागी वर्गीकरण आणि रिसायकलिंग दुसरा पर्याचच नाही.. निदान सध्यातरी!
prachi333@hotmail.com
|