दोन भाऊ शेजारी..!
‘महाविश्व : एक महाकोडे’ हे सुरेश लोटलीकर यांचे ‘त्रिकालवेध’ सदरासंबंधीचे पत्र वाचले (१६ मे). लोटलीकर यांनीही अनेक प्रश्न उभे केले आहेत. एखादा माणूस अचाट धैर्याचा, तर दुसरा एकदम भित्रा कसा बनतो, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या प्रश्नाचे मूळ प्रत्येकाच्या रक्तपेशींमध्ये सापडायला हवे. काहीजणांमध्ये ‘जेनेटिकल’ दोष असतो, असे जे म्हटले जाते, त्याच्याशीच हा प्रश्न संबंधित आहे.
अर्थात हेही सर्वस्वी खरे कसे मानता येईल, हाही पुन्हा प्रश्न आहेच. हा ‘जेनेटिकल प्रॉब्लेम’ असेल तर मग एकाच घरातील दोन्ही भाऊ गुन्हेगार किंवा दोन्ही भाऊ लेखक, कवी वा दोन्ही भाऊ शास्त्रज्ञ असायला हवेत. संस्काराचा हा भाग मानला तर दोघांनाही ते सारखेच मिळायला हवेत. दोघांचाही बुद्धय़ांक हा एकसारखा नाही तरी थोडाफार पुढेमागे असायला हवा. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. स्वभावांच्या या भेदाविषयी ‘त्रिकालवेध’ लिहिला जावा.
गणेश आपटे, पुणे
म्हाडा अर्जदारांची प्रतीक्षा संपवा
म्हाडाच्या सोडतीमध्ये प्रतीक्षायादीही महत्त्वाची आहे. कारण प्रतीक्षायादीतील लोकांचीही घरे मिळण्याची आशा अजून संपलेली नाही. मात्र त्यांना वाऱ्यावर सोडून न देण्याची जबाबदारी म्हाडा व्यवस्थापनावर आहे.
माणुसकीला अनुसरून लोकांमधील विश्वास वाढविणे हे सर्वस्वी म्हाडा व्यवस्थापनाच्या हातात आहे. म्हाडाने आता त्याच अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याच्या व्यापामध्ये आणि चक्रामध्ये पिळून काढू नये. नाही तर यादीतील लोकांची प्रतीक्षा कधी संपणारच नाही. म्हाडाच्या अन्य योजनांमध्येही या यादीतील अर्जदारांना प्राधान्य देण्याचा विचार व्हावा.
असे केले तरच सामान्य माणसाचे स्वत:च्या घराचे स्वप्न पुरे होईल. सुज्ञ अधिकारीवर्ग या सूचनेचा विचार करेल, ही आशा.
अनिल गिंडे, ठाकुरद्वार, मुंबई
|