Leading International Marathi News Daily

शनिवार, २३ मे २००९

राज्य

मोहिमेची माहिती अशोक अय्यर यांनी वरिष्ठांना कळविली नव्हती’
नागपूर २२ मे / प्रतिनिधी
नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस निरीक्षक अशोक अय्यर यांनी मोहिमेवर जाण्यापूर्वी त्याची माहिती वरिष्ठांना दिली नव्हती, असे खुद्द गृहमंत्री जयंत पाटील यांनीच नागपूर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निघताना पोलिसांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगली असती तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती, असे गृह खात्याला वाटू लागले आहे. नक्षलवादी त्यांच्या खबऱ्यांमार्फत चुकीची माहिती पोलिसांकडे पोचवून त्यांना जंगलात बोलावून व हल्ला करतात, असे यापूर्वी अनेकदा घडले आहे.

टवीटोलाच्या जंगलात क्रौर्यही लाजले
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, २२ मे

कुणाचा हात तोडलेला तर कुणाचे डोळे बाहेर काढलेले, गर्भवती महिला जवानाच्या पोटात गोळय़ा घातलेल्या, पुरुष जवानांचे चेहरे ठेचून विद्रुप केलेले तर महिला जवानांच्या मृतदेहांची पार विटंबना केलेली..भीषण आणि क्रुरता हे शब्दही थिटे पडावे, असे अत्याचार गुरुवारी नक्षलवाद्यांनी टवीटोलाच्या जंगलात केले. धानोऱ्यावरून पंधरा किलोमीटर अंतर पार केले की टवीटोला गाव लागते. या गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर भर रस्त्यात नक्षलवाद्यांनी गुरुवारी सायंकाळी दोन पोलीस अधिकारी व पाच महिला जवानांसह सोळा पोलिसांना ठार केले.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचा सोमवारी दीक्षान्त समारंभ
नाशिक, २२ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त समारंभ २५ मे रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऱ्हदयरोग तज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महाकवी कालिदास कलामंदिरात होणार आहे. सकाळी साडेदहाला होणाऱ्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे हे असतील तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृदूला फडके याही उपस्थित राहणार आहेत. गोयल हे दीक्षान्त भाषण करणार आहेत.

श्रीकांत बोजेवार यांना ‘अक्षरशब्द’ पुरस्कार
पुणे, २३ मे/प्रतिनिधी

निनाद या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ‘अक्षरशब्द पुरस्कार’ या वर्षी ‘लोकसत्ता’चे सहसंपादक श्रीकांत बोजेवार यांना देण्यात येणार आहे. सामाजिक, राजकीय व प्रचलित घडामोडींवर निर्विष टिप्पणी करणारे कुशल पत्रकार व लेखक म्हणून ते परिचित आहेत. हा समारंभ ३० मे रोजी होणार असून भारतकुमार राऊत यांच्या हस्ते व निवेदक सुधीर गाडगीळ, विनय फडणीस, शुभदा जोशी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्काराची रक्कम भालचंद्र केसरी यांच्या नावाने गेली तीन वर्षे दिली जाते.

जळगाव जिल्ह्य़ात राशी-२ कापूस बियाणाच्या ४० हजार पाकिटांची विक्री
जळगाव, २२ मे / वार्ताहर

जिल्ह्य़ात राशी-२ या कापूस बियाणाच्या विक्रीचा कार्यक्रम गुरूवारी व शुक्रवारी पूर्ववत सुरू होऊन पोलीस बंदोबस्तात महसुली तसेच कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत ४० हजार पाकिटांची विक्री करण्यात आली. राशी-२ या बियाणांची मोठी मागणी व अल्प पुरवठा या तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा सोमवारी पारोळा येथे उद्रेक झाला होता. त्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने बियाणे विक्री स्थगित केली होती. व्यापाऱ्यांनीही त्या पद्धतीला विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांना दोषी ठरवित बंद पुकारला होता. प्रशासनाने तोडगा काढल्यानंतर विक्री पुन्हा सुरू करण्यात आली. पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी बियाणे विक्री केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. परंतु कुठेच अनुचित प्रकार झाला नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.

किशोर पाठक व केशव शिरवाडकर यांना साहित्य परिषदेचे पुरस्कार
नाशिक, २२ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सातत्याने लिखाण करून मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल येथील कवी किशोर पाठक यांना राजकवी भा. रा. तांबे यांच्या नावाचा ‘ग्रंथकार’ पुरस्कार तर के. र. शिरवाडकर यांना ‘साहित्य परिषद गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी मराठी साहित्यातील नामवंत ग्रंथकारांच्या नावाने ग्रंथकार पुरस्कार व दर्जेदार ग्रंथ निर्मितीबद्दल ग्रंथ पुरस्कार देऊन परिषदेतर्फे ज्येष्ठ लेखकांना गौरविण्यात येते. २६ ते २८ मे या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या परिषदेच्या १०३ व्या वर्धापनदिन समारंभात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. शिरवाडकर यांना कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. किशोर पाठक हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त असून केशव शिरवाडकर कुसुमाग्रजांचे बंधु आहेत.