Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

सोलापूरच्या 'मार्शल लॉ' चळवळीवरील पुस्तकाचे आज शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
सोलापूर, १३ जून / प्रतिनिधी

१९३० साली सोलापुरात झालेल्या मार्शल लॉ चळवळीवर ज्येष्ठ साहित्य संशोधक प्रा. डॉ. नी.

 

त्र्यं. पुंडे यांनी लिहिलेल्या ‘मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे’ या पुस्तकाचा तसेच प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी देशभक्त रामकृष्ण जाजू यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १४ जून रोजी सोलापुरात केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होत आहे.हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता हा पुस्तक प्रकाशन समारंभ होत आहे. या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी सुविद्या प्रकाशन संस्थेने घेतली आहे. याबाबतची माहिती सुविद्या प्रकाशन संस्थेचे बाबूराव मैंदर्गीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूरच्या मार्शल लॉ चळवळीस यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चळवळीत सोलापूरच्या बहाद्दर जनतेने ब्रिटिशांना हाकलून देऊन तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते. या चळवळीत भाग घेणाऱ्या अनेक देशभक्तांना ब्रिटिश सरकारने पकडून शिक्षा सुनावली होती. जालियानवाली बागेच्या घटनेची छोटी आवृत्ती समजले गेलेल्या आणि संपूर्ण हिंदुस्थानात एकमेव मार्शल लॉ चळवळ झालेल्या घटनेची इतिहासाने अपेक्षित दखल घेतली नाही. या ऐतिहासिक घटनेवर पुस्तक प्रकाशित करण्याची सूचना दिवंगत ज्येष्ठ साहित्य संशोधक डॉ. य. दि. फडके यांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर प्रा. डॉ. पुंडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तसेच गांधीवादी नेते देशभक्त जाजू यांच्या जीवनावर प्रकाश टाकून प्रा. डॉ. येळेगावकर यांनीही पुस्तक लिहिले आहे. या दोन्ही पुस्तकांचा एकाच वेळी प्रकाशन सोहळा केंद्रीय ऊर्जामंत्री शिंदे यांच्या हस्ते होत असल्याचे मैंदर्गीकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस दत्ता गायकवाड व प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर हे उपस्थित होते.