Leading International Marathi News Daily

शनिवार, २० जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘झपाटलेपण ते जाणतेपण’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, १४ जून/ प्रतिनिधी

‘झपाटलेपण ते जाणतेपण’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने जीवनात आलेले विविध

 

अनुभव, पाहिलेले वास्तव व त्यानुसार झालेली विचारांची जडणघडण.. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा हा प्रवास आज उलगडला.
साधना साप्ताहिक व एस. एम. जोशी फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘साधना समकालिन २००९’ महोत्सवात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या १२ लेखकांनी त्यांना समाजाविषयी आलेल्या अनुभवांवर आधारित साधना साप्ताहिकात लिहिलेल्या लेखांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन त्यातील पाच लेखकांच्या हस्ते झाले. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त सुभाष वारे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, लेखक संजय भास्कर जोशी, आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य, ‘सकाळ’चे संपादक (विशेष प्रकल्प) यमाजी मालकर यांचा त्यात समावेश होता. या पाचही लेखकांनी मनोगतात लेखांतील मुद्दे स्पष्ट करीत त्यावर विचार व्यक्त केले. ‘साधना’चे विश्वस्त रा. रे. ऊर्फ आप्पासाहेब पाटील, संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर त्या वेळी उपस्थित होते.
वारे म्हणाले, ‘‘सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना काही गमविले असे वाटत नाही. मात्र, काहीशी अस्वस्थता आहे. समाजवादी विचार आजही योग्य पद्धतीने पुढे चालला आहे.’’
डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘झपाटलेपणाचा प्रवास करताना जाणतेपण आले की नाही हा प्रश्न आजही मनामध्ये आहे. कारण ते झपाटलेपण आजही आहे.’’
देशमुख म्हणाले, ‘‘प्रशासकीय कामातला झपाटलेपणा आजही संपला नाही. प्रशासनातील काही लोक काम करीत नाहीत हे खरे पण, काहीजण खरोखरच झपाटलेपणाने काम करतात. आपण ज्या ठिकाणी जाऊ तेथे आपल्या कामातून काहीतरी बदल घडवून आणावा, असा प्रयत्न आपण सातत्याने केला.’’ सूत्रसंचालन ‘साधना’चे युवा संपादक विनोद क्षीरसागर यांनी केले.